महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-१५ (१९ जुन २०२४)
बुध्दांची तत्वे: अहिंसा म्हणजेच बुध्दांच्या शिकवणुकीचे सार आणि शेवट आहे, असे समजण्यात येते. बुध्दांची शिकवण किती विस्तृत आणि अहिंसेच्या कितीतरी पलीकडे आहे, हे क्वचितच कोणाला माहीत असते. अशा प्रकारचे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काठमांडू (नेपाळ) येथे भरलेल्या चौथ्या जागतिक बौद्ध परिषदेत २० नोव्हेंबर १९५६ रोजी, “बुद्ध आणि कार्ल मार्क्स”, या विषयावर व्याख्यान देतांना मांडलेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्दांची तत्वे पुढील प्रमाणे विषद केली आहेत:
१. स्वतंत्र समाजाच्या धारणेसाठी धर्म आवश्यक आहे. २. सर्वच धर्म अनुसरणीय आहेत असे नाही. ३. धर्माचा व्यावहारिक जीवनाशी संबंध असला पाहिजे, स्वर्ग-नरक, आत्मा, परमात्मा यांच्या कल्पनांशी नव्हे. ४. परमेश्वराला धर्मात केंद्र बनविणे चुकीचे आहे. ५. आत्म्याच्या मुक्तीला धर्माचे केंद्र बनविणे चुकीचे आहे. ६. प्राण्याचे बळी धर्माचे केंद्र बनविणे चुकीचे आहे. ७. खराखुरा धर्म माणसाच्या मनात असतो, शास्त्रात नव्हे. ८. नीतीमत्ता जीवनाचा नुसता आदर्श असून भागणार नाही, तर देवाचे अस्तित्व नसल्यामुळे नितीशील आचरण हा जीवनाचा एक नियम झाला पाहिजे. ९. नीतीमत्ता आणि माणूसच धर्माच्या केंद्रस्थानी असायला पाहिजे. जर असे नसेल तर तो क्रूर धर्म भोळेपनाच होय. १०. धर्माचे कार्य जगाची पुनर्रचना करून जग सुखमय करण्याचे आहे, त्याचा उगम किंवा अंत सांगण्याचे नाही. ११. जगातील दु:खाचे कारण म्हणजे हितसंबंधातील संघर्ष होय. आणि, हे सोडवण्याचा एकमेव उपाय म्हणजे अष्टांगिक मार्गाचे अनुसरण होय. १२. मालमत्तेची खाजगी मालकी एका वर्गास सत्ता देते, तर दुसऱ्या वर्गास दु:ख देते. १३. समाजाच्या भल्यासाठी दु:ख निवरण्यासाठी त्याचे कारणच नष्ट करावयास पाहिजे. १४. सर्व मानव समान आहेत. १५. जन्म नव्हे, तर माणसाचे कर्तुत्वच त्याचे मूल्यमापन करते. १६. महत्वाचे काही असेल तर उच्च आदर्श, उच्च कुळातील जन्म नव्हे. १७. सगळ्याप्रती मित्रत्वाच्या भावनेचा कधीही त्याग करू नये. शत्रूच्याप्रतीही मित्रत्वाची भावना राखायला हवी. १८. प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे. माणसाला जीवणासाठी अन्नाची जेवढी गरज आहे तेवढीच शिक्षणाचीही आहे. १९. चारित्र्याशिवाय शिक्षण घातक आहे. २०. प्रमादातीत असे काहीही नाही. सदासर्वकाळ बंधनकारक असे काहीही नाही. प्रत्येक गोष्ट चौकशी आणि परीक्षेसाठी पात्र आहे. २१. अंतिम असे काहीही नाही. २२. प्रत्येक गोष्टीला कार्यकारणभावाचा नियम लागू आहे. २३. कोणतीही गोष्ट शाश्वत स्वरूपाची किंवा सनातन नाही. प्रत्येक गोष्ट बदलण्यास पात्र आहे. २४. युद्ध, जर ते सत्य आणि न्यायासाठी नसेल, तर निषिद्ध आहे. २५. विजेत्याची त्याच्या जित्याप्रति काही कर्तव्ये असतात.
बुध्दांच्या शिकवणुकीतील अशा प्रकारची तत्वे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकृत केली होती.
संकलन व संपादन: प्रकाश डबरासे, (मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)