औरंगाबादमध्ये महापालिका उमेदवारांच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकर मैदानात; ८ आणि ९ जानेवारीला शहरात सभांचा धडाका!
औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने जोरदार मुसंडी मारली असून, युवा नेते सुजात आंबेडकर यांचा दि. ८ आणि ९ जानेवारी रोजी शहरात दोन दिवसीय प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे.
या दोन दिवसांत सुजात आंबेडकर शहरातील विविध ११ प्रभागांमध्ये पदयात्रा काढणार असून ६ भव्य जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. ८ जानेवारीला दुपारी १२ वाजता एकता नगरपासून दौऱ्याची सुरुवात होईल, तर रात्री उस्मानपुरा आणि भीमनगर भागात सभा होतील. दुसऱ्या दिवशी, ९ जानेवारीला सकाळी १० वाजेपासून टाऊन हॉल, कांचनवाडी आणि नक्षत्रवाडी भागात पदयात्रांच्या माध्यमातून ते मतदारांशी संवाद साधतील.
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून सुजात आंबेडकर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.