• 38
  • 1 minute read

डॉ. बाबा आढावः सत्यशोधक सत्याग्रही समाजवादाचे महापर्व

डॉ. बाबा आढावः सत्यशोधक सत्याग्रही समाजवादाचे महापर्व

डॉ. बाबा आढावः सत्यशोधक सत्याग्रही समाजवादाचे महापर्व


 भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाला. या स्वातंत्र्याबरोबरच भारत सार्वभौम राष्ट्र म्हणून जगामध्ये उभा राहिला. हे सार्वभौमत्व देशाच्या स्वयंपूर्णतवर विशेषतः अन्नधान्याच्या स्वयंपूर्णतेवर अवलंबून असते आणि म्हणूनच नेहरु सरकारने अधिक धान्य पिकवा मोहिमेपासून हरित क्रांतीपर्यंतच्या भूमिका घेतल्या. मोठी धरणे व सार्वजनिक क्षेत्रात पायाभूत उद्योग यांना प्राधान्य देण्याचे ठरवले. धरणांचे पाणी देण्यासाठी पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी व उद्योगांसाठी पाणी असा क्रम महाराष्ट्रामध्ये ठरला. धरणे बांधण्याचे तर ठरले पण धरणासाठी जी जमीन आवश्यक होती त्या जमिनीवर उपजिविका असणाऱ्या शेतकऱ्यांचे, त्यावर राबणाऱ्या शेतमजूर,गावातील कारागीर छोटे व्यापारी यांच्या जगण्याचे, ते सर्व राहत असलेल्या घरांचे- गावांचे काय करायचे? याबद्दल मात्र कुठल्याही प्रकारचे धोरण नव्हते या परिस्थितीमुळेच मराठीत ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी नवी म्हणही आली. अशी परिस्थिती सर्वत्र होती. पुणे जिल्ह्यामध्ये येडगाव येथे कुकडी नदीवर मोठे धरण बांधण्याची योजना आली. परंतु नेहमीप्रमाणे धरणग्रस्तांच्या संदर्भात सरकारने कोणतीच योजना जाहीर केली नव्हती. करण्याचा प्रश्नही नव्हता कारण स्वातंत्र्यपूर्व काळात तिसऱ्या दशकात मुळशी तालुक्यात टाटाने ज्या पद्धतीने धरणासाठी शेतकऱ्याच्या जमिनी काढून घेऊन त्याना योग्य मोबदल्याविना ब्रिटिश सरकारच्या पाठिंब्याने बेमुर्वतखोरपणे विस्थापित केले होते, त्याचीच पुनरावृत्ती स्वातंत्र्योत्तर काळातही चालूच होती. येडगावच्या शेतकऱ्यांमध्ये जमिनीला, गावाला व घराला मुकावे लागणार यामुळे प्रचंड असंतोष होता. या सर्व शेतकऱ्यांना डॉ. बाबा आढाव यांनी एकत्र आणले.     
 
६ ऑक्टोबर १९६८ रोजी तत्कालीन केंद्रीय मंत्री श्री. यशवंतराव चव्हाण धरणाच्या उ‌द्घाटन कार्यक्रमाला येणार असल्याची माहिती मिळाल्यावर डॉ. बाबा आढाव यांनी शेतकऱ्यांसह सत्याग्रह करण्याचे ठरवले. यशवंतराव चव्हाण यांच्या गाड्यांचा ताफा दिसताच बाबा रस्त्यावर आडवे पडले, त्यांच्या बरोबर आंदोलनातील स्त्रीपुरुषही रस्त्यावरती आडवे पडले  *पोलिसांनी जोराचा लाठीहल्ला केला, त्यात बाबांचा एक डोळा कायमचा निकामी झाला, नाकावरही जखम झाली.  सोबत असलेल्या शहाजी हांडे यांनी बाबांच्या अंगावर झेप घेत पोलिसांचा लाठीहल्ला स्वतःच्या अंगावर घेतला. शहाजी हाडे यांच्या डोक्यातून, तोंडातून रक्त वाहत होते आणि ते रक्त बाबांच्या अंगावर पडत होते. तो रक्ताचा सडा बघून एकच गलका झाला-‘बाबा मारला.’ , ‘ बाबा मारला ‘  मंत्रीमहोदय उ‌द्घाटनाच्या मांडवात गेले, काही महिलांनी त्यांना स्वागतासाठी ओवाळायला सुरुवात केली. त्याच वेळेस नाही करायच धरण, ‘नाही होणार धरण, आमचे संसार बुडवायचे आणि लोकांचे संसार चालवायचे; असं कसं तुमचं धोरण’ असं म्हणत १८ वर्षीय साळूबाई जोरे या मुलीने त्या महिलांच्या हातातील ताट उधळून लावले. बाबांच्या नेतृत्वाखालील धरणग्रस्तांच्या या आंदोलनाची देशभर चर्चा झाली. आणि महाराष्ट्रातील अन्य धरणग्रस्तही जागृत झाले. 
 
