- 70
- 1 minute read
कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनामागचे चैतन्य गेलेय कुठे ?
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 100
एक मे हा दिवस जागतिक स्तरावर कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो. तो श्रमाचा आणि ते करणा-या श्रमिकाच्या कल्याणाचा दिवस म्हणून. आपल्या राज्याचा आजचा भौगोलिक राजकीय नकाशा निर्माण करण्यात देखील मराठी कामगारांचा संघर्ष आणि कामगारांचे हौतत्म्य पणाला लागलेले त्यातून आजचा महाराष्ट्र आपल्या समोर उभा आहे. यासाठी मराठी शाहिरी, मराठी लेखणी, मराठी साहित्य, मराठी प्रबोधनकार विचार यांच्या वैचारिक उर्जा आणि चैतन्यातून जे प्रत्यक्षात साकारलं ते म्हणजे आपला महाराष्ट्र.
व्दिभाषिक राज्यातून मराठी राज्य म्हणून निर्माण झालेल्या या महाराष्ट्र राज्याची पायाभरणी इथल्या सुजान आणि उमद्या समावेशक पिढीने केली. एक कल्याणकारी राज्य, आर्थिक आणि सामाजिक विकास निर्माण करणारे राज्य म्हणून वाटचाल करत अग्रणी वाटचाल सुरु झाली. वर्तमानात तीच उर्जा आणि चैतन्य याची उजळणी करुन ते समजायची आणि जागवायची वेळ आहे.
आर्थिक विकास, सामाजिक विकास आणि सामाजिक न्याय हे कल्याणकारी राज्याची मूलतत्वे आहे. कामगार दिन याच प्रेरणेतून जगभर पाळला जातो. जगभरात सर्वाधिक संख्या असलेला श्रमीक आणि त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा देत भांडवली व्यवस्थेच्या आर्थिक शोषणातून त्याची मुक्तता करण्याची प्रेरणा जीवंत रहावी म्हणून हा दिवस साजरा करायचा. याच दिवशी महाराष्ट्र दिवस मानायचा तो याच मानवी प्रेरणेने.
सध्या निवडणुकांची हवा सुरू आहे. लोकशाहीला अधिकाधिक लोकाभिमुख मानवी चेहरा देण्यासाठी मतदानाद्वारे आपल्या लोकशाहीची दिशा ठरविण्याचे हे पर्व देशभर सुरु आहे. यात लोकाभिमुख, लोकांचे रोजच्या जगण्याचे मुलभूत मुद्दे चर्चेच्या आणि प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक सुजान आणि सजग प्रहरी असलेल्या नागरिकांची आहे. सवंग, प्रचारकी, भावनिक, सांप्रदायिक प्रचार लोकांच्या मुलभूत मुद्द्यांना बगल देणारा ठ्ररत असतो. यासाठी आजच्या निवडणूक पर्वामध्ये प्रजा म्हणून बळी पडण्यापेक्षा नागरिक बनून सजग राहून लोकांच्या मुलभूत प्रश्नांच्या मुद्द्यावर हा निवडणूक प्रचार राहील यासाठी दक्ष नागरिकाच्या भूमिकेत राहत लोकशाहीने आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीचे निर्वहन करण्याची आणि त्यातून लोकशाहीला अपेक्षित लोकशिक्षण करण्याची ही वेळ आहे.
लोकशाहीला अपेक्षित असलेला संविधान प्रदत्त आर्थिक आणि सामाजिक विकास साध्य करण्यासाठी आजच्या या निवडणूक मतदान पर्वात ज्वलंत मुद्दे म्हणून आजची बेरोजगारी, रोजगार निर्मिती, रोजगारांच्या कामाचा न्यायपूर्ण मोबदला, पिण्याचे व शेतीच्या पाण्याचा शाश्वत पुरवठा, शिक्षण हक्क कायद्याद्वारे परवडण्यायोग्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, परवडण्यायोग्य व्यक्तीगत आणि सामाजिक आरोग्य सेवा, कामगारांचा विमा, त्याचे कायदेशीर संरक्षण, शाश्वत शेती, पर्यावरण संवर्धन, क्लायमेट चेंज, स्थानिक नैसर्गिक आपत्तींचे निवारण यासारख्या मुद्द्यांना लोक चर्चेच्या केंद्रस्थानी जागा मिळणे आणि मिळवून देणे प्रत्येक जबाबदार नागरिकांचे कर्तव्य म्हणून याचा अंगिकार होणे आवश्यक आहे.
आर्थिक विषमतेची दरी कमी करणे, राष्ट्रीय संसाधनांचे आणि संपत्तीचे न्याय वितरण, रोजगार निर्मिती, सर्वांना संधी, श्रमिकांचे संरक्षण याबाबत पूरक आणि पोषक धोरणांची दिशा अंगिकारुनच कल्याणकारी लोकशाही व्यवस्था सुदृढ करता येवू शकते. अधिकाधिक लोकांचा सहभाग हे लोकशाहीचे खरे स्पिरिट आहे. यात एकांगी आणि एककल्ली वळण येणे हे लोकशाही विरोधी पाऊल ठरत असते. पण सद्यास्थितीत एकारलेपणाची पायवाट होताना दिसतेय. ती थोपवुन धरणे क्रमप्राप्त आहे.
वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या कर संकलानाच्या ताज्या आकडेवारीतून पुढे आलेले कर संकलानाचे वास्तव बघितले तर आपण लोकशाहीच्या आर्थिक अंगाने विपरित वळणावर पोचलेले आहे. उत्पन्न करातून जमा झालेल्या महसुलाची आकडेवारी सध्याला मोठ्याप्रमाणात वाढलेली असून त्याच विपरित प्रमाणात कॉर्पोरेट जगताचे कर संकलन कमी प्रमानात झालेले आहे. हे वळण संपत्तीचे केंद्रिकरण करणारे आहे. खरे तर कॉर्पोरेट जगताकडून व्यक्तीगत करा पेक्षा अधिकचे कर संकलन होण्याची गरज आहे. सद्यस्थितीतील आर्थिक आणि कर धोरणाचा हा विपरित परिणाम म्हणून आजचे संपत्तीचे केंद्रीकरण आणि आर्थिक विषमतेची दरी वाढताना दिसत आहे. याबद्दल मात्र आरोग्यदायी आणि मुक्त चर्चा माध्यमांतून होताना दिसत नाही. हा सर्व प्रकार संतुलित लोकशाहीकरिता मारक स्वरूपाचा ठरत आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. आर्थिक व्यवस्थेचे हे वळण सामाजिक आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायाच्या लोकशाहीला धोक्याच्या वळणावर पोचवणारे ठरत आहे.
भारतातील या आर्थिक विषमता आणि संपत्तीचे केंद्रीकरण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एम ए वर्गाचा विद्यार्थी असताना अभ्यासलेल्या राज्यशात्रातील अमेरिकी राजकीय इतिहासातील एका पर्वाची प्रकर्षाने आठवण होते. विसाव्या शतकाच्या आरंभी अमेरिकेत रॉकफ़ेलर कुटूंबाच्या रुपाने स्टॅण्डर्ड ऑइल कंनीने संपत्तीचे अमाप केंद्रीकरण केले होते. तर आणखी एक उद्योजक याने कोळसा क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण केलेली होती. उर्जा क्षेत्रातील ही दोघांची मक्तेदारी अमेरिकेला नियंत्रित करत होती. इतके की त्यांच्या भांडवली शक्तीने राजसत्तेवर नियंत्रण करण्याचा वरचढपणा केलेला होता. त्याला पायबंद घालण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांनी प्रथम: लगाम घालण्याचे धोरण आखले होते. तर विसाव्या शतकाच्या चौथ्या दशकात अमेरिकेत बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली होती, त्याला उतारा म्हणून अमेरिकी डेमोक्रॅटिक पक्षाचे तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष फ़्रॅंक्लिन डी. रुझवेल्ट यांनी 1933 मध्ये राष्ट्राध्यक्ष पदावर आल्यावर आपल्या पुढील कारकीर्दीत एकारलेल्या आणि केंद्रिकरण झालेल्या अमेरिकी आर्थिक धोरणात अमूलाग्र बदल केला. बेरोजगारी शिगेला पोचलेली होती त्यावर उपाय म्हणून युवकांसाठी रोजगार निर्मितीचे आणि शेतक-यांसाठी पोषक धोरण अवलंबिले, बेरोजगार युवकांना सहय्यक ठरतील यासाठी भरपूर कार्यक्रम लागू केले. कामगारांना पोषक कामगार कायदे तयार केले. सुधारणावादी धोरणे लागू केली त्यात सामाजिक सुरक्षा, भांडवलदारांवर भारी कर आकारणी, सार्वजनिक उद्योगावर आणि बॅंका शासनाच्या नियंत्रणात आणल्या. अमेरिकेतील व्यवस्थेवर आर्थिक सत्तेचे केंद्रीकरणाद्वारे भांडवलदारांनी निर्माण केलेले वर्चस्व आणि रॉक्फ़ेलर समुहाची एकाधिकारशाही कायद्याद्वारे मोडीत काढली. अमेरिकी अर्थव्यवस्थेला त्यांनी संतुलित स्वरूप दिले.
आर्थिक लोकशाहीसाठी आणि संपत्तीच्या विकेंद्रीकरणासाठी, बेरोजगारी कमी करण्यासाठी,रोजगार निर्मितीसाठी आणि यातूउ आर्थिक आणि सामाजिक कल्याणाची लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी भारताला देखील आज रुझवेल्ट द्वयींच्या धोरणांचे अवलोकन करण्याची गरज आहे. त्याला भारताने राष्ट्रीय स्तरावरून गती देण्यासाठी आजच्या जागतिक कामगार दिनी महाराष्ट्र दिवस साजरा करताना इथल्या जागरूक नागरिकांनी, देशापुढील सामन्यजनांच्या स्थितीचे संतुलित भान ठेवणे आवश्यक आहे. उद्योग , रोजगार आणि रोजगाराचा न्याय्य मोबदला याबाबत मतदारांनी शाश्वत, विकेंद्रित आणि संतुलित आर्थिक सामाजिक विकासाचा अंगिकार करावा यातच मराठी प्रकृतीच्या महाराष्ट्र दिनाचे चैतन्य आहे. राष्ट्र निर्माणाची उर्जा यातच आहे. जय महाराष्ट्र.
आर एस खनके
0Shares