- 7
- 1 minute read
काही ऐतिहासिक सत्ये व तथ्ये

काही ऐतिहासिक सत्ये व तथ्ये
छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज , छत्रपती राजाराम महाराज , छत्रपती ताराराणी , छत्रपती ताराराणी , छत्रपती शाहू महाराज सातारा , महाराणी जिजाबाई कोल्हापूर , सरसेनापती उमाबाई दाभाडे , अहिल्याबाई होळकर यांचे समकालीन शत्रू मोगलशाही , आदिलशाही , कुतुबशाही , पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रज होतेच .या मधील प्रमुख नांवे सरदार अफझलखान व मोगल सम्राट औरंगजेब बादशहा यांच्या कबरींची उत्तम देखभाल दुरुस्ती राज्य व केंद्र सरकारने केली पाहिजे . जतन केली पाहिजे . तसेच तेथे अस्सल इतिहास लिहून दर्शनी भागात मराठी हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये मोठे बोर्डस् लावले पाहिजेत . शत्रू किती बलाढ्य होते ही माहिती नवीन पिढीतील युवकांना समजली पाहिजे . आजही स्वतंत्र भारतात विजयाचे प्रतीक म्हणून मोठमोठे स्मारके उभारली जातात . स्मारके हे शौर्याचे प्रतिक व प्रेरणादायी स्थळ असते . शत्रूंचे गुणगान गाण्यासाठी युद्ध स्मारक नसते . कारगिल विजय स्मारक हे भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे व विजयाचे अभिमानास्पद स्मारक आहे . त्यात पाकिस्तानचे महात्म्य वर्णन नाही. या स्मारकांना भेट देणारे नागरिक व युवक प्रेरणा घेतात . याच प्रकारे अफझलखान व औरंगजेब यांच्या कबरींचे जतन हे भारतीयांच्या महापराक्रमाचे , सन्मानाचे व गौरवशाली विजयाचे स्मारक आहे . याच कारणाने भारतीय युवकांनी स्वराज्य संकल्पक लखूजी राजे जाधवराव समाधी सिंदखेडराजा व स्वराज्य संकल्पक शहाजीराजे समाधी होदेगिरी जिल्हा शिमोगा कर्नाटक येथे नतमस्तक झाले पाहिजे . हिंदू युवकांनी मुस्लिम शत्रूंच्या कबरी उध्वस्त करण्यापेक्षा भारतभर पसरलेल्या मध्ययुगीन काळातील हिंदू राजांच्या समाध्या उत्तम प्रकारे जतन करण्याची गरज आहे . रघुजी राजे भोसले , बिंबाजी राजे भोसले , परसोजी राजे भोसले , दामाजी गायकवाड , सरसेनापती हंबीरराव मोहिते , सरसेनापती खंडेराव दाभाडे , पहिले बाजीराव पेशवे इत्यादी महान व्यक्तींच्या बाबतीत आम्ही उदासीन आहोत . पानीपत तिसरे युध्दात मराठ्यांच्या लाखभर सैन्यासह सेनापती सरदार कामी आले . तेथे कालाआम नावाचे एक स्मारक पानीपत येथे आहे . तेथे हजारो भारतीय नतमस्तक होतात . परंतू दुर्दैवाने आम्ही त्याबद्दल वाद निर्माण केलेले आहेत . छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीची दुरवस्था पाहून इंग्रज अधिकारी अक्षरशः रडले होते . ते म्हणाले होते की , ” इंग्रज लोक आपल्या राष्ट्रासाठी कामी आलेल्या घोड्याचे स्मारक अतिशय सुरेख व भव्य बांधतात . तर एकीकडे नवीन स्वराज्य निर्माण करणाऱ्या जगातील एकमेव शूर व महाबलाढ्य लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी अत्यंत ओबडधोबड दगडी बांधलेली आहे . ‘” छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची थोरवी सांगताना युरोपियन इतिहासकारांनी म्हणले आहे की , ” बरेच झाले की छत्रपती शिवाजी महाराज जमीनीवर जन्माला आले . अन्यथा ते जर एखाद्या समुद्र किनारी जन्माला आले असते तर त्यांनी सातही महासागरासह सर्वच पृथ्वी जिंकून मराठेशाही स्थापन केली असती . ” तसे झाले असते तर शिवराजमुद्रा प्रत्यक्षात विश्वव्यापी झाली असती . एवढे स्मारकाचे महत्व आहे .
याशिवाय याच बोर्डवर मोगलशाही , निजामशाही , आदिलशाही , कुतुबशाही , सिद्दी , पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रज मध्ये कार्यरत प्रमुख हिंदू मंत्री व सरदार यांची यादी दिली पाहिजे . आर एस एस च्या माध्यमातून औरंगजेब बादशहा कट्टर हिंदू विरोधक होता असे बिंबविल्या जात आहे . त्याच औरंगजेबाच्या प्रशासनात नव्वद पेक्षा अधिक मंत्री व सरदार हिंदू ब्राह्मण राजपूत मराठा होते . तर सोबतच सुमारे ३८ टक्के हिंदू सैनिक होते . औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरपणे हत्या केली होती हे खरे आहे . परंतू स्वतः औरंगजेब सच्चा सुन्नी व सुफी मुसलमान होता . या तत्वज्ञानाचा पालनकर्ता होता . इतिहासकारांच्या मते औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना मृत्यू दंड दिला होता . जे प्राचिन काळापासून भारतात देखील शत्रू करत असताना दिसतात . परंतू औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात यावेत असे आदेश दिले असण्याची शक्यता नाही . ही गोष्ट सर्वांनाच संशयास्पद वाटते . पुढे छत्रपती संभाजी महाराज यांची महाराणी येसूबाई, युवराज शिवाजी ( औरंगजेबाने ठेवलेले नाव शाहू , पुढे छत्रपती सातारा ) व इतर कुटुंबीय कबिला औरंगजेब बादशहाच्या कैदेत त्याच्या मृत्यूपर्यंत १७०७ असतात . या काळात औरंगजेबाने त्यांची महाराणी व युवराजांना शोभेल अशी काळजी घेतली . सुरक्षितता वा अन्य कारणांमुळे त्यांचे तंबूही आपल्या जवळ ठेवले . युवराज शाहूंच्या सर्वच शिक्षणाची व्यवस्था केली . त्यांचे विवाह लावून दिले . महाराणी येसूबाई यांच्या सोबत स्वतःची मुलगी झेबुन्निसा पूर्णवेळ ठेवली . सुमारे वीस वर्षांत एकदाही औरंगजेबाने कैदेत असलेल्या या कुटुंबातील सदस्य वा लोकांना हिंदू धर्म त्याग करून मुस्लीम धर्माचा स्वीकार करावा , अशी विनंती किंवा दमदाटी केली नव्हती . तसेच छत्रपती संभाजी महाराज यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यापूर्वी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना फक्त दोनच प्रश्न विचारले होते. पहिला — मराठ्यांच्या ताब्यात असलेली सर्व मालमत्ता किती आहे व कुठे आहे . ती आम्हाला द्यावी . दुसरा प्रश्न होता की मोगलशाही मधील कोण कोण प्रमुख सरदार तुमच्या सोबत मिळालेले आहेत . त्यांची नावे सांगा . ही माहिती दिली तर छत्रपती संभाजी महाराजांना मृत्यू दंड ऐवजी जन्मठेपेची शिक्षा दिली असती . परंतू छत्रपती संभाजी महाराजांनी दोन्ही प्रश्नांची माहिती दिली नाही . औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना मुसलमान धर्माचा स्वीकार करावा व जीवदान घेणे , अशा प्रकारे कधींही सूचना केली नव्हती . परंतू औरंगजेब बादशहा त्याच्या जीवनातील सर्व आनंद सुख सत्ता पैसा छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हरवून बसला होता . १६६५ मध्ये आग्रा येथील भेटीत अवघ्या नऊ वर्षांच्या युवराज संभाजीराजे यांना प्रेमाने वागवणाऱ्या औरंगजेबाच्या कल्पनेपलीकडे छत्रपती संभाजी महाराजांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले होते . आपल्या हातून आग्रा येथील भेटीत मोठी घोडचूक झाली होती , याचा सतत पश्चात्ताप औरंगजेबास होत होता .
असे असतानाही १६८९ ते १७०७ दरम्यान महाराणी येसूबाई, युवराज शाहू व इतर शाही मराठा मंडळींना औरंगजेबाने कैदेत असताना देखील सन्मानाने वागवले . कैद झाली तेंव्हा युवराज शाहू सुमारे सात वर्षांचे होते . तर कैदेतून सुटून स्वराज्यात परत आले तेंव्हा सुमारे पंचवीस वर्षांचे होते . या अठरा वर्षात कैदेत असताना देखील औरंगजेब बादशहाने युवराजांना शोभेल असे प्रशासकीय मुलकी व सैनिकी शिक्षण प्रशिक्षण दिले . एका स्वतंत्र राजाला आवश्यक असते एवढे तरबेज केले होते . महाराणी येसूबाई यांच्या सर्वच मानसन्मानात कमीपणा ठेवला नाही .
कदाचित याच कारणाने युवराज शाहू राजे यांच्या मनात औरंगजेब बादशहा बद्दल आदरभाव निर्माण झाला असावा . परिणामी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर युवराज शाहू राजे यांची सुटका होताच ते स्वराज्यात सुखरूप येण्यासाठी त्यांना सुरक्षित प्रवासासाठी सैन्य दिले . युवराज शाहू महाराज प्रथम सरळ स्वराज्यात न येता सरळ खुलताबाद येथील औरंगजेब बादशहाच्या कबरीच्या दर्शनासाठी गेले व कृतज्ञता व्यक्त केली होती . हा इतिहास आहे .
तसेच सरदार अफझलखान याचा मृत्यू झाला तेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या मृतदेहावर सन्मानजनक व इस्लामच्या रिवाजानुसार अंत्यसंस्कार करावेत अशी आज्ञा दिली होती . तसेच त्या ठिकाणी कबर बांधण्यासाठी आदेश दिले होते . एवढेच नाही तर कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था होण्यासाठी जवळील गावे जोडून दिले . वंशजांनी देखील या आदेशाची अंमलबजावणी करावी अशी सूचना केली होती . यामुळेच प्रतापगड पायथ्याशी असलेल्या अफझलखान कबरीचे जतन करणे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमासमोर नतमस्तक होणे आहे . बहुजन युवकांनी हेच ध्येय ठेवावे .
युवकांनो व विद्यार्थ्यांनो , विनंती आहे की कृपया खरा इतिहास समजून घ्या . सरदार अफझलखान व औरंगजेब बादशहा हे केवळ दोन माणसे नव्हते . तर त्या काळातील जगातील अत्यंत मुत्सद्दी , शूर व प्रचंड श्रीमंत सत्ताधारी होते . तर काही लाखांची फौज बाळगून होते . औरंगजेब बादशहा जगातील सर्वात पावरफूल सत्ताधारी होता . या तुलनेत मराठ्यांच्या ताब्यात केवळ लहानसा प्रदेश व मर्यादित फौज होती . आपल्याकडच्या अनेक उच्च शिक्षित व उच्च वर्णीय इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख साडेतीन जिल्ह्यांचा राजा असाच तुच्छतेने केला आहे . जगातील एक नंबरच्या बादशहाला मराठ्यांनी संपवले आहे हे सत्य महत्वाचे आहे . यात कोणत्याही प्रकारची धर्मांधता नव्हती . एवढेच नाही तर अनेक मोगल बादशहांची आई हिंदू होती .
समारोप — अफझलखान व औरंगजेब हे छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज , छत्रपती राजाराम महाराज , छत्रपती ताराराणी यांचे राजकीय शत्रू होतेच . याबाबत दुमत नाही . हे नवीन पिढीतील युवकांना समजण्यासाठी त्यांच्या कबरी सुरक्षित राहणे लिखित इतिहासापेक्षाही जास्त गरजेचे आहे .. कारण तेच समकालीन सत्य असते .
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगातील सर्वात बलवान औरंगजेब बादशहा याच्या विरोधात सन १७०० ते १७०७ छत्रपती महाराणी ताराबाई लढल्या . मराठ्यांचे राज्य भारताच्या चारही बाजूला पोचवण्यासाठी अवघ्या पंचवीस वर्षांच्या विधवा ताराराणी लढल्या . औरंगजेब बादशहाने छत्रपती ताराराणी सोबत तहाचा प्रस्ताव सादर केला होता . परंतू छत्रपती ताराराणी यांनी तो नाकारला . शेवटी छत्रपती ताराराणी यांच्याच काळात औरंगजेबाने अहमदनगर ( अहिल्यानगर ) येथे प्राण सोडला . छत्रपती ताराराणी यांनी पती छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर मराठेशाही पूर्ण ताकदीनिशी सांभाळली . याच कारणाने आम्हाला आजचा भारत देश दिसतो .
भारतीय सनातन धर्मातील सतीप्रथा नाकारुन हाती शस्त्र धारण करून आपल्या पतीच्या निधनानंतर मराठेशाही जीवंत ठेवून वाढवण्यासाठी जिजाऊ , ताराराणी , जिजाबाई कोल्हापूर , सरसेनापती उमाबाई दाभाडे , अहिल्याबाई होळकर , लक्ष्मीबाई यांचे योगदान महान आहे . म्हणूनच मराठ्यांचा इतिहास हा केवळ पुरुषांचाच इतिहास नाही . तर तेवढ्याच महापराक्रमी , मुत्सद्दी व बुध्दीमान महत्वाकांक्षी महिलांचा देखील इतिहास आहे . मोगल इंग्रज यांना मराठ्यांच्या महिलांचा सहभाग व पराक्रम माहीत होता . याच कारणाने त्यांनी पेशवे व काही मराठा सरदारांना हाताशी धरून छत्रपती शाहू महाराजांच्या महाराणी सकवारबाई यांना जबरीने सती दिले . सोबतच ताराराणी यांना राज्यकारभारात हस्तक्षेप करण्याची बंदी घातली होती . महाराणी सकवारबाई अत्यंत मुत्सद्दी राजकारणी व उत्तम प्रशासक होत्या . छत्रपती शाहू महाराजांना वारसदार सुपूत्र नव्हते . महाराणी ताराबाई प्रमाणेच सातारा गादी सांभाळून महाराणी सकवारबाई यांनी छत्रपती पदाची जबाबदारी संपूर्णपणे सांभाळली असती . तसे झाले असते तर पुढे मराठे व अब्दाली पानीपत युद्ध झाले नसते . मराठ्यांचे साम्राज्य व हिंदवी स्वराज्य अफगाणिस्तान , नेपाळ , म्यानमार सिमापलीकडे पोचले असते . मराठ्यांनी दिल्लीचे तख्त राखण्याऐवजी मराठा छत्रपती दिल्लीचे बादशहा झाले असते . परंतू दुर्दैवाने अल्पशा स्वार्थापोटी पेशव्यांनी महाराणी सकवारबाई यांना जबरदस्तीने सती दिले . एवढ्यावरच न थांबता लगेच पेशव्यांनी कोल्हापूर राज्य बळकावण्याचा प्रयत्न केला होता . कोल्हापूरच्या मुत्सद्दी महाराणी जिजाबाई यांनी पेशव्यांचा कुटिल डाव उधळून लावला होता . पेशवे तर हिंदूच होते . त्यांनी असे का केले ?? याचेही उत्तर मिळाले पाहिजे . हे उत्तर शोधण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजेत . छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले होते . परंतू नंतर तेच स्वराज्य राखून वाढवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या महिलांना विसरता येणार नाही … त्यांना विनम्र अभिवादन …
स्वराज्य संकल्पक , स्वराज्य निर्माते आणि स्वराज्य संरक्षक महामानवांना विनम्र अभिवादन .
जय जिजाऊ…
– पुरुषोत्तम खेडेकर चिखली