• 31
  • 1 minute read

काॅम्रेड शरद पाटील : जीवनदानी वामन मेश्राम चे पुनर्वसन करणारा महान दार्शनिक!

काॅम्रेड शरद पाटील : जीवनदानी वामन मेश्राम चे पुनर्वसन करणारा महान दार्शनिक!

            काॅम्रेड शरद पाटील यांच्या जन्माला आज शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या शतकी आयुष्याला अवघी ११ वर्षे बाकी असताना म्हणजे आजपासून अकरा वर्षांपूर्वीच, त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना आज दोन-तीन ठळक आठवणी फक्त नमूद करू इच्छितो.
धुळे सोडून मुंबईत येण्यापूर्वी, साधारण वर्षभर आधीच म्हणजे २००३ चं वर्ष असावं. बामसेफ या संघटनेत फूट पडली होती. बामसेफ चे संस्थापक असणाऱ्या कांशीराम यांच्यानंतर डी.‌के. खापर्डे यांच्या नेतृत्वाखालील बामसेफ जी प्रामुख्याने मेश्राम-बोरकर गट म्हणून अखिल भारतीय पातळीवर ओळखली जात होती; त्याच बामसेफ ची पुन्हा दोन शकले झाली होती. यावेळी, धुळे येथील बामसेफ कार्यकर्ते पूर्णपणे बी. डी. बोरकर यांच्या गटाकडे वळले होते! अपवाद केवळ नितीन गायकवाड यांचा होता. हे देखील वास्तव होते की, ज्या बाजूला नितीन गायकवाड असतील त्याच बाजूला अगदी हरहुन्नरी कार्यकर्ता असलेले सुनील लोंढे हे असणे स्वाभाविक होते.
धुळ्यात बामसेफ चे झालेले हे विभाजित झालेले कार्यकर्ते काॅम्रेड शरद पाटील यांच्या ‘असंतोष’ वर जाऊन – येऊन असतं. धुळ्यातील आख्खी बामसेफ बोरकरांच्याकडे गेली असताना, ‘मला जगण्याचा सापडलेला उद्देश म्हणजे वामन मेश्राम’ या टोकाच्या पातळीवर वामन मेश्राम यांच्याशी निष्ठा असलेले नितीन गायकवाड आणि सुनील लोंढे जवळपास एकाकी पडले होते.‌
फुटीचा वाद टोकाला भिडला असताना, त्याच दरम्यान एका रात्री भर पावसात, वीज गेलेली असताना; मी, मोगलाई च्या फुले नगरातील एका घरात दुसऱ्या मजल्यावर वास्तव्याला असताना, सहा फुटी उंचपुरा देह असलेल्या एक महान दार्शनिक असणारे, ऐंशी वर्षांचे काॅम्रेड शरद पाटील गच्च अंधारात नितीन गायकवाड आणि सुनील लोंढे यांना सोबत घेऊन, माझे वास्तव्य असलेल्या घरी पोहचले.‌ दारात येताच त्यांनी म्हटले, “चंद्रकांत, मी तुला नव्हे तुझ्या डी-कास्ट झालेल्या बायकोला भेटायला आलो. पुढे ते म्हणाले की, डी-कास्ट असणारे अनेक पुरोगामी मराठे मी पाहिले; परंतु, डी-कास्ट झालेले पुरोगामी माळी मी पाहिले नाहीत.‌” प्रमिला’शी त्यादिवशी काॅम्रेड भरभरून बोलले. हे बोलणं केवळ संभाषण नव्हतं; तर, प्रमिलावर त्यांनी आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत मुलीसारखं प्रेम केलं. त्या संदर्भातील अनेक आठवणी आहेत; परंतु, येथे नमूद करण्याच प्रायोजन नाही. असो.
प्रमिला’शी बोलून झाल्यावर काॅम्रेड’नी मला एक सुचना केली की, ‘ चंद्रकांत, वामन मेश्राम हे जीवनदानी कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ता जन्मत नसतो; तो घडवावा लागतो. याउलट, ब्यूरोक्रॅसीत असणारे षडयंत्र करून ते यशस्वी ठरवतात. त्यामुळे, मेश्राम उभे राहायला हवेत, ही माझी अपेक्षा तू पूर्ण करावी.‌
तसा मी काही बामसेफ चा कार्यकर्ता नव्हतो; तर, एक सहानुभूतीदार एवढीच भूमिका माझी होती. परंतु, काॅम्रेड शरद पाटील यांच्या सुचनेनुसार मी नितीन गायकवाड यांना साथ दिली. त्याचा एक परिणाम असा झाला की, बामसेफ मधून बाहेर काढल्या गेलेल्या वामन मेश्राम यांचा पहिलाच कार्यक्रम धुळ्यात शाळा नंबर १ मध्ये झाला आणि तो कार्यक्रम ‘माझ्या अपेक्षेच्या पलिकडे यशस्वी झाला,’ ही प्रतिक्रिया स्वतः वामन मेश्राम यांनी दिली होती. त्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माझे होते. त्याच्या सीडी माझ्याकडे अजून पडून आहेत.
वामन मेश्राम यांना बामसेफ मधून काढले गेले असतानाही बामसेफचा एक स्वतंत्र गट म्हणून त्यांचे जे पुनर्वसन झाले, त्यात काॅम्रेड शरद पाटील यांच्या भूमिकेचा मोठा वाटा होता.

