- 66
- 2 minutes read
जातीचा उल्लेख टाळून ही विकास योजना राबविल्या जावू शकतात…?
अण्णाभाऊंना जातींच्या फ्रेममध्ये बंदिस्त करण्याचा जोरदार प्रयत्न…!
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पेनातील शाही ज्या ज्या वेळी कागदावर उतरली , त्या त्या वेळी तिने इथल्या जातीय व्यवस्थेवर प्रहार केले. माणसाचे माणूसपण नाकारणाऱ्या, माणसाला गुलाम व दास करणाऱ्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेवर तिने वार केले. जात व धर्म व्यवस्थाच नाही तर संपूर्ण जग बदलण्याची जिने डरकाळी फोडून इथल्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेला हादरे दिले, त्याच अण्णाभाऊ साठे यांना त्यांचे अनुयायी थोड्याशा लाभासाठी जातीच्या बंधनात अडकवित आहेत, अन हे कार्य राज्यातील सावरकरांच्या विचारांचे ब्राह्मणी (हिंदुत्ववादी) सरकार आनंदाने पार पाडत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जाहिरातीत मातंग हा वापरण्यात आला आहे. हा सारा प्रकार खेदजनक अन् अमानवीय जाती व्यवस्थेला खतपाणी घालणारा प्रकार आहे. हा जातीवाचक शब्द वगळून ही या समाजाच्या विकासाच्या योजना राबविता येवू शकतात. मातंग समाजातील सुशिक्षितांनी अन राज्य सरकारने याचा विचार जरूर करावा.
अण्णाभाऊची लेखणी भांडवलदार व्यवस्थेच्या विरोधात जशी बंड करुन उठली, तसेच तिने जातीय व धर्म व्यवस्थेने लादलेल्या गुलामी विरोधात बंड केले. जातींच्या भिंतीवर प्रहार करीत महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक धर्माची स्थापना केली. त्यावेळी लहुजी वस्ताद त्यांच्यासोबत पहाडासारखे उभे राहिले. मुक्ता साळवे या शाळकरी मुलीने या व्यवस्थेला आव्हान दिले. पण या साऱ्यांच्या कार्याला जातींच्या चौकटीत बंदिस्त करण्यात आजच्या मातंग समाजाला धन्यता वाटत आहे. अन हे करण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अन भाजपला अधिक इंटरेस्ट आहे. कारण अनुसूचित जातीतील जाती समूह जितके एक विभक्त राहतील, तितकी जातीय व्यवस्था व तिच्यामुळे ब्राह्मणी धर्म व्यवस्था पुन्हा मजबूत होणार आहे.
समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना अनुसुचित जाती समुहातील मातंग समाजाच्या विकासासाठी करण्यात आली असली तरी यासंदर्भात ” मातंग” या जातीवाचक शब्दाचा उल्लेख टाळून हे विकास कार्य करता येवू शकते. पण राज्यातील भाजप सरकारला ते करायचे नाही. खरे तर सामाजिक व सांस्कृतिक मागासलेपण हाच आरक्षणाचा मुळ आधार असला तरी त्यात जाती हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र मागासलेल्या जातींची सर्व्हेतून पुढे आल्यानंतर त्याचा एक समूह तयार करण्यात आला. अन् त्यांच्या जातींचा उल्लेख सार्वजनिकरित्या टाळण्यासाठी त्यांचा एक प्रवर्ग तयार करुन त्यास अनुसूचित जाती, जमाती हे नाव देण्यात आले. यामुळे कुठल्याही सरकारी जाहिरातीत महार, चांभार, मातंग आदी उल्लेख या अगोदर होत नव्हता. चर्मकार महामंडळ असले तरी ते चर्म उद्योग अथवा व्यवसायाशी संबंधित असल्याचे स्पष्ट दिसते. मात्र मातंग या उल्लेखामुळे जातच डोळ्यांसमोर येते. अन जात ही व्यवस्थाच मागासलेपणाचे मुख्य कारण आहे. त्यामुळे मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविताना अशा पद्धतीने जातींचा उल्लेख टाळला पाहिजे.
सामाजिक समता, समानता अन् न्याय या साऱ्यांना नाकारणाऱ्या संघ व भाजपच्या हातात आज् देशाची सत्ता आहे. राज्यात ही त्यांनी घटनाबाह्य पद्धतीचा अवलंब करुन सरकार स्थापन केले असून या सरकारचे मुखिया खुलेआमपणे आपल्या सरकारला हिंदुत्ववादी सरकार म्हणून घेत आहेत. त्यामुळे सरकार तर आपला हिंदुत्ववादी अजेंडाच राबविणार. पण जाती व्यवस्थेत हजारों वर्ष माती खावी लागणाऱ्या जातींना तरी अक्कल असली पाहिजे ना. पण स्वाभिमान गहाण टाकून काही जाती आपल्या जातीचे स्तोम माजवित आहेत. मातंग ही त्यातीलच एक स्वाभिमान शून्य जात आहे, हे दाखवून देण्याचा आटापिटा या समाजातील नेते संघ व भाजपच्या वळचणीला जावून करीत आहेत. अन हे करीत असताना जात व्यवस्थेच्या विरोधात ठामपणे उभ्या राहिलेल्या. ब्राह्मणी धर्म व जातीय व्यवस्थेचा कर्ता मनु व त्याच्या मनुस्मृतीच्या विरोधात रक्ताच्या शेवटच्या थेबापर्यंत आपली लेखनी चालविणाऱ्या अण्णाभाऊंना ही याच जातींच्या फ्रेम व बंधनात अडकवण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
ब्राह्मणी व्यवस्थेत जी जातींची उतरंड आहे, त्यात अतिशुद्रांमधील ज्या जातींचा समावेश आहे. त्यात मातंग ही आहे. अन इतर जतीप्रमाणे मातंगाच्या ही मागासलेपणास हिच व्यवस्था जबाबदार आहे. असे असताना मातंग समाजाला आजही ही व्यवस्था प्रिय का आहे ? तर याचे स्पष्ट उत्तर आहे, त्यांच्यातील अज्ञान व पद तसेच अन्य लोभासाठी विकले जाणारे नेते. हेच नेते आज अण्णाभाऊ साठे यांना ही विकत आहेत. त्यामुळेच जातीवाचक उल्लेख असणाऱ्या जाहिराती त्यांना चालत आहेत.
___________________________
– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)