- 5
- 1 minute read
घरोघरी संविधान अभियानाअंतर्गत सर्व शासकीय कार्यक्रमात संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवण्याचे आदेश सरकारने काढावेत
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 30
घरोघरी संविधान अभियानाअंतर्गत सर्व शासकीय कार्यक्रमात संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवण्याचे आदेश सरकारने काढावेत
संविधान जागृतीसाठी, आमच्या विनंतीनुसार राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 24 नोव्हेंबर 2008 ला., शालेय शिक्षण विभागाने 4 फेब्रुवारी 2013 ला जीआर काढला. त्यानंतर वेळोवेळी आदेश निघत गेले. शासनाच्या ग्राम विकास विभागाने 2020 मध्ये असे आदेश काढले होते की प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन करण्यापूर्वी संविधानाची प्रास्ताविका चे वाचन करावे. संविधानाला 75 वर्ष झालेत म्हणून घर घर संविधान हे अभियान सरकारने 10 ऑक्टोबर 2024 च्या आदेशाने सुरू केले. या वर्षीच्या सर्व शासकीय कार्यक्रमात, प्रजासत्ताक दिनाच्या सर्व कार्यक्रमात संविधान प्रास्ताविक वाचले गेले का? नसेल तर का नाही? शासनाच्या 10 ऑक्टोबर 2024 च्या आदेशाची अंमलबजावणी किती झाली? संविधाना मुळे सत्तेत आलेल्या सरकारने याबाबत खुलासा करण्याची गरज आहे. एकूणच , संविधाना बाबत शासकीय विभाग उदासीन आहे असे बोलल्या जाते. ते का? फक्त आदेश काढून थांबू नये, अंमलबजावणी करावी.
2. यावर्षीच्या प्रजासत्ताक /गणतंत्र दिवसाच्या कार्यक्रमात नाशिक येथे. घडलेली घटना, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख भाषणात केला नाही. त्यामुळे माधवी जाधव या महिला कर्मचाऱ्याने प्रश्न उपस्थित केला. प्रश्न विचारण्याची हिंमत केली ते योग्यच केले. माधवी जाधव यांच्या मनाला वेदना झाल्यात म्हणून त्यांनी पालकमंत्री यांचे भाषणावर आपले मत नोंदविले. हा अधिकार त्यांना व आपणाला प्रत्येकाला संविधानाने दिला. चुकीचे घडत असेल तर प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे म्हणून माधवीचे अभिनंदन. पालकमंत्री यांचे चुकलेच. प्रश्न हा ही उपस्थित होतो की पालकमंत्री यांचे भाषण कोणी लिहून दिले आणि कोणी approve केले. सर्वसाधारणपणे अशा राष्ट्रीय सणाच्या शासकीय कार्यक्रमाचे भाषण जिल्हा माहिती अधिकारी तयार करतात आणि जिल्हाधिकारी approve करतात. पूर्वी असे होत होते, आता असे होते की नाही माहीत नाही.
3. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत. संविधान सभेने या शब्दात बाबासाहेब यांचा गौरव केला आहे. संविधान निर्माण चा हा इतिहास माहीत करून घ्यायला पाहिजे. बाबासाहेब हे आधुनिक भारताचे निर्माते आहेत. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी , बाबासाहेब यांनी दिलेल्या संविधानिक नीतिमत्तेचे आचरण करण्याची गरज आहे. भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला अर्पण झाले म्हणून संविधान दिवस आणि दोन महिन्यांनी 26 जानेवारी 1950 ला पूर्णतः लागू झाले म्हणून प्रजासत्ताक दिवस आला. संपूर्ण स्वराज्य चे स्वप्न पूर्ण झाले. लोकांचे राज्य सुरू झाले. लोकांनी निवडून दिलेले लोक प्रतिनिधी व राजकीय पक्ष यांचे हातात सत्ता दिली. लोककल्याणाचे , देश घडविण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे करावे असा संविधानाचा सम्यक संकल्प आहे. संविधानाने निर्माण केलेल्या संस्था -कायदेमंडळ, कार्यपालिका व न्यायपालिका यांचे वर फार मोठी जबाबदारी दिली आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेत सांगितलेले व निर्धारीत केलेले ध्येय व उद्दिष्टपूर्ती ची जबाबदारी या तिन्ही संस्थांवर आहे. या संस्था मधील लोक संविधाननिष्ठ नसतात तेव्हा असे अप्रिय प्रसंग घडतात. तेव्हा अशाना, मग ते मंत्री असोत, अधिकारी असोत की न्यायाधीश असोत , त्यांना संविधानाच्या निर्माण इतिहासाची आठवण करून द्यावी लागते. हे काम माधवी जाधव या कर्मचाऱ्याने केले. सरकारच्या मानसिकतेवर चर्चा तर सुरू झाली. अशी चर्चा होणे लोकशाही मजबूत होण्यासाठी आवश्यक आहे.
