- 57
- 1 minute read
जळगावात रेल्वे दुर्घटना, अनेक प्रवाशांना चिरडले

जळगावात रेल्वे दुर्घटना,
अनेक प्रवाशांना चिरडले
जळगांव दि.२२(यूबीजी विमर्श-प्रतिनिधी)
जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ रेल्वे दुर्घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. रेल्वे बोगीला आग लागल्याच्या अफवेने जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या. मात्र त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवलं.या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये ५ ते ६ प्रवाशांचा मृत्यू झाला तर काही प्रवाशी हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी अत्यंत भयानक दृश्य असून काही जणांचे दोन तुकडे झाले असल्याचे दिसून आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीच्या चाकातून ब्रेक दाबल्यामुळे चाकातून धुर आल्याने आगीची अफवा पसरून डब्यातील प्रवाशांनी घाबरुन रुळांवर उडी मारल्या. त्याच वेळी दुसऱ्या दिशेने येणाऱ्या भरधाव बंगळुरु एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडले. परधाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसच्या मोटरमनने ब्रेक दाबल्याने एक्सप्रेसच्या चाकांमधून आगीच्या ठिगण्या उडाल्या.त्यामुळे प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे बायका मुलांमध्ये एकच गोंधळ उडाला. एक्सप्रेसमधील लोक हादरून गेले. आवाज आणि किंचाळ्या सुरू झाल्या. त्यामुळे ३५ ते ४० प्रवाशांनी एक्सप्रेसमधून पटापट उड्या मारल्या. समोरून गाडी येते की नाही याची खातरजमाही त्यांनी केली नाही. तेवढ्यात समोरून बंगळुरू एक्सप्रेस आल्याने बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं. त्यात अनेकांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे.भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत.८ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत असून जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे विभागाकडून माहिती मिळाली आहे, पाचोरा रेल्वे स्थानकापासून जवळ ही घटना घडली. पुष्कर एकस्प्रेस जागेवर उभी होती. बोगीतून काही प्रवाशांनी उड्या मारल्या. यात सात ते आठ जण जखमी झाले आहे. तर काही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना ४ वाजून .२० मिनिटेच्या सुमारास घडली. घटनास्थळी ८ रुग्णवाहिका रवाना झाल्या आहेत. घटनास्थळी एक रुग्णवाहिका हजर आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं जात आहे. या घटनेमुळे मुंबई आणि भुसावळकडे जाणाऱ्या काही गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज ट्रेनकडे येणारी ही पुष्पक एक्सप्रेस होती. ही पुष्पक एक्सप्रेस मायधी आणि परधाडे दरम्यान गाडी थांबली होती. त्यातील काही प्रवाशी खाली उतरले होते. त्याचवेळी भुसावळकडे जाणारी कर्नाटक एक्सप्रेसमुळे काही प्रवाशांना इजा झाली आहे. अशी प्राथमिक माहिती आली आहे. भुसावळवरून मेडिकल व्हॅन निघाली आहे. स्थानकाजवळच्या स्थानिक प्रशासनाला माहिती दिली आहे. जिवीत हानी झाल्याची माहिती नाही. वैद्यकीय मदत पोहोचवण्याचे काम सुरू आहे असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी सांगितले आहे.