• 21
  • 1 minute read

कर्नाटक किनारपट्टीतील बुद्धिझम आणि नाथ संप्रदाय…

कर्नाटक किनारपट्टीतील बुद्धिझम आणि नाथ संप्रदाय…

आपल्या महाराष्ट्रात कोंकण किनारपट्टीत जशी कुडा लेणी, गंधारपाले लेणी , पन्हाळेकाजी लेणी आहेत तशी कर्नाटकच्या किनारपट्टी भागात लेणी नाहीत परंतु तरीही एकेकाळी बौद्ध धर्म तेथे पसरला होता . अनेक पुरातन बुद्धमूर्ती कादरी ( मंगलोर), हायगुंडा, बाब्रूवाडा आणि मुलर (उडुपी) येथे मिळाल्या आहेत . कर्नाटक किनारपट्टीतील मंगलोर जवळील ‘कादरी श्री मंजुनाथ मंदिर’ हे देवस्थान प्रत्यक्षात एकेकाळचे वज्रयान बौद्ध विहार आहे . तेथील देवळात दुर्मिळ पंचधातूची बुद्धमूर्ती आहे . तिला बाजूला कोनाड्यात सरकवून मुख्य गाभाऱ्यात शिवाची स्थापना केली आहे . १० व्या शतकातील या महायान पंथाच्या बुद्धमुर्तीला सर्वसामान्यजन ब्रम्हदेवाची मूर्ती समजतात . परंतु ही मूर्ती म्हणजे बोधिसत्व मंजुश्री, बोधिसत्व अवलोकितेश्वर आणि बुद्ध अशा तीन त्रयींची आहे . काही अभ्यासक बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांची आहे असेही मानतात . या पंचधातु मूर्तीखाली ‘कादरीका विहार’ असा स्पष्ट उल्लेख आहे . यामुळे पूर्वी हे मंदिर महायान-वज्रयान पंथाचे मोठे विहार होते हे स्पष्ट दिसते . सदर मूर्ती अलुप राजा कुंदवर्मन याच्या कारकीर्दीत इ.स. ९६८ मध्ये घडविण्यात आली.

तीन चेहरे आणि सहा हात असलेली ही मूर्ती अवलोकितेश्वर म्हणून ओळखली जाते. या मूर्तीच्या मुकुटावर भूमीस्पर्श मुद्रेतील भगवान बुद्धांची प्रतिमा आहे . तसेच या प्रतिमेच्या पाठीमागे प्रभावलय सुद्धा दिसतेb. येथील दुसरी अवलोकितेश्वरची मूर्ती ४ फूट उंच असून तिला चार हात आहेत . अमिताभ बुद्ध ध्यान मुद्रेतील प्रतिमा तिच्या मुकुटावर दिसून येते . तिसरी बुद्धमूर्ती ३ फूट उंच आहे . तिला व्यासमुनी असे म्हणतात . येथील गर्भगृहातील स्तंभावर बुद्ध प्रतिमा स्पष्टपणे दिसतात . तसेच तेथील एका स्तंभावर ध्यान बुद्धा असे कोरलेले आढळते . यावरून हे देवस्थान एकेकाळी मोठे ‘बुद्ध विहार’ असावे हे स्पष्ट दिसून येते . काळाच्या ओघात या मूर्त्यांची ओळख हिंदू देवता अशी बदलून गेली आहे .

तसेच या देवस्थानात महासिद्ध साधक मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ यांची शिल्पे देखील आहेत . हे तीनही महासिद्ध मुनी हे ८४ सिद्धी प्राप्त केलेले साधक होते . बौद्ध धर्मात ८४ हजार गाथांना महत्त्व आहे . यातील ८२ हजार गाथा या भगवान बुद्धांनी स्वतः उपदेशीलेल्या आहेत . तर २ हजार गाथा त्यांच्या शिष्यांनी सांगितल्या आहेत . अशा एकूण ८४ हजार गाथां आहेत . या ८४ हजार गाथांचे हिंदू धर्मामध्ये ‘चौर्‍यांशी लक्ष योनी’ झाले . आणि ‘८४ सिद्धी’ म्हणून नाथ संप्रदायात रुजल्या . बौद्ध धर्म लोप पावताना त्याचे तत्त्वज्ञान नाथ संप्रदायात जाऊन स्थापित झाल्याचा कादरी विहार हा एक मोठा दुवा आहे . तेंव्हा पासून ते आजतागायत बुद्ध तत्वज्ञान नाथ संप्रदायात गुप्तरीत्या तग धरून राहिले आहे .