4. शासनाने संविधानाचा अमृत महोत्सव साजरा केला 2024-25 मध्ये. आदेश काढले. जागृती करण्याचा प्रयत्न सुरू केला. तरी अधिकारी व मंत्री यांना संविधानाचे महत्त्व समजत नसेल तर चिंतन करण्याची गरज आहे. खरं तर सरकारने आता आदेश काढला पाहिजे की सर्व प्रकारच्या प्रत्येक शासकीय कार्यक्रमात संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवावी व अभिवादन करावे. बाबासाहेब यांनी संविधान लिहिले, देशाला संविधान दिले असे राज्यकर्ते सांगत असतात, गुणगान करतात, ते लेटर व स्पिरिट मध्ये असले पाहिजे. ढोंगीपणा नको. तेव्हा, मुख्यमंत्री जी सामान्य प्रशासन विभागाकडून काढा असा आदेश, बाबासाहेब नजरेसमोर राहतील तर विसर पडणार नाही. बाबासाहेब यांची प्रतिमा शासकीय कार्यक्रमात ठेवायला अडचण का यावी? परंतु हे घडत नाही. म्हणून, सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढावेत. लेखी आदेशाशिवाय कोणाला काही करायचे नसते आणि आदेश असले तरी सोयीने करायचे असते. प्रशासकीय व्यवस्थेची ही मानसिकता जातीय वादाची आहे असे का म्हणू नये. माधवी जाधव यांच्या रोषाचे हे एक कारण असू शकते.
5. तसेही प्रत्येक चांगली गोष्टी सुरू करण्यासाठी सरकारी आदेशाची गरज नसते. आम्ही 2005 मध्ये संविधान प्रास्ताविक शाळेच्या भिंतीवर दर्शनी भागात लिहून रोज वाचन सुरु केले, नागपूर जिल्ह्यातून. 2005 मध्ये 26 नोव्हेंबर ला. आम्ही नागपूर येथे संविधान दिवस साजरा केला. देशात पहिल्यांदा हे घडले. मी नागपूर जिल्हा परिषद चा सीइओ होतो. आम्ही सुरू केलेला हा संविधान जागृतीचा , घर घर संविधान पोहचवण्याचा उपक्रम आहे. तेव्हा कुठे सरकारचे आदेश होते? आम्ही सुरू केले, पाठपुरावा केला तेव्हा कुठे सरकारने नंतर आदेश काढलेत. आता देशभर संविधान दिवस साजरा होतो आणि प्रास्ताविक वाचले जाते. 2005 पूर्वी हे होत नव्हते. संविधाना नुसार राज्यकारभार करणे हे सत्ताधाऱ्यांचे कर्तव्य व जबाबदारी आहे. जबाबदेही सुद्धा आहेच. संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच संविधान सभेतील मान्यवर सदस्य यांचेप्रती सन्मान, आदर व कृतज्ञता व्यक्त करणे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. मंत्री व अधिकारी यांचे तर आहेच. संविधान सभेत बाबासाहेब यांचे कार्याचा गौरव झाला आणि सदस्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. हा इतिहास आहे.
6. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचे निमंत्रण व विनंती पंडित नेहरू यांनी केली होती. बाबासाहेब देशाचे पहिले कायदामंत्री झालेत. बाबासाहेब यांना संविधान प्रारूप समितीचे/मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून संविधान सभेने एकमताने दिनांक 29 ऑगस्ट 1947 ला निवड केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कट्टर विरोधक सरदार वल्लभभाई पटेल यांना डॉ आंबेडकर विरोधकाने प्रश्न विचारला,” डॉ आंबेडकर हे गांधीजींचे टीकाकार व काँग्रेस चे विरोधक असतानाही त्यांची अध्यक्षपदी निवड का केली?” त्यावर वल्लभ भाई पटेल यांनी दिलेले उत्तर असे की,”तुम्हाला घटनानिर्मितीबाबत काय कळते? आम्हाला या कार्यासाठी डॉ आंबेडकरपेक्षा श्रेष्ठ व्यक्ती सापडणे शक्य नव्हते. आम्ही सर्वश्रेष्ठ व्यक्तीची निवड केली.” सरदार वल्लभ भाई पटेल यांचे गुणगान गाणाऱ्या नेत्यांनी हा इतिहास वाचावा. जेव्हा संविधान सभेत बाबासाहेब आंबेडकर यांचा , संविधानाचे निर्माते, मुख्य शिल्पकार , घटना पंडीत म्हणून जयघोष होत राहिला तेव्हा जातीय द्वेषामुळे काहींनी श्रेय द्यायला मनाचा मोठेपणा दाखविला नाही. शंकराचार्य डॉ कुर्तकोटी करपात्रीजी महाराज यांचे विधान प्रमाण मानण्याची मानसिकता आजही गेली नाही. शंकराचार्य करपात्रिजी म्हणतात, “आमची राज्यघटना अत्युत्तम आहे. परंतु तिचा एकच दोष आहे की ती एका अस्पृश्याने निर्मिलेली आहे.”आजही देशात वर्णव्यवस्था जातीभेद _विषमता जोपासणारी माणसे आहेत. या मानसिकतेमुळे संविधान बदलण्याची भाषा बोलतात आणि प्रजासत्ताक दिनासारख्या महत्त्वाचे शासकीय कार्यक्रमात बाबासाहेब यांची प्रतिमा नसते आणि नावाचा विसर पडतो.
7. भारत देश ही बुद्धाची भूमी आहे. संविधानाची महानता जगात पोहचली आहे. बाबासाहेब हे जगमान्य व्यक्ती आहेत, नेते आहेत, विश्वरत्न आहेत. बाबासाहेब यांचा सन्मान , आदर जग करते , त्यांच्या विद्वत्ता व कार्यामुळे, निष्कलंक चारित्र्य व स्वाभिमानी म्हणून त्यांचा जगात नावलौकिक आहे. म्हणून तर जगात भारताचे नाव आदराने घेतले जाते. खरे विश्वगुरु बाबासाहेब आहेत. परंतु, आजच्या राजकारण्यांना, नेत्यांना , मंत्र्यांना , अधिकाऱ्यांना बाबासाहेब अजून समजले नाही. त्यांना बाबासाहेब अडचणीचे वाटतात. सत्ता मिळविण्या पुरता नावाचा वापर होतो. बाबासाहेब समजून घेण्यासाठी स्वतःकडे नीतिमत्ता पाहिजे, निष्कलंक चारित्र्य पाहिजे, स्वाभिमान पाहिजे, समानता, स्वातंत्र्य, बंधुता , न्याय, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, बुद्धिप्रामाण्यता, विज्ञाननिष्ठा, प्रामाणिकपणा, राष्ट्रीय भावना, प्रथमतः भारतीय अंतिमतः भारतीय असल्याची जाण पाहिजे, संविधानवाद हाच राष्ट्रवाद ,अंगी असावा लागतो. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील पहिले भाषण दिनांक 17 डिसेंबर 1946 चे व अंतिम भाषण दिनांक 25 नोव्हेंबर 1949 चे वाचन कार्यक्रम अधिकारी व लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्यासाठी आयोजित करावे, चर्चा घडवून आणावी अशी विनंती मुख्यमंत्री यांना करावीशी वाटते. ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांनी शहाणपणाने, विवेकाने, वागण्याची गरज आहे. तर,अशा अप्रिय घटना घडणार नाहीत. यासंदर्भात सरकारने आदेश काढले तर चांगलेच होईल. बाबासाहेब यांना वाचा , विचार आचरणात आणा , देश समृध्द व शक्तिमान होईल. विकसित महाराष्ट्र @२०२४. साठी आवश्यक हेच आहे.
इ झेड खोब्रागडे
0Shares