- 27
- 1 minute read
खालील गोष्ट तर लहानपणापासून सर्वांना तोंडपाठ आहे…
बिरबल आणि बादशहा, बागेत फेरफटका , फक्त माणूस स्वार्थी नाही सगळ्या प्राणीमात्रात स्वार्थ भरला आहे बिरबलाचा सिद्धांत (?), तो सिद्ध करण्यासाठी पाण्याचा हौद , माकडीण , पिल्लू , पाणी नाकातोंडात जाऊ लागल्यावर माकडिणीने स्वतःचे पिल्लू पायाखाली घेतले ….. वगैरे. हि आपण ऐकलेली गोष्ट रिपीट करत नाही
पण खरे घडले होते ते वेगळेच होते.
_______
बिरबलाने हौदात पाणी सोडायला सांगितले ; माकडिणीला काही कळेना ; तिने पिल्लाला अजून घट्ट छातीशी धरले , पाणी वाढतच होते , माकडिणीच्या डोळ्यात आता कुतुहलाच्या जागी भीती स्पष्ट दिसू लागली होती
बिरबल आणि बादशाह आणि दोन तीन बागेतील सेवक काठावरून हे सारे बघत होते ;
आता माकडिणीने पिल्लाला खांद्यावर ठेवले आणि चित्कारायला सुरुवात केली ; समोरच्या माणसांच्या चेहऱ्यावरील निर्दयी , भीषण भाव बघून त्या “आईला” काय ते उमगले
सर्व शक्ती पणाला लावून तिने पिल्लाला हौदाबाहेर फेकले आणि दोन हातानी हौदाच्या कडा पकडून , होता नव्हता तो सर्व जोर लावून स्वतः देखील बाहेर आली
पिल्लाकडे एक कटाक्ष टाकून , पिल्लू सुरक्षित आहे याची त्या माकडिणीनें खात्री केली आणि क्षणार्धात आपला जबडा विचकत , मोठ्या उड्या टाकत , नखे काढत ती बिरबल बादशहा कडे झेपावली
बादशहा आणि बिरबलातील या भयनाट्याचा लेखक-दिग्दर्शक कोण हे माकडिणीने ओळखले आणि बिरबलाचे कपडे फाडले , चेहऱ्यावर नखांनी रक्त काढले , माकडिणीने आपल्या जबड्यानी त्याचा गालाचा तुकडा पाडला असता
पण तेवढयात खाविंद पळा , म्हणत बिरबलाने राजवाड्याकडे जिवाच्या आकांताने धूम ठोकली ; बादशहाच्या दोन तीन सेवकांनी बादशहाला उचलून , खान्द्यावरून धूम ठोकली
माकडीण त्यांच्यामागे धावली; तेवढयात तिला मागे सोडलेल्या पिल्लाचे ओरडणे ऐकू आले , आणि ती परत वळून पिल्लाकडे झेपावली
_______
रात्री बिरबलाची बायको त्यांच्या जखमांवर कैलास जीवन लावत असताना विचारत होती , काय झाल म्हणून; पण बिरबल बागेत पडलो आणि खरचटलं सांगत राहिला
दोन तीन दिवस बिरबलाने बादशहाला टाळले ; पण भेटल्यावर बादशाहने माकडिणीचा विषय काढलाच. प्रत्येक प्रजाती मध्ये आपल्या स्वार्थापलिकडे जाणारी, त्यासाठी किंमत मोजणारी, बंडखोर असतात. त्यांना अर्बन नक्सल म्हणतात. पण ते संख्येने अगदी नगण्य असता. आपला “सर्व प्राणिमात्र टू द कोअर स्वार्थी असतात” हा आपला सिद्धांत अबाधीत आहे असे बिरबल म्हणाला. खोट बोल पण रेटून बोल वाले लोक!
यथावकाश रिटायर झाल्यावर तत्वज्ञानात्मक निबंध लिहिताना त्यांनी ती “माकडीण- तिची पिल्लू- हौद-पाणी” हि कथा लिहिली ; जी आपल्या सर्वाना लहानपणापासून सांगितली गेली
_____
माकडिणीला लिहिता येत नव्हते , आणि बिरबल तर भाषेचा पोपट होता ! म्हणून ती गोष्ट बिरबलाने लिहिली तशीच पिढ्यानपिढ्या सांगितली गेली.
माकडिणीला आपल्या नावावर काय तत्वज्ञान खपवलं गेलं हे ताबडतोब कळायला मार्ग नव्हता ; पण काही वर्षानंतर बिरबलाने खोटे असे काहीसे लिहिले आहे हे तिला कळले
आता सगळे सोडून आपल्या पोटच्या पिल्लाना अक्षर ओळख करायची , जमेल तेवढे शिकवायचे , आपला इतिहास , आपल्या भावना , आपली स्वप्ने , आपल्या चुका आपणच लिहायच्या आणि मुख्य म्हणजे आपल्याबद्दल इतरांनी काय लिहून ठेवून गैरसमज पसरवले आहेत ते खणून आणि खोडून काढायचे यासाठी तिने कम्बर कसली
______
स्वतःच्या स्वार्थी वागण्याचे स्वतःशी समर्थन करण्याची , त्याला रॅशनलाईझ करण्याची बिरबलाची (अनेकवचनी) स्वतःची गरज असते /
म्हणून आजूबाजूला घडणाऱ्या घटना अर्धसत्य वापरून, त्यांचा आकार उकार हवतसा बदलून पसरवल्या जातात / जाऊ शकतात. कारण त्यांच्याकडे यंत्रणा आहेत ;
आपल्याला सांगितल्या गेलेल्या प्रत्येक काल्पनिक, अर्ध काल्पनिक कथा चिरफाड करून त्यांचे पूनरकथन करण्याची गरज आहे. या कथा आपली विचार करण्याच्या पद्धतीला आकार देतात. त्या त्याच उद्देशाने हेतुतः लिहिलेल्या असतात.
त्याला असत्य म्हणून ते नाहीसे होणार नाही. सजगपणे खरवडून काढावे लागणार. वरील बिरबल माकडीण स्टोरी सारख्या स्टोरी रिकास्ट कराव्या लागतील. काउंटर narratives रुजवावी लागतील.
संजीव चांदोरकर (१ नोव्हेंबर २०२५)