मच्छिंद्रनाथ यांनी शैव नाथपंथ स्थापित केला . हठयोगाचे ते जाणकार होते . १० व्या शतकात ते कादरीका बौद्ध विहार येथे शिष्य गोरखनाथांबरोबर आले . पातंजली योग याची सुधारीत आवृत्ती कुंडलिनी जागृती पद्धत त्यांनी विकसित केली . भारतात तोपर्यंत बुद्धांच्या मूळ ध्यानधारणा साधनेत अनेक बदल झाल्याने तिची शुद्धता लोप पावली होती . मात्र भारताबाहेरील देशात ती शुद्ध स्वरूपात टिकून राहिली . नाथ संप्रदायात वर्णद्वेष आढळत नाही . नाथ संप्रदायाचे ‘रुपनाथ’ नावाचे एक महत्त्वाचे स्थळ मध्यप्रदेशात आहे . तेथे सम्राट अशोक राजाचा शिलालेख आहे . दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांच्यात सलोख्याचे संबंध आढळतात . नवनाथामध्ये (९ नाथ) प्रबुद्ध, पिप्पलायान, द्रुमिल अशी बौद्ध नावे आढळतात. नाथ संप्रदायात योग आणि ध्यान उपासना महत्वाची मानली गेली आहे .

इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात सम्राट अशोकाने धम्मप्रसारा करिता पाठविलेले स्थाविर धम्मरक्खित हे बनवासी येथेच आले होते . बौद्ध धर्मातील महायान पंथामध्ये हरिती देवी सुपीकतेचे, सुफलतेचे प्रतीक मानले गेले असून ती मुलांसोबत दिसून येते . मलनाड या कर्नाटक किनारपट्टीतील स्थळी तिचे शिल्प आढळले आहे . गोकर्ण, शृंगेरी, कोल्लूर अशा अनेक ठिकाणी पुरातन बुद्धमुर्त्या सापडल्या आहेत . विशेष करून दक्षिण कन्नडा आणि उडुपी भागात अनेक देवालये ही पूर्वीची बौद्ध विहार स्थळे असल्याचे दिसून येत आहेत . प्राध्यापक मुरुगेश यांनी सांगितले की अनेक विहारांचे रूपांतर हिंदू मंदिरात झालेले आढळते. येथे तिसऱ्या शतकात आलेला बौद्धधर्म हा दहाव्या शतकापर्यंत टिकून होता. इ.स. ९६८ मधील नोंदी नुसार ‘मंगलोर’ शहराचे नाव ‘मंगलपुरा’ असल्याचे आढळले आहे .

कर्नाटकातील किनारपट्टी भागात होनावर तालुक्यात शरावती नदीमुळे तयार झालेले हायगूंडा नावाचे बेट आहे . तेथे जाण्यास आता नुकताच पूल बांधला आहे . यापूर्वी तेथे बोटीने जाता येत असे . मात्र या बेटावर अद्याप रस्ते नाहीत . तिथे काही क्षतिग्रस्त झालेल्या पुरातन बुद्धमूर्ती आढळल्या आहेत. बनवासी पासून हे बेट ७० कि.मी. दूर आहे . या बुद्धमूर्ती तीसऱ्या ते पाचव्या शतकातील असाव्यात.दक्षिण भारतातील पश्चिम किनारपट्टी भाग हा एकेकाळी बौद्ध धर्माच्या संस्कृतीने गजबजलेला असावा याला पुष्टी मिळते . त्याबाबत नवीन माहिती उजेडात येत असून अनेकांना संशोधनाचा विषय प्राप्त होत आहे .

संदर्भ : –
https://www.deccanchronicle.com/nation/in-other-news/051117/sunday-story-the-buddha-towers-in-karnatakas-coast-too.html


– संजय सावंत ( नवी मुंबई )

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *