- 58
- 1 minute read
…की सगळेच कोडगे माफीविर ?
अनहोनी को होनी कर दें होनी को अनहोनी
एक जगह जब जमा हो तीनो, फेकू, गुंडा और धनी !!!
इलेक्ट्रोल बॉण्डच्या निमित्ताने देशात अनहोनी झाली ! अनेकांचं पितळ उघडं पडलं . जो स्वत:ची प्रतिमा मि.जेम्स बॉण्डची करत होता तो आता मि.इलेक्ट्रोल बॉण्ड बनला ! निवडणुकीतील पारदर्शकतेच्या नावाखाली इलेक्ट्रोल बॉण्डचा कायदा करण्यात आला पण इलेक्ट्रोल बॉण्डच्या माध्यमातून कोणाकडून निधी मिळाला हे जाणण्याचा अधिकार जनतेला नाही अशी तरतूद करुन थेट लोकशाहीवर हात टाकला गेला. खुद्द सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं की ‘इलेक्ट्रोल बॉण्ड्स हे असंविधानीक आहेत’. न्यायालयाने हा कायदा रद्द केला. यामुळे एक इतिहास घडला. भारताच्या इतिहासात सरकारी भ्रष्टाचाराचा अशाप्रकारे पर्दाफाश होण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. हे शासन दु:शासन आहे हे सिद्ध झाले !!
जोपर्यंत एखादी व्यक्ती न्यायालयात दोषी ठरत नाही तोपर्यंत तिला गुन्हेगार मानले जात नाही. यापूर्वीच्या सरकारांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले, विदयमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तर ‘न खाऊंगा न खाने दुंगा’ म्हणत गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेससह सर्वच विरोधक भ्रष्टाचारी असल्याचा कांगावा करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. पण काँग्रेसच्या किंवा विरोधकांच्या कोणत्याही नेत्याला भ्रष्टाचाराबाबत न्यायालयात दोषी सिद्ध केल्याचं गेल्या दहा वर्षांत तरी दिसलं नाही. विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना आपण व आपला पक्ष धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे हे बिंबविण्याचाही त्यांनी आटोकाट प्रयत्न केला, त्यासाठी सरकारी तिजोरीतून करोडो रुपये उधळून प्रचार-प्रसिद्धीही केली.
एकतर एसबीआय ही माहिती देण्यास टाळाटाळ करत राहिली.न्यायालयाकडून वारंवार दम भरण्यात आल्याने एसबीआयची इज्जतही गेली व माहितीही द्यावी लागली. निवडणूक आयोगाने ती जाहीर केली आणि पुन्हा एकदा केवळ लोकशाहीचे वस्त्रहरणच नाही तर भारतमातेची विटंबना किती पाशवी पद्धतीने झाली आहे हे उघड झाले. ईडी, सीबीआय,आयकर व पोलिस विभाग यांचा शासकीय गुंडासारखा वापर करुन उद्योजकांकडून इलेक्ट्रोल बॉण्डच्या नावाखाली खंडणी वसुल करण्याचा धंदा सुरु होता की काय अशी शंका यावी अशी माहिती उघड होत आहे. या शासकीय यंत्रणांचा सुपारीबाज गुंडांप्रमाणे वापर करुन अनेक सरकारं पाडणं, विरोधकांना जेरीस आणणं, त्यांना तुरुंगात डांबणं व खंडणी वसुल करणं याचा आरोप होत होताच मात्र ‘इलक्ट्रोल बॉण्डने’ त्याचे पुरावेच समोर येतील अशी आशा आहे. कंपनीवर इडीचा छापा पडणं, इलेक्ट्रोल बॉण्डस खरेदी करणं आणि कंपनीला हजार करोडो रुपयांचे मोठमोठे सरकारी ठेके मिळणं अशी क्रोनोलॉजी अनेक प्रकरणांत दिसून येते. ‘खाऊंगा और खिलाऊंगा’ याची ही ‘चंदा दो, धंदा लो’ अशी गॅरंटीच जणू ! अनेक राज्यांतील सरकारं पाडण्याचा किंवा आमदार फोडण्याचा व देणगी देण्याचा कालावधीही जुळत असल्याची माहिती बाहेर येत आहे ! अनेक देणगीदार असे आहेत की, त्यांच्या कंपनी तोट्यात आहेत तर काहींचे वार्षीक उत्पन्न काही कोटींत आहे पण त्यांनी त्यापेक्षा कैकपटीने शेकडो कोटीं रुपयांचे बाॅण्डस् खरेदी केले आहेत. त्यामुळे कुणाचा काळा पैसा वळवला गेला की काय हाही प्रश्न पडला आहे.
