- 81
- 1 minute read
घटस्थापना शेतीचा शोध लावणाऱ्या महामातांचा सन्मान !
घटस्थापना शेतीचा शोध लावणाऱ्या महामातांचा सन्मान !
निसर्गातील कोणताही सजीव हा स्वतंत्रपणे तयार झाला नाही, तर तो प्रत्येक टप्प्यावर उत्क्रांत होत आलेला आहे, ती एक रासायनिक प्रक्रिया आहे, असे जगविख्यात मानवशास्त्रज्ञ (Anthropologist) डार्विन यांचे मत आहे. मानव हा देखील निसर्गातील एक प्राणीच आहे. तो देखील उत्क्रांत होत आलेला आहे. एका विशिष्ट टप्प्यावर तो मानवासारखा दिसायला लागला. सुरुवातीच्या अवस्थेला एस्ट्रोलोपिथिकस असे मानवशास्त्रज्ञांनी त्याला नाव दिले. तिथपासून आजपर्यंत सुमारे 40 लाख वर्षांचा प्रवास आहे, असे मानले जाते. सुमारे 70 हजार वर्षांपूर्वी बोधात्मक क्रांती (cognitive revolution) झाल्यानंतर त्याचा विकासाचा वेग झपाट्याने वाढला.
भटक्या अवस्थेतला माणूस स्थिर कसा झाला, तर त्याला शेती हेच महत्त्वाचे कारण आहे. पेरलेले उगवते हे प्रथमता स्त्रीच्या लक्षात आले, हा काळ आतापासून सुमारे दहा हजार वर्षांपूर्वीचा म्हणजेच नवाश्मयुगाचा ( Neolithic ) काळ आहे. जगविख्यात प्राच्यविद्यापंडित शरद पाटील म्हणतात “प्रसवक्षमता ही स्त्रीकडे असल्यामुळे पुरुषापेक्षा स्त्री अधिक सृजनशील आहे, त्यामुळे निसर्गाने अपत्यप्राप्तीची जबाबदारी स्त्रीकडे दिलेली आहे” हेच कारण आहे की पुरुषांपेक्षा स्त्री अधिक नवनिर्मितीक्षम, सृजनशील आहे.
स्त्रीने शेतीचा शोध लावला. त्यामुळे भटकणारा मानवी समूह नदीकिनाऱ्यावर स्थिर झाला. म्हणून जगातल्या सर्व संस्कृतीची निर्मिती सुरुवातीच्या काळात नदीकिनाऱ्यावर झाली. उदाहरणार्थ हरप्पा, मोहोंजोडारो, जोर्वे, दायमाबाद, इनामगाव, वाकाव इत्यादी. अन्नाची खात्री मानवाला मिळाली. मानवाला अन्नासाठी भटकण्याची आवश्यकता संपली. सुरुवातीची शेती नदीकिनारी गाळपेराची होती. भारतासह मोसोपोटोमिया, इजिप्त इत्यादी जगभरात शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, असे शरद पाटील म्हणतात.
बृहत्तर भारतीय परिप्रेक्ष्यात निर्ऋती
ही स्त्रीसत्ताक राज्याची आद्य महाराणी आहे. तिने सप्तसिंधूच्या खोऱ्यात पहिली शेती केली. ते ठिकाण म्हणजेच आजचे बलुचिस्तान येथील मेहरगढ असले पाहिजे. त्यानंतर हरिती, उर्वशी, ताटका, शूर्पणखा, मावळाई, अंबाबाई, तुळजा अशा कर्तृत्ववान स्त्रिया भारतात होऊन गेल्या. भारताप्रमाणेच जगात देखील स्त्रीसत्ताक राज्यव्यवस्था होती, असे शरद पाटील सांगतात. भटक्या अवस्थेतील मानवाला अन्नाची खात्री नव्हती, त्याला सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत अन्नाच्या शोधात भटकावे लागत असे. शेतीचा शोध लागल्यानंतर अन्न मिळण्याची खात्री मानवाला मिळाली.
मानवी समूहाला अन्नधान्याची खात्री स्त्रीने दिली. तिच्या ऋणातून मुक्त होण्याचा कार्यक्रम म्हणजेच घटस्थापना होय. आपण घटस्थापना करतो, नऊ दिवस देवीचा उत्सव करतो. हा स्त्री संस्कृतीचा आदर आहे. महिलांनी सर्व मानवी समूहाला भटक्या अवस्थेतून मुक्त करून एक खात्रीलायक, सुरक्षित आणि हमी असणारे दर्जेदार जीवन बहाल केले. म्हणून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण देवीचा उत्सव करतो.
सप्तसिंधूच्या खोर्यातील महाराणी म्हणजे निर्ऋती होय. हडप्पा मोहेंजोदडो अर्थात सिंधू संस्कृतीची जन्मदात्री म्हणजेच निर्ऋती होय. हाताच्या बोटाच्या सुंदर नखावर लीलया सूप धरून धान्य पाकडणारी जनस्थान तथा गोदावरी अर्थात नाशिकच्या स्त्री राज्याची महाराणी म्हणजे शूर्पणखा होय, असे शरद पाटील सांगतात. नर्मदेच्या खोऱ्यातील महाराणी म्हणजे ताटका होय. इंद्रायणीच्या खोऱ्यात मावळाईचे राज्य होते, त्यावरूनच मावळा हा शब्द आला. तालुक्याचे नावदेखील मावळ असे आहे. इतिहास असे सांगतो की स्त्री हिम्मतवान, कर्तृत्ववान, बुद्धिमान आहे.
तेरणा-मांजरा नदीच्या खोऱ्यातील आपल्या राज्याच्या उत्पादनाचा भाग प्रजेला समान वाटप करणारी स्त्रीराज्याची महाराणी म्हणजे तुळजा ! (तुला म्हणजे मोजणे, मापने) तुळजा म्हणजे आपल्या राज्यात समानता आणणारी व समान वाटप करणारी महामाता होय. तिची राजधानी तुळजापूर आहे. पंचगंगेच्या खोऱ्याची महाराणी म्हणजे अंबाबाई होय. या सर्व कर्तृत्ववान, हिम्मतवान, महाबुद्धिमान, सृजनशील, नवनिर्मिती करणाऱ्या, सकल मानव समूहाचे पालन-पोषण करणार्या महामातांचा आदर-सन्मान म्हणजेच घटस्थापना नवरात्र उत्सव होय. घटस्थापना, नवरात्र म्हणजे तमाम स्त्रियांचा आदर-सन्मान करणारा सण-उत्सव आहे.! अशा
घटस्थापना-नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !
– डॉ.श्रीमंत कोकाटे