डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकासाठी सर्वच विभागाचा निधी वापरला जावा – अबू असीम आजमी यांची मागणी
चैत्यभूमी जवळील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत असून, येथे उभारण्यात येणाऱ्या ४५० फूट उंचीच्या डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यामध्ये गंभीर दोष आहेत. स्मारकाच्या कार्यात जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. या स्मारकासाठी येणाऱ्या खर्चाचे व कामाचे नियोजन करण्याची जबाबदारी एमएमआरडीए ची असली, तरी, यासाठी लागणारा सर्व निधी सामाजिक न्याय विभागाचा वापरला जात आहे. यामुळे, दलित विकासाच्या अन् कल्याणाच्या अनेक योजनांना चाप बसला आहे. स्मारकाच्या आडून दलित समाजाच्या विकास कार्याचा निधीच आता सरकार पळवून नेत आहे. इंदू मिल येथे होत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, हे सर्व भारतीय नागरिकांचे आहे. त्यामुळे सर्वच विभागाचा निधी या स्मारकसाठी वापरला जावा, आदी संदर्भात शिवसेना नेते व माजी आमदार बाबुराव माने यांनी नुकतीच समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आजमी यांची भेट घेतली. यावेळी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव राहुल गायकवाड, मुंबई प्रदेश सचिव रहीम मोटारवाला अन अशफाक भाई उपस्थित होते.
यावेळी महाड स्थित चांभारगडला चर्मकार समाजाच्या शौर्याचे प्रतिक, तसेच पर्यटन व तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर करण्यात यावे, अशी मागणी आमदार अबू असीम आजमी यांनी नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. याबद्दल बाबुराव माने यांनी आजमी यांचे अभिनंदन केले व या आंदोलनात सर्व प्रकारचे सहकार्य करणाचे आश्वासन ही दिले.
डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यात जे दोष आहेत, ते दूर करून दोष मुक्त पुतळा निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दक्षता समितीची स्थापना ही नुकतीच करण्यात आली असून, या समितीचे सदस्य ही लवकरच आजमी यांना भेटणार आहेत….