२८मे रोजी कोल्हापूरात, निरंजन टकले यांना २०२४चा ‘भाई माधवराव बागल पुरस्कार’ देण्यात आला. आपल्या उत्तराच्या भाषणात नरेंद्र टकले यांनी, इंडिया गठबंधन सत्तेत येणार असे भाकीत केले तर सूत्रसंचालकाने शाहू महाराजांचा उल्लेख जाणीवपूर्वक ‘खासदार’ असाच केला ! शाहू महाराजांनी, निरंजन टकले यांना ऐकायला महिला व तरुणाईची संख्या आहे याहून अधिक असायला हवी होती, अशी खंत बोलून दाखवली. करवीर संस्थानचा स्वतंत्र भारतात समावेश होताना या संस्थानाने घेतलेली प्रागतिक व राष्ट्रीय, लोकशाहीवादी भूमिकेचा इतिहास स्वतंत्रपणे लिहिला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांनी भाई माधवराव बागलांच्या नावाने लढाऊ पत्रकार निरंजन टकले यांना पुरस्कार देण्याचे औचित्य स्पष्ट करताना सांगितले की, भाई माधवराव केवळ स्वातंत्र्य सेनानी नव्हते. ते चित्रकार होते. शिल्पकार होते. विचारवंत होते. प्रबोधक होते आणि कणखर बाण्याचे पत्रकार देखील होते ! पवार पुढे म्हणाले, माणगावच्या परिषदेत डॉ. आंबेडकरांकडे वळून राजर्षी शाहू महाराज म्हणाले – “आपण राजवाड्यावर येऊन मला आपल्यासोबत पंगतीत सहभोजनाचा लाभ द्यावा !” त्यानंतर राजर्षींनी स्वहस्ते बाबासाहेबांच्या मस्तकावर करवीरनगरीचा मंदिल ठेवला. आज आम्ही कोल्हापूरात निरंजन टकले यांना भाई माधवराव बागलांच्या स्मरणार्थ कोल्हापूरी फेटा बांधला आहे. बाबासाहेबांनी आपल्या सत्काराच्या उत्तरात राजर्षी शाहूंना शब्द दिला होता की, या फेट्याची प्रतिष्ठा मी अखेरपर्यंत राखीन. तेव्हा, कोल्हापूरी फेटा हा केवळ सन्मान नसतो तर ही शिरावर मोठी जबाबदारी देखील असते. मला विश्वास आहे की, निरंजन टकले ती निभावतील. भाई माधवराव बागल यांनी, ‘गोळवलकरी राज्य आले तर’ काय होईल, हा इशारा दिला होता त्यावेळी कुणालाही असे राज्य येईल असे वाटलेच नव्हते. पण २०१४ला ते आले ! आता मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात धडा लावण्यापर्यंत त्यांचे धाडस वाढले आहे. यातून लक्षात घ्या की आपल्यासमोर केवढे मोठे आव्हान आहे. श्रोत्यांमधून आलेल्या मागणीनुसार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा निषेध मंचावरून करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात, साने गुरुजींच्या ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे ‘ व ‘ आता उठवू सारे रान …’ या स्फूर्तीगीतांनी तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. निरंजन टकले सरांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे स्वतंत्र पोस्टद्वारे इथेच देईन.