बालपणीचा काळ कितीही कष्टाचा असो पण वार्धक्याकडे झुकू लागताच याच काळाकडे मन धावू लागते. या काळातील बऱ्याच आठवणी मनात घट्ट रूतून बसतात. बालपणीच्या ठसठशीत आठवणाऱ्या घटनेत कागदाचे विमान व कागदाची होडी हे अग्रक्रमाने येते. कागद न फाडता फक्त त्याच्या घड्या घालून वा दुमडून विविध प्रकारच्या सुंदर सुंदर कलाकृती तयार करण्याची कला म्हणजे ‘ओरीगामी’. प्रत्येकाच्या बालपणी हे कागदी विमान व होडी स्मृतीत घट्ट असणार. मूळ जापानी शब्द ‘ओरीकामी’. ‘ओरी’ म्हणजे दुमडणे व ‘कामी’ म्हणजे कागद. पूढे या “कामी”चा अपभ्रंश ‘गामी’ असा झाला.
मानवी मेंदू आजही अगम्य आहे. कल्पक व प्रतिभाशाली माणसाच्या मेंदूतुन असंख्य अविष्कार निर्माण करण्याची अद्भूत शक्ती असते. १७ व्या शतकात या ‘ओरीगामी’ कलेचा उदय झाला. जापान शिवाय इतर देशात ती लोकप्रिय झाली ती १९ व्या शतकाच्या मध्यात. एका साध्या कागदाला वेगवेगळ्या प्रकाराने दुमडून इतका सुंदर आकार देता येतो हे “ओरोगामी” कलाकृती बघितल्या शिवाय समजणार नाही. या कलेला जागतीक पातळीवर खरी ओळख मिळवून दिली ती या कलेचे पितामह जपानचे अकिरा योशिझावा.
१४ मार्च १९११ रोजी कामिनोकावा (आम्हाला गनीमी कावा माहित आहे पण कामिनोकावा नव्हता माहित) या जपान मधील शहरात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडीलांचा दूध डेअरीचा व्यवसाय होता. वयाच्या १३ व्या वर्षी ते टोकियो शहरातील एका कारखान्यात कामाला लागले. बालपणापासून त्यांना ओरोगामीची तशी आवड होती. मात्र त्यांना बढती मिळून ते जेव्हा टेक्नीकल ड्राफ्टसमन झाले तेव्हा या कलेतील आवड आणखीनच वाढली. कामगारांना भूमितीतील प्रश्न व आकृत्या सोप्या करून सागंताना त्यांना या कलेची मदत झाली. यावेळी त्यांचे वय होत केवळ २० वर्षे. ओरोगामीच्या वेडापायी १९३७ मध्ये त्यांनी नोकरी सोडली व पूर्ण वेळ या कलेला वाहून घेतले. पूढची २० वर्षे त्यांनी गरिबीतच घलविली. त्सुकुदानी नावाचे छोटेसे सी-फूड विकून ते आपला उदरनिर्वाह करीत असत. खऱ्या अर्थाने त्यांची कला पहिल्यांदा जगासमोर आली १९५१ मध्ये व जागतीक स्तरावर प्रसिद्धी मिळाली ती १९५४ मध्ये. त्यांनी बारा राशींची बारा प्रतिके ओरोगामीद्वारे साकारली. फल ज्योतिषावर त्यांचा फारसा विश्वास होता की नाही माहिती नाही पण ओरोगामीच्या याच राशींनी त्यांना गरिबीतून बाहेर काढले. त्याच वर्षी त्यांनी टोकियोत इंटरनॅशनल ओरोगामी सेंटरची स्थापना केली तेव्हा त्यांचे वय होते ४३ वर्षे. या कलेचे पहिले सार्वजनीक प्रदर्शन अॅ मस्टरडॅम येथे १९५५ मध्ये एका डच वास्तूविशारदाने आयोजित केले.
आकिरा आजोबांनी आजपर्यंत ५० हजार कलाकृती तयार करून एक विक्रमच केला आहे. त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या १८ पुस्तकांतून यातील काही शेकडा कलकृतीचा समावेश होऊ शकला. ते त्यांच्या अंतकाळापर्यंत जपानचे कला संस्कृती दूत म्हणून कार्यरत होते. सन १९८३ मध्ये जापानचे सम्राट हिरोहितो यांनी त्यांना ‘’ऑर्डर ऑफ द रायझिंग’’ सन हा जपानचा सर्वाच्च नागरी सन्मान बहाल केला. या जगाचा निरोप घेतानां देखिल त्यांनी आपल्या जीवनाची घडी बिघडू दिली नाही. १४ मार्चला जन्मलेले अकिरा योशिझावा बरोबर १४ मार्च २००५ ला हे जग सोडून गेले तेव्हा ते बरोबर ९४ वर्षांचे होते.