देशात 16 लाख कंपन्या आहेत, त्यातील केवळ 3000 कंपन्यांनी इलेक्ट्रोल बॉण्ड खरेदी केलेत त्यातील केवळ 30 ते 50 कंपन्यांनीच 100 करोडपेक्षा जास्त किंमतीचे इलेक्ट्रोल बॉण्ड खरेदी केलेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीत सर्वाधिक इलेक्ट्रोल बॉण्ड सँटीआगो मार्टीन या ‘लॉटरी किंग’ च्या कंपनीने खरेदी केल्याचे समोर आले आहे. 2019 ते 24 या कालावधीत ‘फ्युचर गेमिंग ॲण्ड हॉटेल्स’ या लॉटरी कंपनीने 1300 करोड रुपयांचे इलेक्ट्रोल बॉण्ड्स घेतले. त्याच्या विरोधात इडीचा छापा मारण्यात आला, त्यानंतर काही दिवसांतच मार्टीन याने करोडो रुपयांचे इलेक्ट्रोल बॉण्ड खरेदी करण्यास सुरुवात केली, मार्टीनचा मुलगा परिवारवाद विरोधी भाजपात सहभागी झाला. विशेष म्हणजे या कंपनीवर बॉण्ड्स खरेदी केल्यानंतरही छापे पडत राहिले. प्रत्येक छाप्यानंतर ती बॉण्ड्स खरेदी करत राहिली.वेदांता, आधार पुणावाला (कोव्हीड व्हॅक्सीन बनविण्याचा ठेका मिळविलेला) अशी अनेक नावं उघड होत आहेत. अशी माहिती समोर आली आहे की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्याकाळात ज्यांचा 285 करोडचा मालमत्ता कर माफ करण्यात आला त्या टोरंट ग्रुप कंपनीनेही 185 करोड रुपयांची बॉण्ड खरेदी केली. या कंपनीचे चेअरमन सुधिर मेहता यांनी 2007 ते 2015 पर्यंत भाजपाला 33 करोड रुपयांची देणगी दिलेली होतीच. कोरोनाच्या काळात रुग्णांची लुट केल्याचा आरोप असलेल्या हॉस्पीटलनेही देणगी दिली आहे तर बोगदा, बुलेट ट्रेनचे काम मिळालेल्या मेघा इंजिनिअरींग या कंपनीने 966 कोटीची देणगी दिली आहे. ज्या बोगद्यात ऐन दिवाळीच्या काळात मजूर अडकून पडले होते त्या बोगद्याचा ठेका मिळालेल्या नवयुग कंपनीवरही इडीचा छापा पडला होता व त्यानंतर या कंपनीने 30 करोड रुपयांचे बॉण्ड खरेदी केले होते.यातील सर्वांधिक बॉण्डमधून भाजपाला निधी मिळाला आहे हे तर जगजाहीरच आहे याबाबत अजून तपशील यायचा आहे. असो !
उन्मादी राष्ट्रभक्ती व उन्मादी धर्माभिमान यांच्या गोळ्या देवून बहुतांश नागरीकांना गाफील ठेवून आपला कार्यभाग साधण्याचे हे षडयंत्र आहे. विरोधक याबाबत वारंवार आवाज उठवत होते मात्र त्यांकडे दुर्लक्ष करुन आपल्या समर्थकांना व अंधभक्तांना जास्तीत जास्त मुर्ख बनविणं आवश्यक मानून सतत भुलथापा मारत त्यांना आपल्या बाजूने ठेवण्याची निती योजन्यात आली. भक्तीत बुडालेल्या मुख्य धारेतील टीव्ही माध्यमांनी इलेक्ट्रोल बॉण्डसबाबतची सर्व माहिती दाबून टाकली. याबाबत कोणतीही माहिती भक्तांपर्यंत व सर्वसामान्य जनतेपर्यंत जाणार नाही यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत तरीही समाजमाध्यमांतून ही माहिती उघड होत आहे. पण त्याचबरोबर भाजपापेक्षा विरोधकांनाच जास्त देणगी मिळाल्याचे कुतर्कावर आधारीत बुद्धीभेद करणारे मॅसेजही वॉटसअपवर पसरविले जात आहेत. अर्थात यातही भक्तांना व सर्वसामान्य नागरीकांना मुर्ख बनविण्याची चाल आहे ! झुठ बोलो..झुठ बोलो..झुठ बोलो मिशनचाच हा भाग आहे !
यातून विरोधकांनाच फायदा झाला असेल व यात काही काळंबेरं नव्हतं तर ही माहिती का गुप्त ठेवायची होती ? एसबीआयने आपली प्रतिष्ठा पणाला लावून कोणाला वाचविण्याचा प्रयत्न केला होता ? हे प्रश्न तर आहेतच पण त्यापेक्षा आणखी काही प्रश्नांची उत्तरं सर्वांनी शोधायला हवीत. काही सामाजिक, राजकीय संघटना सतत नैतिकतेच्या गोष्टी करतात. धर्माच्या रक्षणाच्या तसेच राष्ट्रभक्तीच्या उन्मादी गोष्टी करतात. हे एवढे राष्ट्रद्रोही प्रकरण उघड होऊनही या संघटनांतील किंवा त्यांच्या समर्थकांपैकी एकाही माणसाची नैतिकता जागी झाली नाही याचेच आश्चर्य वाटते. अंधभक्तांचे समजू शकतो कारण त्यांचा मेंदु केव्हाच सडविण्यात आला आहे. पण स्व:तच्या बुद्धीमत्तेचा, नैतिकतेचा टेंभा मिरविणारेही का गप्प आहेत ? की त्यांच्यात एकही चांगला प्रामाणिक व नितीमान माणूस नाही, की जो याबाबतीत संबंधितांचे कान पिळेल. त्यांच्यात एकही जन नाही जो वैचारीक प्रामाणिकता दाखवून या अनैतिकतेबद्दल आवाज उठवेल ? की या संघटनांमध्ये सर्व अनैतिक व माफीविरच भरले आहेत? काय हा माफीविरांचा पक्ष आहे ? समाजात सभ्य म्हणून वावरणारी व प्रसंगी नैतिकतेवर ज्ञान पाजळणारी, काँग्रेस, डावे, तसेच इतर विरोधकांच्या भ्रष्टाचाराबाबत चवीने बोलणारी अनेक माणसं आपण ओळखतो, त्यांनीही याप्रसंगी कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळलेलं दिसत आहे, पण या भानगडीत ती नागवी झाली आहेत याची त्यांना जाणीव कशी नाही ? की त्यांना कोडगेपणाचा गुरुमंत्र मिळालेला आहे ?