‌‌काॅम्रेड शरद पाटील यांच्या संदर्भातील दुसऱी आठवण मुंबईशीच निगडीत आहे. मुंबईहून धुळे येथे गेलो की, ‘अंसतोष’वर जाऊन त्यांची भेट मी घेत असे. अशाच एका भेटीत त्यांनी माझ्याजवळ एक खंत व्यक्त केली की, ‘चंद्रकांत, देशातील सर्व प्रथितयश विद्यापीठांमध्ये माझी व्याख्याने झाली आहेत; परंतु, डॉ.‌आंबेडकर यांच्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये माझे व्याख्यान झाले नाही, याची मला खंत आहे. काॅम्रेड यांनी व्यक्त केलेली ही खंत मी, माझे मित्र तथा सिध्दार्थ काॅलेजमध्ये प्राध्यापक असणारे प्रा. विजज्ञ मोहिते यांच्याकडे व्यक्त केली. त्यांनी मला सोबत घेऊन प्राचार्य आणि मॅनेजमेंट सदस्यांशी चर्चा केली. ही चर्चा सहज फलद्रूप झाली. काॅम्रेड शरद पाटील यांचे व्याख्यान सिध्दार्थ काॅलेजच्या आनंद भवनमधील सभागृहात ठेवले गेले.
सिध्दार्थ काॅलेज मधील व्याख्यान होण्यापूर्वी काॅम्रेडनी मला आणि प्रमिला’ला धुळे येथे ‘असंतोष’वर बोलवून घेतले.‌ प्रमिलाशी त्यांच्या अगदी सहज गप्पा होत. त्यावेळी त्यांनी प्रमिला’ला म्हटले की, ‘व्याख्यानाच्या ९ दिवस आधी एका परडीत धान्य पेरून ठेव. त्यातून जे धान उगवेल, ते त्या परडीसह घेऊन व्याख्यानाच्या ठिकाणी यायचे.‌ त्यानंतर, मुंबईत आल्यावर प्रमिला’ने त्यांच्या व्याख्यानाचे आधी न‌ऊ दिवस एका नव्या परडीत धान पेरले. त्या हिरवेगार धानाची परडी घेऊन व्याख्यानच्या आदल्या संध्याकाळी त्यांचा मुक्काम असलेल्या हाॅटेलवर आम्ही पोहचलो.‌ खूप गप्पा झाल्या. प्रमिला’शी चर्चा करित आणि प्रमिलाला चळवळी विषयी ते बोलतं करत. व्याख्यानाच्या दिवशी मुक्काम स्थळापासून तर, व्याख्यानाच्या स्थळापर्यंत धानाची परडी (टोपली) प्रमिलाच्या डोक्यावर होती.
सिध्दार्थ काॅलेज च्या आऩद भवन येथे काॅम्रेड शरद पाटील यांनी दिलेल्या व्याख्यानानंतर मुंबईत दुसऱ्या दिवशी वाद उभा राहिला. या वादात लोकसत्ता मध्ये लेख लिहून पॅंथर आणि मांस मुव्हमेंट चे संस्थापक विचारवंत – साहित्यिक राजा ढाले यांनी उडी घेतली होती.‌
काॅम्रेड शरद पाटील यांनी मुंबईत केलेले हे व्याख्यान त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या तीन व्याख्यांनांपैकी एक आहे. जे प्रचंड गाजले होते. या व्याख्यानासाठी येताना त्यांची संपूर्ण देखभाल तत्कालीन बामसेफचे बोरकर गटामधील ताकदवर कार्यकर्ते आणि सध्या जाती उच्चाटन सभेचे ऍड. राहुल वाघ हे सोबत होते.
काॅम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त कोटी कोटी प्रणाम! 🙏

चंद्रकांत सोनवणे.

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *