- 102
- 1 minute read
…तरच महिलांचा खरा सन्मान होईल !
स्त्री ही देवता आहे. तीआदिमाया आहे. ती आदिशक्ती आहे. ती संस्कृतीची निर्माती आहे. स्त्रीने शेतीचा शोध लावला, घरांची निर्मिती स्त्रियानी केली. नवाश्मयुगात स्त्रियांनी शेतीचा शोध लावला. निऋती ही स्त्रीराज्याची आद्य महाराणी असून ती कृषीप्रधान संस्कृतीची महाराणी होती असे प्राच्यविद्यापंडित शरद पाटील यांनी सिद्ध केलेले आहे. पुरुषापेक्षा स्त्री अधिक सृजनशील आहे. तिच्याकडे प्रसवक्षमता आहे, ती पुरुषाकडे नाही, त्यामुळे अपत्यप्राप्तीची जबाबदारी निसर्गाने स्त्रीवरती टाकलेली आहे,असेही प्राच्यविद्यापंडित शरद पाटील सांगतात. भटक्या अवस्थेतील मानवाला सुखी-संपन्न जीवन स्त्रियांनी दिले, असे आपण नेहमी ऐकतो, म्हणतो आणि वाचतो, पण एवढे बोलून स्त्रियांचा आदर सन्मान होईलच असे नाही, कारण आज देखील महिलांना अनेक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
असंघटित क्षेत्रामध्ये महिलांना विषम वेतन दिले जाते. खाजगी आणि असंघटीत क्षेत्रांमध्ये पुरुषांना सुमारे पाचशे रुपये प्रतिदिन वेतन असेल, तर महिलांना सुमारे दोनशे किंवा तीनशे रुपये दिले जातात. पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना त्याहीपेक्षा अधिक काबाडकष्ट महिलांना करावे लागते. तरीदेखील महिलांना वेतन कमी का? यातून भारतीय समाजाची पुरुषसत्ताक स्त्रीदास्य मानसिकता प्रकर्षाने दिसते, यातून स्त्रियांना दुय्यम-दुर्बल ठरविले जात आहे. विज्ञानाने हे सिद्ध केलेले आहे की स्त्रीदेखील पुरुषांप्रमाणेच शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या हिंमतवान आहे, कर्तृत्ववान आहे. संविधानाने देखील लिंगभेदाला विरोध करून स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केलेला आहे.
आपल्या देशात आज देखील मुलगा जन्माला आला, तर पेढे वाटतात आणि मुलगी जन्माला आली तर जिलेबी वाटतात. यातून वंशाला दिवा फक्त मुलगाच आहे, मुलगी वंशाचा दिवा नाही, अशी समाजाची मानसिकता आहे. अनेक ठिकाणी स्त्रीभ्रुण हत्या होते. मुलाप्रमाणेच मुलगी वंशाचा दिवा आहे, असे बुद्ध राजा प्रसेनजितला म्हणाले होते. छत्रपती शिवाजीराजांनी देखील मुलाप्रमाणेच स्वतःच्या सुनांना युद्धकलेचे, घोड्यावर बसण्याचे आणि राजनीतीचे स्वातंत्र्य दिले होते. आपल्या विरोधकांच्या स्त्रियांचा देखील आदर सन्मान केला पाहिजे, हे छत्रपती शिवाजी राजांचे धोरण होते, यातून त्यांचा दृष्टिकोन स्त्रियांबद्दल अत्यंत सकारात्मक होता हे स्पष्ट होते.
केरळ मधील अयाप्पा मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश दिला पाहिजे, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे, तरीदेखील मंदिराशी संबंधित पुजारी आणि काही धर्ममार्तंड महिला प्रवेशाला अनुकूल नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की महिलांना मासिक पाळी येते, त्यामुळे मंदिराचे आणि धर्माचे पावित्र्य नष्ट होते. मुळात मासिक पाळी ही अपवित्र किंवा अशुद्ध बाब नाही, असे सर्वज्ञ चक्रधर म्हणाले होते. नाकाला येणारा शेंबूड आणि मासिक पाळी या दोन्हीही नैसर्गिक क्रिया आहेत, त्या अशुद्ध किंवा अपवित्र नाहीत. आपल्या आईला मासिक पाळी आली नसती तर आपला जन्मच झाला नसता. मानवी प्रजननासाठी मासिक पाळी अत्यावश्यक असते. जे कोणी मासिक पाळीला अपवित्र किंवा अशुद्ध समजून महिलांच्या मंदिर प्रवेशाला विरोध करत असतील किंवा करतात, त्यांचाही जन्म मातेच्या उदरातूनच झालेला आहे, ते काही आभाळातून पडलेले नाहीत. पण ती मानसिकता बदलणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी क्रमिक पाठ्यपुस्तकात आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे, त्याच वेळेस खरा महिलांचा सन्मान होईल.
आईवरून शिवी देणे, हेसुद्धा पितृसत्ताक व्यवस्थेचे लक्षण आहे. एखाद्या अकार्यक्षम पुरुषाला चोळी-बांगडीचा आहेर करणे, बांगड्या भरल्या काय? असे टोमणे मारणे, हे देखील महिलांना दुबळ्या ठरविण्याचा प्रकार आहे. मुळात साडीचोळी, बांगड्या ही स्त्रियांची आभूषणे आहेत. पेहरावावरून कर्तृत्वाचे मूल्यमापन होऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीने पुरुषाची कपडे घातली म्हणून ती व्यक्ती खूप सामर्थ्यशाली असते आणि एखाद्या व्यक्तीने महिलांची कपडे घातली म्हणून ती व्यक्ती अकार्यक्षम असते, असा तर्क करणे हेच मुळात अवैज्ञानिक आहे. स्त्री ही क्षमतेच्या बाबतीत पुरुषांपेक्षा कोणत्याही क्षेत्रात कमी नाही, हे स्त्रीवादी अभ्यासशास्त्र, प्राच्यविद्या, पुरातत्वशास्त्र, मानवविद्या आणि आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेले आहे. ज्यादिवशी आईवरून शिव्या देण्याचे बंद होईल, महिलांना दुबळ्या समजण्याची मानसिकता बदलेल, त्या दिवसापासून स्त्रियांच्या सन्मानाला सुरुवात होईल.
आपल्या देशातील महिलांमध्ये आरोग्याचे खूप मोठे प्रश्न आहेत. हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असणे यापाठीमागची कारणमीमांसा महिलांना प्रचंड कष्ट करावे लागते, त्यातुन उपासतापास-व्रतवैकल्ये, आहारात जीवनसत्वे, मिनरल्स, प्रोटीन, फायबरचे कमी प्रमाण, अनेक अंधश्रद्धा त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिकतेवर होतो.
मध्ययुगीन काळातील अमानुष अशा सती प्रथेची जागा आधुनिक युगात लैंगिक छळाने घेतलेली आहे. लैंगिक छळ करणे, महिलांच्या हत्या हा मोठा गंभीर प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाने मानसतज्ञ, शिक्षणतज्ञ, पोलीस अधिकारी, न्यायाधीश, कायदेतज्ञ, स्त्रीवादी अभ्यासक यांची एक समिती स्थापन केली पाहिजे. त्याद्वारे स्त्री-पुरुषांचे सुंदर, आनंददायी, प्रेमळ, नैसर्गिक जीवन कसे जगावे याचा एक दिशादर्शक आराखडा तयार करणे अत्यावश्यक आहे. मुलामुलींना एकमेकांबद्दल वाटणारे आकर्षण ही बाब अनैसर्गिक नाही. तो स्थायीभाव आहे, सहज भाव आहे, यामध्ये विकृतीचा उदय कसा होतो? त्याचे निराकरण कसे करावे, यावरती अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे.
भारतीय समाज व्यवस्थेमध्ये योनीशुचितेबाबत अनेक कडक निर्बंध आहेत. परंतु शिश्न शुचितेबाबत अवाजवी स्वातंत्र्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका निकालांमध्ये स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणारे आकर्षण ही नैसर्गिक बाब आहे. विवाह संस्थांचा उदय ही कृत्रिम समाजरचना आहे, त्यामुळे लैंगिक निर्बंध हीदेखील एक अन्यायकारक बाब आहे, असे मत मांडले आहे, हा अनेक कर्मठाना संस्कृती वरचा हल्ला वाटत असला तरी मानवतावादी मूल्य जपणारा हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. आज आपल्या देशातील सर्वाधिक हत्या/आत्महत्या या लैंगिक कारणावरून होतात, त्यामध्ये महिलांचं मोठ्या प्रमाणामध्ये बळी जातात.
आपल्याकडे मातृत्व हे परिपूर्ण जीवन मानले जाते. विवाहानंतर अपत्यप्राप्ती नाही झाली तर त्या दांपत्याला समाजाकडून मोठ्या प्रमाणामध्ये मनस्ताप दिला जातो. एखाद्या दांपत्याला अपत्य प्राप्ती होत नसेल, तर हा काही गुन्हा नाही किंवा अपत्यप्राप्ती म्हणजे परिपूर्ण जीवनही नाही. अपत्यप्राप्ती नाही झाली तरी अशा महिलांचा सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे हे समाजमन तयार करणाऱ्या अभ्यासक्रमाची देशाला गरज आहे.
हुंडा देणे, हुंडा घेणे, हा कायद्याने गुन्हा आहे, त्याहीपेक्षा तो सामाजिक अपराध आहे, कारण मुलींना जशी लग्नाची गरज असते, तशीच ती मुलांनादेखील असते. एखाद्या नवरदेवाची किंमत ठरविण्यासाठी तो काही बाजारातील प्राणी नाही. हुंडा घेणे हे काही शौर्याचे लक्षण नाही. छत्रपती शिवाजीराजांनी हुंडा न घेता गरीब कुटुंबातील मुलीचे लग्न स्वतःच्या राजपुत्राबरोबर लावले. आज हुंडा न घेणे हेच खरे शिवप्रेम ठरेल. हुंडा पद्धतीमुळे अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. दोन वर्षापूर्वी मराठवाड्यातील एका अविवाहित मुलीने आपल्या वडिलांना आपल्या लग्नाचा त्रास नको म्हणून आत्महत्या केली होती, तर गुजरातमधील एका विवाहित तरुण मुलींने हुंड्याच्या छळाने नदीमध्ये उडी टाकून आत्महत्या केली. म्हणजे भारतीय समाजव्यवस्था अजून किती क्रूर आहे हे स्पष्ट होते. हुंडा पद्धती ही जशी गरीब कुटुंबांमध्ये आहे, तशीच ती श्रीमंत आणि उच्च शिक्षित वर्गातदेखील मोठ्या प्रमाणात आहे. ज्यादिवशी हुंडा पद्धती बंद होईल तो दिवस महिलांच्या सन्मानाचा दिवस असेल.
वैधव्य हा काही गुन्हा नाही किंवा अपराध नाही. विधवांनी देखील इतिहास घडविला आहे. जिजामाता, ताराराणी, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यांनी पतीनिधनानंतर सती न जाता निर्भीडपणे, कणखरपणे, हिमतीने अनेक संकटावर मात करून देशासाठी महान ऐतिहासिक कार्य केले. आज देखील विधवांना अशुभ समजले जाते. विधवांना मंगल कार्यक्रमाला आमंत्रित केले जात नाही. ज्यावेळेस विधवांचा आदर सन्मान केला जाईल, त्याच वेळेस महिलांचा आदर सन्मान होईल.
सरळ नाक, पांढरा रंग, उंचीपुरी देहयष्टी म्हणजे सौंदर्य अशा आपल्याकडे सौंदर्याच्या कल्पना आहेत. किंबहुना उंच असणे, गोरे असणे, सरळ नाक असणे हे आपल्याकडे सौंदर्याचे निकष आहेत, मग अशा व्यक्तींकडे अपवाद वगळता सौंदर्याचा प्रचंड अहंभाव असतो. मग एखादी व्यक्ती बुटकी असेल, काळी असेल, नाकाने नकटी असेल तर मग ती सुंदर नाही का? उंची, रंग आणि नाकाच्या रचनेवरून सौंदर्य ठरविणे ही कर्मठ, सनातनी वृत्ती आहे. खरे सौंदर्य हे कर्तृत्वामध्ये असते. परंतु आपल्याकडे रंगरूप, उंचीवरुन अनेकांची अवहेलना केली जाते. कुरूप म्हणून हिणविले जाते.
जगभरातील भांडवली आणि सनातनी विचारधारा सौंदर्यप्रसाधनांची उत्पादनं करून ते खपविण्यासाठी विश्वसुंदरी स्पर्धा आयोजित करतात व त्यातून आपली उत्पादनं खपवत असतात, हे मोठे मार्केटिंगचे व त्याला जोडूनच वर्णदद्वेषाचे जागतिक षडयंत्र आहे. याला अनेक अविकसित आणि विकसनशील देश बळी पडतात. यातूनच काळ्या नकट्या, बुटक्या स्त्रियांना नाकारण्याची मानसिकता तयार केली जाते. काळा रंग हा अशुभ किंवा अपवित्र नाही. विठ्ठलाचा रंग काळा आहे. त्याचा बुकाही काळ्या रंगाचा आहे. काळी जमीन अधिक कसदार असते. सर्व रंग आणि सर्व मानव प्राणी हा निसर्गाचा आविष्कार आहे, त्यांना सुंदर-कुरूप ठरविण्याचा अधिकार कोणालाही नाही. जगाचा इतिहास घडविण्यामध्ये बुटक्या, नकट्या आणि काळ्या लोकांचादेखील मोलाचा वाटा आहे. त्यामुळे काळ्या, नकट्या, बुटक्या लोकांना दुय्यम लेखू नये. सुंदर असणे म्हणजे नाजूक असणे, नाजूक असणे म्हणजे दुबळे असणे, त्यामुळे मादी ही दुबळी असती, ही पुरुषी मानसिकता धर्मांध सौंदर्य संकल्पनेतून निर्माण केली जाते.
पुरुषी, सनातनी, धर्मांध, कर्मठ मानसिकता बदलेल तेव्हाच महिलांचा आदर सन्मान होईल.
- डॉ. श्रीमंत कोकाटे