- 193
- 1 minute read
गडबड, घोटाळे करून निवडणूका जिंकल्याची नशा, माज, मस्ती छ. शिवाजी महाराज, फुले, शाहू ,आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रातील जनता नक्कीच उतरविल……!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 181
भाजपने जिंकलेल्या १४२५ उमेदवारामध्ये किमान एक हजार उमेदवार अन्य पक्षातून आणलेले !
सत्ता ही देश आणि जनतेच्या विकासासाठी असते हे १९४७ ते २०१४ या ६ ते ७ दशकाच्या काळात या देशातील जनतेने पाहिले आहे. सत्तेची नशा चढली की ती नशा उतरविण्याचे काम ही या काळात अनेकदा याच जनतेने केलेले ही आहे. ते ही आपण पाहिलेले आहे. पण गेल्या एका दशकात जे सत्तेवर आले आहेत, त्यांना केवळ सत्तेची नशाच नाहीतर माज आणि मस्ती ही आहे. पण या देशातील आणि छ. शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रातील जनता ही नशा, माज व मस्ती नक्कीच उतरविल यात ही काही शंका नाही. सत्तेची नशा, माज व मस्ती लोकसभा निवडणुकीत संविधानावर निष्ठा असलेल्या जनतेने उतरविली पण आहे. मात्र वोट चोरी करून निवडणुका जिंकण्याचा सपाटा लावलेल्या भाजपचा माज व मस्ती उतरताना दिसत नाही. महाराष्ट्रात विधानसभा व त्यानंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तो माज, असलेला मस्ती दिसत आहे. एकट्या भाजपने नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्तेचा दुरूपयोग व गडबड, घोटाळे करून ३००० सदस्य निवडून आणले आहेत, तर महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये १४२५ जागा जिंकल्याचा दावा भाजप करीत आहे. पण त्या कशा जिंकल्या आहेत ? हे राज्यातील जनतेला माहित असून त्याबद्दल सर्वत्र थू थू होत आहे. पण निर्लज्ज सदा सुखी, त्या प्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचे नेते वागत आहेत.

निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रियाच खरेदी करून भाजप निवडणुका जिंकत आहे. इतकेच नाहीतर ज्या निवडणुका जिंकल्याचा आणि सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा संघ, भाजप आणि अंधभक्त यांच्याकडून केला जात आहे, त्यांना इतकी ही अक्कल नाही की, या सर्व जागा लढविण्यासाठी त्यांच्याकडे साधे उमेदवार ही नव्हते. अन्य पक्षातील नेत्यांना ईडी, सीबीआयच्या धमक्या देऊन त्यांना पक्षात घेतले जात आहे, उमेदवाऱ्या दिल्या जात आहेत व गडबड घोटाळे करून त्यांना निवडून ही आणले जात आहे. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून गप्पा मारणाऱ्या भाजपकडे किमान निवडणूक लढविण्याची पात्रता असलेल्या उमेदवारांचा ही दुष्काळ आहे. ही वस्तुस्थिती आहे. मुंबई महानगरपालिका असो अथवा अन्य महानगरपालिका असोत भाजपच्या चिन्हावर १४२५ उमेदवार निवडून आल्याचा जो दावा केला जात आहे, त्यामध्ये किमान एक हजार उमेदवार अन्य पक्षातून आणलेले आहेत. नगरपालिका निवडणुकीतील चित्र ही यापेक्षा वेगळे नव्हते. निवडून आलेल्या तीन हजारामध्ये दोन हजार उमेदवार अन्य पक्षातून आयात केलेले आहेत.
निवडणूका लढविण्याचे व त्या जिंकण्याचे कसले ही मेरिट नसलेले व मेंदूची नसबंदी झालेले कार्यकर्ते, पदाधिकारी संघ व भाजपमध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेते ही असेच मेरिट नसलेले आहेत. पण सत्तेचा गैरवापर, ईडी, सीबीआयच्या धमक्या दिल्याने अन्य पक्षातून आलेल्यामुळे भाजप निवडणुका जिंकत आहे. धमक्यांना घाबरून जे अन्य पक्षातून आले, त्यांना वजा केले तर भाजपकडे काहीच शिल्लक राहणार नाही. संघ आणि भाजपच्या नेत्यांमध्ये धमक असेल तर आउट सोर्सिंगचा आकडा एकदा त्यांनी जाहीर करावा, म्हणजे त्यांना आपली स्वतःचीच लायकी कळेल.
बाळासाहेब ठाकरे यांनी संघ, भाजपसारख्या सापाशी दोस्ती, युती केल्यामुळे महाराष्ट्राचे व हिंदूचे ही वाटोळे….!
गेल्या २५ वर्षांपासून सत्ता असलेल्या शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळविण्याचा आसुरी आनंद भाजप साजरा करीत आहे. पण तो ही शिवसेनेच्याच गदारांमुळे मिळाला आहे, पण याकडे सोयिस्करपण दुर्लक्ष केले जात आहे. शिवसेना, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कडव्या हिंदुत्वाची साथ भाजपला मिळाली नसती तर आज ही भाजप सत्तेपासून कोसो दूर राहिला असता ही वस्तुस्थिती आहे. पण उपकाराची जाणीव ठेवण्याचा सुसंस्कृतपणा संघ व भाजपकडे नाही. प्रबोधनकार ठाकरे याचा वारसा असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या राजकीय जीवनात ज्या काही गंभीर चुका केल्या आहेत, त्यामधील ही एक गंभीर चूक आहे की, त्यांनी सापाची दोस्ती केली. बेगडी हिंदुत्ववाद्यांशी युती केली. अन् त्याची फळे हिंदू भोगत आहे. शिवसेना भोगत आहे. मराठी माणूस, मराठी भाषा व महाराष्ट्राच्या अस्मितेला याची फळे भोगावी लागत आहेत.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता राहिली असून विकास आणि सुरक्षितता याबद्दल गंभीरपणे काम करण्यात आले आहे. राहिला प्रश्न भ्रष्टाचाराचा तर मुंबई महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक, तो आकडा म्हणजे एक कुरनच आहे. या कुरणात अनेकजण चरले. मोठ मोठे घोटाळे ही झाले. अनेकांचे हात त्यात बरबटले आहेत. ठाकरे ही त्यात आहेत. अन शिवसेने सोबत सत्तेत वाटेकरी असलेली भाजप ही त्यामध्ये आहे. तरी ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १२५ हजार कोटींच्या ठेवी जमा करण्यात मुंबई महापालिकेला यश आले होते. या ठेवी गेल्या चार वर्षात फस्त करण्याचे व महानगरपालिका लुटण्याचे काम सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने केले आहे. आता जर मुंबईचा महापौर भाजपचा झाला तर अगदी दिवसा ढवळ्या महानगरपालिका लुटली जाईल यात काही शंका नाही. गुजरात लॉबी मुंबईचे लचके तोडायला टपून बसले आहेत. ते केवळ भाजपचा महापौर होण्याची वाट पहात आहेत.
महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी उद्धव सेनेचा महापौर झाला पाहिजे….!
राज्यात २९ महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या असल्या तरी सर्वच राजकीय पक्षांसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची होती. मुंबई ही मराठी माणसांची आहे. मुंबई म्हणजे मराठी भाषा, मराठी माणूस व महाराष्ट्राची अस्मिता आहे म्हणून मुंबईवर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेची सत्ता आली पाहिजे. मुंबईचा महापौर हा मराठी माणूसच झाला पाहिजे, अशी भावना राज्यातील जनतेची आहे व ती असणे स्वाभाविक आहे. पण ज्या भाजपला मुंबईवर आपला महापौर बसवायचा आहे, त्यांना ही सत्ता गुजराती असलेल्या अदानीसाठी हवा आहे. मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी अस्मितेला मूठमाती देण्यासाठी भाजपला मुंबईवर सत्ता हवी आहे. अन त्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा व गौतम अदानीच्या इशाऱ्यावर महाराष्ट्र द्रोही देवेंद्र फडणवीस चोखपणे जी हुजुरी करीत आहे.
काहीही, वाट्टेल ते करून भाजपला मुंबई महानगरपालिका काबीज करायची होती. त्यासाठी अदानीचा पैसा पाण्यासारखा वापरला गेला आहे. भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अनुक्रमे ज्या ८९ व २९ जागा मिळाल्या आहेत, त्या मतं खरेदी केल्यामुळे मिळाल्या आहेत. EVM मध्ये गडबडीत केल्यामुळे मिळाल्या आहेत. SIR च्या माध्यमातून मत बाद केल्यामुळे व बोगस मत नोंदवून घेतल्यामुळे मिळाल्या आहेत. मात्र या सर्वांवर मात करीत उद्धव ठाकरे यांनी एकहाती ६५ जागा निवडून आणल्या आहेत. निवडणूका लढविण्यासाठी पैसा नाही. चिन्ह बदलले आहे. मिडियाचे साथ नाही. मराठी माणूस विभागला गेला आहे. विकला जात आहे. गदारांसोबत उभा आहे. राज ठाकरे यांची दलित, मुस्लिम आणि परप्रांतीय मतदारांमध्ये प्रतिकूल प्रतिमा आहे, अशा परिस्थिती ६५ जागा जिंकणे अवघड होते. पण त्या जिंकल्या गेल्या. मुंबई व मराठी माणसाला आज ही उद्धव ठाकरे यांची व त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची गरज आहे, हेच त्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थिती मिळालेल्या ६५ जागांवरून स्पष्ट दिसते.
तसेच यावरून हे स्पष्ट झाले आहे की, उद्धव ठाकरे यांचा करिश्मा आज ही कायम आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले नसते आणि राज ठाकरेंच्या अनुपस्थितीत उद्धव ठाकरे आणि काँग्रेस व डावे, समाजवादी पार्टी एकत्रपणे निवडणूक लढली असती, तर महाराष्ट्र विरोधी शक्तीं भाजप व एकनाथ शिंदेचा मुंबई आणि महाराष्ट्रात धुव्वा उडाला असता. अन मुंबई महानगरपालिका अगदी सहज ताब्यात आली असती. राज ठाकरे यांना सोबत घेतल्याचा फायदा काय झाला माहित नाही. पण राज ठाकरे यांच्यामुळे परप्रांतीय, दलित, मुस्लिम मतांना मुकावे लागल्याने नुकसान जरुर झाले आहे. राज ठाकरे म्हणजे राज्यातील समाज मनाला झालेली खरुज आहे. ही खरुज बरी करून त्यांना सोबत ठेवली तरच उद्धव ठाकरे यांना भविष्य आहे. अन्यथा परिणाम भोगावे लागणारच.
….. तरच भाजपचा पराभव होऊ शकतो…..
गडबड, घोटाळे करून भाजप निवडणुका जिंकत आहे व भाजप आणि मित्र पक्षाच्या विरोधात असलेले विरोधक निवडणुकांमध्ये पराभूत होत आहेत. हे या देशातील मतदार उघड्या डोळ्याने पाहत असून हेच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत घडणार, याबद्दल या मतदारांमध्ये आता कुठलीच साशंकता राहिलेली नाही. यास छेद देण्याची गरज निर्माण झालेली आहे. विरोधकांनी भाजप करीत असलेल्या गडबड, घोटाळ्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहून एकत्रितपणे निवडणुका लढविल्या तर मतदारांमध्ये सकारात्मक संदेश जावू शकतो व भाजपचा दारूण पराभव होऊ शकतो. विरोधकांनी त्या दृष्टीने तयारी करून मतदारांचा आत्मविश्वास पुन्हा जागृत करण्याची आवश्यकता आहे.
राज्यातील व देशातील युवा, महिला, कामगार, शेतकरी, शेत मजूर, दलित इतकेच काय या देशातील बहुसंख्य हिंदू समाज ही भाजपच्या नीती, धोरणांवर नाराज आहे. मात्र त्यांच्या समोर भाजपला पराभूत करू शकेल, असा विरोधक पर्यायच उभा करीत नाहीत. त्यामुळे मतदार गोंधळलेला आहे. याच गोंधळाचा व विरोधकांच्या कमजोरीचा फायदा घेत भाजप निवडणुका जिंकत आहे. कमजोर विरोधक हेच पहिले आणि मुख्य कारण भाजपच्या विजयाचे आहे. त्यानंतरची कारणे ही विकला गेलेला निवडणूक आयोग, प्रशासन व दलाल मिडिया ही आहेत. हे ओळखणे अत्यंत गरजेचे आहे.
……………………
राहुल गायकवाड,
प्रवक्ता, महासचिव समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश
0Shares