जागतिक किर्तीचे राजे महाराजा सयाजीराव गायकवाड !

जागतिक किर्तीचे राजे महाराजा सयाजीराव गायकवाड !

जागतिक किर्तीचे राजे महाराजा सयाजीराव गायकवाड !

1893 मध्ये शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत भाषण करून सर्वांची मने जिंकणारे स्वामी विवेकानंद सर्वांना माहीत आहेत, परंतु 27 सप्टेंबर 1933 ला शिकागो येथे झालेल्या दुसऱ्या जागतिक सर्वधर्मपरिषदेचे अध्यक्ष महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज होते, हे किती लोकांना माहिती आहे?. त्यांनी जगातील सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास केला होता. त्यांना आपल्या परंपरेचा अभिमान होता, परंतु जगातील इतर धर्मीयांचा त्यांनी कधी द्वेष केला नाही. सर्व धर्मातील तत्त्वज्ञानाचा त्यांनी अभ्यास केला होता, पण ते प्रवाहपतित नव्हते, तर ते प्रागतिक विचारांचे होते.

ऑलम्पिक स्पर्धा ही जगातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च स्पर्धा मानली जाते. 1935 साली बर्लिन (जर्मनी) येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेचे महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज हे प्रमुख पाहुणे होते, यावरून स्पष्ट होते की क्रीडा क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे आणि त्यांची लोकप्रियता आणि मान्यता ही जागतिक स्तरावरील होती, म्हणूनच ते जर्मनीत झालेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचे प्रमुख पाहुणे होते.

28 जुलै 1911 रोजी लंडन येथील ऑक्सफर्ड विद्यापीठात जागतिक मानवशास्त्र (Anthropology) परिषद झाली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाराजा सयाजीराव गायकवाड होते. यावरून स्पष्ट होते की महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज यांचा मानवशास्त्राचा दांडगा व्यासंग होता.

लंडन येथे 1930,31 आणि 32 साली पहिली, दुसरी, तिसरी गोलमेज परिषद झाली, या गोलमेज परिषदेसाठी भारतातील अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यामध्ये प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा सहभाग महत्त्वपूर्ण मानला जातो. विशेषता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय अस्पृश्यांचे प्रश्न मोठ्या हिमतीने आणि ताकतीने त्या ठिकाणी मांडले. त्याच गोलमेज परिषदेला 1930 आणि 1931 झाली महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज यांनी मोठ्या ताकतीने भूमिका मांडलेली होती. तेथेच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान देखील केला होता.

ब्रिटिश लायब्ररी ही जगविख्यात लायब्ररी मानली जाते. त्याठिकाणी जगभरातील महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. महत्त्वाचे ग्रंथ आहेत. ते ज्ञानाचं जगविख्यात भांडार आहे. त्या ब्रिटिश लायब्ररीचे महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज अध्यक्ष होते. हा बहुमान मानला जातो. महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज उत्तम राज्यकर्ते होते, तसेच ते उत्तम वाचत होते, जिज्ञासू होते, म्हणूनच त्यांना 1935 आली ब्रिटिश लायब्ररीच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला.

महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज जसे उत्तम वाचक होते, तसेच ते उत्तम लेखक देखील होते. त्यांनी “फ्रॉम केसर टू सुलतान” हा पाचशे पृष्ठांचा ग्रंथ लिहिला आहे. त्यांनी ज्या वेळेस ग्रंथ लिहिला त्यावेळेस त्यांचे वय फक्त 31 वर्षाचे होते. त्यांचा जगाच्या राजकारणाचा, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक, कला इत्यादी क्षेत्रांचा दांडगा अभ्यास होता. महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या कार्याचा परिप्रेक्ष केवळ बडोदा राज्यापुरता मर्यादित नव्हता, तर तो जागतिक स्तरावरचा होता, म्हणूनच महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज हे जागतिक स्तरावरचे महामानव ठरतात.

महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज यांनी आर्थिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेले आहे. सावकारशाही नष्ट व्हावी आणि जनसामान्यांचा आर्थिक विकास व्हावा, यासाठी त्यांनी 9 जुलै 1908 रोजी “बँक ऑफ बडोदाची” स्थापना केली. भारताच्या आर्थिक विकासात या बँकेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आज देशभर आणि विदेशात देखील बँकेच्या शाखा आहेत. ही राष्ट्रीयीकृत बँक आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज हे या बँकेचे संस्थापक आहेत.

महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज महान शिक्षणप्रेमी राजे होते. त्यांनी आपल्या राज्यात आणि राज्याबाहेर शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला. शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. गोरगरिबांच्या घरात शिक्षण गेले पाहिजे ही त्यांची तळमळ होती. त्यांनी 1882 साली आदिवासी आणि अस्पृश्यांसाठी आपल्या राज्यात शाळा सुरू केली. त्यांनी पुणे येथील डेक्कन कॉलेज, सातारा येथील रयत शिक्षण संस्थेला भरघोस आर्थिक मदत केली. 1892 साली त्यांनी आपल्या राज्यात सर्वांना आणि मोफत शिक्षण असा कायदा केला. त्यांनी पायाभूत शिक्षणासाठी तीनचतुर्थांश रक्कम खर्च केली. त्यांनी आपल्या राज्यातील शाळांचा अभ्यासक्रम तयार केला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अमेरिकेतील शिक्षणासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज यांनी सर्वतोपरी आर्थिक मदत केली. तसेच त्यांनी अरविंद घोष, आर.सी. दत्त, दादाभाई नवरोजी, नामदार गोखले, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, लाला लजपतराय, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, रवि वर्मा, मादाम कामा, बालगंधर्व इत्यादींना भरघोस मदत केली.

महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज हे नेहमी प्रागतिक विचारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी बडोद्याला जाऊन महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज यांना “शेतकऱ्यांचा आसूड” हा ग्रंथ ऐकवला. तो ग्रंथ ऐकून महाराज प्रभावित झाले आणि तो ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी महाराजांनी भरघोस मदत केली. सावित्रीबाई फुले यांनाही त्यांनी मोलाची मदत केली. वाराणसी येथे हिंदू बनारस विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठाला महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज यांनी जमीन दिली. महाराजांच्या मदतीमुळेच आज बनारस विद्यापीठ उभ राहिलं आहे.

महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज यांना आपल्या अस्मितेचा अभिमान होता. त्यांनी 31 डिसेंबर 1910 रोजी बडोदा येथे गौतम बुद्ध यांचा पुतळा उभारला, तर 1914 साली बडोदा येथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. त्यांना गौतम बुद्ध आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल नितांत आदर होता. त्यामुळेच ते गौतम बुद्ध, तुकाराम महाराज आणि शिवचरित्र लिहिणाऱ्या कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.

सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज अग्रेसर असत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज हे समकालीन महापुरुष आहेत. त्यांची विचारधारा एकच होती. महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज यांनी आपल्या राज्यात मानवतेवर कलंक असणारी अस्पृश्यता ही अमानुष प्रथा बंद केली. आपल्या राजवाड्यात त्यांनी अस्पृश्यांना शेजारी बसवून सहभोजन केले. आपले खाजगी खंडोबा मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले. 23 मार्च 1918 रोजी मुंबई येथे झालेल्या अस्पृश्यता निर्मूलन परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज होते. महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज स्वाभिमानी होते. आपल्या राज्यात त्यांनी ब्रिटिशांना हस्तक्षेप करू दिला नाही. “मी तुमचा नोकर नाही, तर मित्र आहे” असे त्यांनी लॉर्ड कर्झनला सुनावले होते.

महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज हे प्रागतिक विचारांचे होते. युरोपचा दौरा करून त्यांनी समुद्र ओलांडला. समुद्र उल्लंघनाला धर्मद्रोह म्हणणाऱ्यांना त्यांनी वठणीवर आणले. त्यांनी ग्रहणाची रजा बंद केली. परदेशगमन प्रायश्चित्त रद्द केले. पुरोहितांना दानधर्म देणे बंद केले. ते समतावादी होते. विषमतेमुळे आपली अधोगती झाली, असे ते नेहमी म्हणत. रयत शिक्षण संस्थेत भेट द्यायला आल्यानंतर त्यांनी सर्व जाती-धर्माच्या मुलासोबत बसून पिठलं-भाकरी खाल्ली. ते जनतेचे राजे होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार होते.

महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज यांनी 63 वर्षे राज्य केले. या दरम्यान त्यांनी पंचाहत्तर हजार लोककल्याणकारी कायदे केले. त्यांनी आपल्या राज्यात जमनाबाई हॉस्पिटल सुरू केले. स्टेट लायब्ररीची स्थापना केली. 1882 मध्ये बडोदा कॉलेजची स्थापना केली. तसेच मिलची स्थापना केली. वस्तीगृहांची स्थापना केली. 1885 मध्ये तलावाचे बांधकाम केले. तसेच स्त्री शिक्षणाचा कायदा केला. 1890 मध्ये कलाभवनची स्थापना केली. 1902 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा केला. 1904 मध्ये बालविवाहावर बंदी आणणारा कायदा केला. 1905 मध्ये फिमेल ट्रेनिंग कॉलज सुरू केले. 1909 मध्ये जातीभेद निर्मूलनाचा कायदा केला. 1937 मध्ये साल्हेर येथे आदिवासी परिषद घेतली.

महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत एकूण पंचाहत्तर हजार लोककल्याणकारी कायदे केले. एवढेच नव्हे तर कोल्हापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 24 मार्च 1934 रोजी दिल्ली येथे झालेल्या 23 व्या अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1924 मध्ये मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेचे ते अध्यक्ष होते. असे हे शतपैलू महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज यांना स्मृतीदिनानिमित्त (६ फेब्रुवारी) विनम्र अभिवादन!

– श्रीमंत कोकाटे

0Shares

Related post

दिल्लीचे मराठी साहित्य संमेलन भाजपचे अश्रित विद्रोहीचा आरोप !!!

दिल्लीचे मराठी साहित्य संमेलन भाजपचे अश्रित विद्रोहीचा आरोप !!!

आधी राजकीय बनलेल्या अखिल भारतीय चे आता शासकीय आणि पक्षीय संमेलनात रूपांतर विद्रोहीचा घणाघात !!! विद्रोही…
तारामंडलातील  तेजस्वी तारा म्हणजे संत रोहिदास आहेत !

तारामंडलातील तेजस्वी तारा म्हणजे संत रोहिदास आहेत !

तारामंडलातील तेजस्वी तारा म्हणजे संत रोहिदास आहेत ! संत रोहिदास हे पंधराव्या शतकातील एक महान संत…
माकपच्या मुंबई सचिव पदी कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांची निवड

माकपच्या मुंबई सचिव पदी कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांची निवड

माकपच्या मुंबई सचिव पदी कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांची निवड भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)मुंबई सचिव पदी कॉम्रेड…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *