- 54
- 1 minute read
गुरू विवेकी भला.!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 59
ही ओळ माझ्या आजवरच्या वाटचालीत खूप कमी लोकांच्या बाबतीत वापरावी वाटते. प्रवीण चव्हाण सरांना मी असं काही म्हटलंय हे आवडेल की नाही माहीत नाही. त्यांना मानणारे आम्हीं काही त्यांचे विद्यार्थी त्यांच्याबद्दल बोलताना मास्तर असाच उल्लेख करतो. तर मास्तरांचा हा फोटो पण २०११ ला यूपीएससी मराठी साहित्य आणि इतिहास ऑप्शनलच्या क्लासनंतर हळूच काढून ठेवलेला आहे. शिक्षक रॅशनल असेल तर त्यांच्या बोलण्या वागण्यातला फोकस हलत नसतो. फोटो काढू का असं तेव्हां विचारलं असतं तर म्हणले असते हे मेन्सच्या कुठल्या पेपरच्या कामाचं आहे? असेल तर काढ फोटो..
मास्तरांच्या बोलण्याचे भयानक दडपण येत असे. नॅशनल waste असे एखाद्या उत्तराकडे लक्ष वेधून ते म्हणाले की मेल्याहून मेल्यासारखे व्हायचे.
प्रवीण चव्हाण मास्तर खूप चहा प्यायचे. २०१० मध्ये त्यांना म्हणालो, ‘कॉलेजने माझ्यावर अन्याय केलाय.. आता पुन्हा फायनल इयरची परीक्षा द्यायला कॉलेजला जाणे मला पटत नाही. हे लोक माझे आयुष्य नियंत्रित करू शकत नाहीत. सोडतो इंजिनिअरिंग. यूपीएससी देतो..’ मास्तर चहा पीत म्हणाले,’ सोडून दे..’ मास्तर सकाळी सात ते दुपारी दोन सलग लेक्चर घेत. त्यांच्याकडे मराठी साहित्य, इतिहास दोन्ही ऑप्शनलची तयारी केली. मास्तरांनी इतिहास, साहित्य, समाज, प्रशासन याकडे कसं पाहावं याची वेगळी दृष्टी दिली.
आज मी जो कोणी आहे तो सरांमुळे. शासकीय सेवेसाठी अकादमिक पाया उपयोगाचा ठरतो. पण यूपीएससीची (२ ऑप्शनल होते तेव्हाची तरी) विद्याशाखेकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी आहे. “What is history” हे historiography वरचे त्यांचे लेक्चर, वसाहतवाद- साम्राज्यवाद यांच्यावरचे लेक्चर, आधुनिक समीक्षा सिद्धांतावरचं, साहित्याच्या स्वरुपावरचं लेक्चर ऐकणे हा इतका समृध्द करणारा अनुभव असे. सरांनी राम बापट सरांचे स्टडी सर्कल ऐकले आहेत. राम बापट सर मला चव्हाण मास्तरांच्या मार्फत भेटले. माणसं बोलतात एक वागतात दुसरं. त्याला अपवाद खूप कमी असतात. मास्तरांच्या जगण्यातली तत्त्वनिष्ठा यावर वेगळ्याने लिहावे लागेल.
यूपीएससीचा अभ्यास हा प्रशासकीय नैतिकतेसाठी, संविधानिक लोकशाहीच्या स्तंभाच्या रूपाने काम करण्यासाठी करायचा असतो. न्याय, समता, बंधुभाव भगिनीभाव या संकल्पना आत रुजवाव्या लागतात. या शिकण्याचे महत्त्व मला आजही जाणवते. त्यासाठी किंमत चुकवण्याचे धैर्यपण येते. आणि लौकिकार्थाने म्हणाल तर मास्तरांमुळेच मी आज आयएएस आहे हे म्हणण्यात मला कमीपणा नाही.
मास्तर अजिबात कौतुक करत नाहीत. फक्त ‘ हे यूपीएससी आहे बघा’ असे सरांचे वाक्य ज्याच्याबद्दल क्लासमध्ये यायचे त्या पोराची/ पोरीची कॉलर आठवडाभर टाईट असे.. हे लिहिताना पोराची सोबत पोरीची शब्द लिहिणं आता आपसूक घडतं. Gender studies, subaltern studies, indology कितीतरी गोष्टी आंतरविद्याशाखीय वगैरे शब्द वापरून सांगितल्या जातात. मास्तरांनी हे सहजपणे शिकवलं. मास्तर महात्मा फुल्यांचा सार्वजनिक सत्यधर्म, नामदेवांची अभंगवाणी वगैरे शिकवताना वेदांत, चार्वाक, भक्ती परंपरेपासून अस्तित्ववादापर्यंत कुठे कुठे नेऊन आणत. या सगळ्या थियरीच्या पलीकडे व्यक्ती समष्टीची व्यापक जाणीव, संवेदना त्यांनी आमच्यात रुजवली.
मराठी साहित्याच्या बाबतीत लेखकराव, समीक्षकराव खूप आहेत. मास्तरांइतक्या उंचीचा अभ्यासक आज क्वचितच कोणी असेल. सरांना भेटतो बोलतो तेव्हां आता मात्र ते मित्र वाटू लागले आहेत. माझं मराठवाडा १९४८ त्यांना वाचायला दिलं तर चक्क आवडलं म्हणाले. मग प्रश्न विचारू लागले. मग जाणवलं आपलं काही खरं नाही. मास्तर लक्ष देऊन आपलं बोलणं ऐकत असताना आजही दडपण येतं हे नक्की. मास्तरांनी किती पोरांना मदत केलीय याबद्दल बोलणं त्यांना आवडणार नाही.
खूप आठवणी किस्से आहेत त्यांचे. किती लिहिणार? तूर्तास प्रवीण चव्हाण सरांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !!
ReplyForward Add reaction |
0Shares