माणिक सीताराम गोडघाटे उर्फ ग्रेस यांचा आज जन्मदिन. पूर्वास्पृश्य बहिष्कृत जातीत जन्मूनही दलित साहित्यिक अशी छाप नसलेले व मुख्य प्रवाही साहित्य परंपरेतही न बसणारे, आपल्या स्वतंत्र शैलीने ‘अनुवंशहीन’ काव्य व गद्य लेखन करणारे ते मराठीतील एकमेव प्रतिभावंत म्हणता येतील. त्यांचा पंथ निर्माण होणेही दुष्कर असल्याने त्यांचे साहित्य ‘निर्वंश’च राहील अशी चिन्हे आहेत ! ही स्वतंत्र वाट चोखाळताना कवी हतबल आहे. ” भाषाच ही निकामी, शब्दासही पुरेना, संवेदनाच द्यावी अर्थास काय पुन्हा ? ” हा प्रश्न जसा त्यांनी एकेठिकाणी विचारला आहे तसाच … ” ज्या भाषेत मी जन्माला आलो तिथेही अनाथ वाटते मला ! ” अशीही व्यथा दुसरीकडे प्रकट केली आहे. ग्रेस यांनी दु:ख टेकविण्यापुरती थोडीशी संदिग्धता मागत आपली गूढ, नादमयी व म. सु. पाटील यांच्या शब्दांत सांगायचं तर ‘मंत्र कविता’ लिहिली. विलक्षण व विलोभनीय प्रतिमा सृष्टी, प्रतीकांनी ओतप्रोत, अशा त्यांच्या कवितेभोवती एक तरल धुक्याचे तलम अवगुंठन असते. आणि हा सर्व नजारा त्यांनी अक्षरवृत्तांमध्ये ‘सिद्ध’ केलेला असतो. मुक्तशैलीचा वापर क्वचितच केला आहे. ग्रेस यांच्या कवितेवर, ललितबंधांवर दुर्बोधतेचा शिक्का बसूनही मराठीतील प्रथितयश समीक्षकांना ग्रेस यांच्या कवितेवर भाष्य करण्याचा मोह आवरता आलेला नाही. समीक्षकांपुढे अर्थनिर्णयनाचे मोठे आव्हान ग्रेस वगळता मराठीतील दुसऱ्या कुठल्याही साहित्यिकाने उभे केलेले नाही व हीच त्यांची महत्ता सामान्य वाचकांचा विचार करता, ग्रेस यांची मर्यादा ठरली आहे. दु:खाकडे ‘समर्थ वैभव’ म्हणून पाहू शकणारा व मानवी अस्तित्वाशी असलेला दु:खाचा अटळ अनुबंध स्वीकाराहार्य व्हावा अशा प्रकारे वाचकाला आश्वस्थ करणाऱ्या ग्रेस यांना सलाम ! मी महाकवी दु:खाचा प्राचीन नदीपरि खोल दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल