• 58
  • 1 minute read

काळोखाने जखडबंद होणारे भेजे !

काळोखाने जखडबंद होणारे भेजे !

मुकनायक बाबासाहेब आंबेडकरांनी सयाजीराव गायकवाडांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे एक शैक्षणिक झेप घेतली असली;तरी त्या ऋण म्हणून घेतलेल्या शिष्यवृत्तीमुळे त्यांना ज्या अपमान-अवहेलनांच्या अग्नीदिव्यातुन जावे लागले ते वाचतांना आजही संवेदना जाग्या असलेल्या कुणाही माणसाच्या काळजाला इंगळ्या डसल्याशिवाय राहणार नाहीत.त्यांना पाणी प्यायचीही चोरी,लांबुन फेकलेल्या फायली.राहायसाठी कुठेही न मिळणारा आसरा.अखेर पारशी समाजाच्या माणसाकडून जात लपवुन मिळालेली जागा.तेथेही जात कळल्यावर फेकुन दिलेले सामान आणि परदेशातही आपल्या विद्वत्तेचा प्रकाश पाडुन आलेल्या त्या ज्ञानपुरुषाने असहाय होवुन ढसाढसा रडत ढाळलेली आसवे.
त्याच गुजरातमध्ये बाबुराव बागुलांनाही जात चोरावी न लागली तरच नवल होते.
“जातींचे बालेकिल्ले असलेली खेडी सोडुन शहराकडे चला.” या बाबासाहेबांच्या आदेशानुसार ज्या लाखो अस्पृश्यांनी मुंबईची वाट धरली. त्यामध्ये विहीतगावचे बाबुराव बागुलही होते.बाबुरावांनी रेल्वे वर्कशाॅपमधल्या नोकरीसाठी सुरतेची वाट धरली.पण,बाबुरावांची जात-अस्पृश्यता सावलीसारखी त्यांचा पाठलाग करीत होती.
ज्या गुजरातने ज्ञानसुर्याला त्याच्या अस्पृश्यतेमुळे नाकारले होते.त्याच गुजरातमधल्या सुरत शहरात अखेर बाबुरावांनाही जात चोरुन रहावे लागले होते.अखेर त्या जातीमुळेच त्यांना नोकरीसोडुन पुन्हा मुंबई गाठावी लागली होती.
पण,जातीयतेचा इतका घृणास्पद अनुभव गाठीशी असतानाही बाबुरावांची पावले बाबासाहेबांच्या अस्पृश्यतेविरोधातील मानवीहक्कांच्या लढ्याएवजी साम्यवादाकडे का बरं वळली असतील?
खरं तर; बाबुराव बागुल काय,अण्णाभाऊ साठे काय नि काॅम्रेड आर.बी.मोरे काय;ज्या साम्यवादाचा झेंडा घेऊन चालत होते.त्या साम्यवादावरील उच्चत्वाची पकड आजही तितकीच निगरगट्टरित्या कायम आहे.उलट पुनरुज्जीवनवादी शक्तींच्या अमानुष-अनियंत्रीत वाढीने भयभीत साम्यवाद्यांची पावलेही धर्मस्थळांकडे वळतांना दिसत आहेत.
पण,बाबुराव बागुल जरी साम्यवाद्यांच्या छावणीत वावरत असले तरी त्यांच्या कथा,कादंबर्‍या,कवितांनी सामाजिक विषमेची कातडी सोलवटुन काढली होती.”जेव्हा मी जात चोरली होती”या १९६३ साली प्रकाशीत झालेल्या कथासंग्रहामुळे जातीचा प्रश्न साहित्याच्या वेशीवर टांगला गेला.त्या पाठोपाठ १९६९मध्ये त्यांच्या “मरण स्वस्त होत आहे” या कथासंग्रहानेही बरीच उलथापालथ केली होती.त्यांच्या अनेक कथा,कादंबर्‍यांनी मराठी साहित्यावर ठसा उमटवला असला तरी त्यांच्या;
“वेदा आधी तू होतास
वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास
पंचमहाभूतांचे पाहुन
विराट, विक्राळ रूप
तू व्यथित, व्याकुळ होत होतास
आणि हात उभारून तू
याचना करीत होतास
त्या याचना म्हणजे ऋचा
सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव
तूच साजरे केलेस,
सर्व प्रेषितांचे बारसेही
तूच आनंदाने साजरे केलेस,
हे माणसा,
तूच सूर्याला सूर्य म्हंटले
आणि सूर्य सूर्य झाला,
तूच चंद्राला चंद्र म्हटले
आणि चंद्र चंद्र झाला
अवघ्या विश्वाचे नामकरण
तूच केलेस
अन प्रत्येकाने ते मान्य केले
हे प्रतिभावन माणसा
तूच आहेस सर्व काही
तुझ्यामुळेच सुंदर
झाली ही मही” या कवितेमुळे ईश्वराचा निर्माता माणुसच असल्याचे अधोरेखित केले आहे.त्यामुळे ईश्वराचा निर्माता असलेला माणुस त्याच ईश्वराला विश्वाचा निर्माता मानुन त्याच्या रक्षणाच्या लढाया-धर्मयुद्धे ज्या वेळी छेडतो.त्या वेळी भेजे काळोखाने जखडबंद झाल्याचे जाणवल्याशिवाय रहात नाही.
धारावीत झालेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान बाबुराव बागुलांनीच भुषवले होते.
बाबुराव बागुलांचे निधन २६मार्च२००८रोजी झाले.त्यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ त्यांना मानाचा जयभीम!
-जयवंत हिरे
“क्रांतिकारी जनता”

0Shares

Related post

मालेगाव बॉम्बस्फोट : देशातील २० करोड मुस्लिमांच्या विरोधातील कट कारस्थान , आरोपी साध्वी प्रज्ञासिंगसह ७ जणांना मृत्यदंड…?

मालेगाव बॉम्बस्फोट : देशातील २० करोड मुस्लिमांच्या विरोधातील कट कारस्थान , आरोपी साध्वी प्रज्ञासिंगसह ७ जणांना…

       मालेगाव बॉम्बस्फोट नुसती एका स्फोटाची घटना नाही, तर देशातील २० कोटी जनतेला देशविरोधी…
अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!

अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!

अतिरेकी कारवायांसाठी संघ, भाजप व मोदी सत्तेचे राजकारण पोषक असल्यामुळेच पहलगाम दुर्दैवी घटना…!      …
निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा

निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा

पहलगाम हल्ल्याप्रकरणी काँग्रेसचा दादरमध्ये निषेध मोर्चा.         जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *