भारतासकट जगातील अनेक देशात काही मूठभर व्यक्ती / कुटुंबांच्या हातात अमर्याद संपत्ती गोळा झाली आहे. त्यात अजूनही अमर्याद भरच पडत आहे. हा वरकरणी वाटतो तसा आर्थिक विषमता असावी की नसावी असा व्हॅल्यू पोझिशनवाला मुद्दा नाही.
मूठभरांच्या हातातील संपत्ती मधून मूठभरांच्या हातात राजकीय सत्ता केंद्रित होत असते. (त्याला इंग्रजी मध्ये ऑलिगार्क म्हणतात) त्याचे खूप गंभीर सामाजिक , राजकीय,आर्थिक परिणाम त्या देशावर होत असतात.
हे सध्या अमेरिकेत घडत आहे. त्याचा प्रत्यक्ष संबंध डोनाल्ड ट्रम्प यांच्या सारखा एकाधिकारशाही / फॅसिस्ट नेता राष्ट्राध्यक्ष बनण्याशी आहे.
__________
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होणार हे निश्चित झाल्यानंतर जो बायडेन यांच्यासाठी एक निरोप समारंभ जानेवारी २०२५ मध्ये व्हाईट हाऊस मध्ये आयोजित केला गेला होता. त्या निरोप समारंभात बोलताना बायडेन म्हणाले:
“अमेरिकेत अमर्याद संपत्ती, राजकीय आणि सर्व प्रकारची सत्ता आणि प्रभावक्षमता असणाऱ्या मुठभर व्यक्तींचा एक गट (ओलिगार्क) विकसित होत आहे. त्यामुळे अमेरिकेतील लोकशाही, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि मत स्वातंत्र्य यांना धोका तयार होत आहे. या ऑलिगार्कीची मुळे अमेरिकेत विकसित होत असलेल्या नवतंत्रज्ञान औद्योगिक साम्राज्यांमध्ये आहेत. या साम्राज्यांमधूनच कोणाचेही नियंत्रण नसलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे तंत्रज्ञान आणि निवडणुकांमध्ये वापरला जाणारा “डार्क मनी” तयार होत आहे”
बायडेन पुढे असे देखील म्हणाले म्हणाले की अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयावर देखील या ओलिगार्कचे नियंत्रण आहे. बायडेन यांनी अशी सूचना केली की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ कायद्याने मर्यादित केला पाहिजे.
याआधी फ्रँकलिन रुझवेल्ट सोडले तर अमेरिकेतील कोणत्याही राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेतील भांडवलशाहीवर एवढी घणाघाती टीका केलेली नव्हती. फरक हा आहे की रुझवेल्ट यांनी ज्यावेळी ती टीका केली त्यावेळी ते राष्ट्राध्यक्ष पदावर होते आणि बायडेन यांनी टीका केली त्यावेळी ते निवृत्त झालेले होते.
(संदर्भ : मंथली रिव्ह्यू एप्रिल २०२५ मधील लेखातून, पान क्रमांक १६)
__________
जो बायडेन फक्त अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष नव्हते तर अमेरिकन प्रस्थापित व्यवस्थेचे, शासक वर्गाच्या कोअर ग्रुपचे अनेक दशके सभासद होते. कोणी डाव्या विचारसरणीच्या टीकाकाकाराने अमेरिकेबद्दल वरील उद्गार काढणे / वाक्य लिहिणे वेगळे आणि जो बायडेन यांनी म्हणणे वेगळे.
आपल्या देशाच्या, भारताच्या राजकीय अर्थव्यवस्थेत ओलीगार्कि तयार होत आहे का ? असेल तर त्याचे दृश्य परिणाम काय होत आहेत..हे प्रश्न वाचकांच्या मनात उपस्थित करणे हा या पोस्टचा मूळ हेतू आहे.
राजकीय अर्थव्यवस्थेतील कोणतीही माहिती किंवा विश्लेषण हे एकेडेमिक ज्ञान वाढवण्यासाठी कधीच नसते. नसले देखील पाहिजे. कारण राजकीय अर्थव्यवस्थेतील कॉर्पोरेट आणि वित्त भांडवल केंद्री महत्त्वाचे बदल कोट्यावधी सामान्य नागरिकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नावर निर्णायक प्रभाव टाकत असतात. मग ते नागरिक कोणत्याही जाती, धर्माचे, प्रांताचे, भाषेचे, ग्रामीण वा शहरी असोत.
दुर्दैवाने सामाजिक विषयांवर जेवढी चर्चा सार्वजनिक व्यासपीठांवर होते, तेवढी राजकीय अर्थव्यवस्थेवर होत नाही. ती होऊ लागली तर “गरीब तितुका मेळवावा” हा राजकीय अजेंडा बळकट होऊ लागेल. एक ठोस कार्यक्रम मिळेल.
संजीव चांदोरकर (८ सप्टेंबर २०२५)