*लढ्याचे यश*  
 
या संघर्ष आणि त्यागानंतर तब्बल सात वर्षांनी देशात पहिल्यांदाच  महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त पुनर्वसन कायदा-१९७६ राज्यात लागू करण्यात आला. बाबा आढावांनी १९६२ सालापासून घेतलेल्या ‘आधी पुनर्वसन, मग धरण’ या भूमिकेला अधिकृत शासकीय मान्यता मिळाली. कोणत्याही धरण अथवा प्रकल्पाच्या बरोबरच पुनर्वसनाचाही आराखडा व प्रक्रिया तयार करणे आवश्यक असल्याची तरतूद या कायद्यात आहे.या कायद्याने धरणग्रस्ताला जमिनीच्या बदल्यात जमीन, घरासाठी प्लॉट व घर बांधण्यासाठी कर्ज आणि नागरी सुविधांसह स्वतंत्र गावठाण मिळण्याची तरतूद झाली. भूमीहीनालाही पुनर्वसनात जमीन मिळण्याचा अधिकार मिळाला.                         
 
देशभर भूसंपादनाचा १८९४ चा ब्रिटिशकालीन वासाहतिक कायदा अस्तित्वात असतानाच महाराष्ट्रात धरण व प्रकल्पग्रस्तांसाठी हा ऐतिहासिक कायदा अस्तित्वात आला, याचे श्रेय डॉ. बाबा आढाव आणि त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढणारे लाल निशाण पक्षाचे कॉ दत्ता देशमुख, भोरचे आमदार कॉ. जयसिंग माळी आणि लढवय्या धरणग्रस्त शेतकरी स्त्री पुरुषांना निश्चितपणे जाते.  बाबांनी हा लढा तेथेच ठेवला नाही तो महाराष्ट्रातल्या धरणग्रस्तांपर्यंत पोहोचवला. महाराष्ट्रातील  धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्ताच्या लढ्यांमुळेच १९७६ चा कायदा व त्यानंतर १९८६ व १९९९ मध्ये विकसित कायदे आले. अगदी अलीकडे १५-३-२०११ ला बाबांच्या नेतृत्वाखाली पुणे ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला. त्यानंतर मंत्रालयात बैठक होऊन काही निर्णय झाले. संघटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाली म्हणून उंब्रज, ता. जुन्नर येथे कुकडी प्रकल्पातील पाच धरणांच्या धरणग्रस्तांचा मेळावाही बाबांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. *एकूणच लढ्यातील अखंडता हे बाबांचे वैशिष्ट्य आहे.*  लाभक्षेत्रात पुनर्वसन ही विकसनशील पुनर्वसनाची मागणी मान्य करण्यास बाबांनी सरकारला भाग पाडले. अर्थात हे सुखासुखी झाले नाही. बाबांनी लाभक्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक या तत्कालीन नेत्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी घेतलेल्या जमिनीवर सत्याग्रह केला व राज्यकर्त्यांना उघडे पाडले. महाराष्ट्रातील धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त जनता डॉ. बाबा आढाव यांची कायम ऋणी राहील.
 
पक्षनेतृत्वावाची नकारात्मकता
 
बाबांनी धरणग्रस्तांच्या लढ्यासाठी प्रचंड पायपीट केली.आणि नवा कायदा आणण्यात महत्वाची भूमिका बजावली तरीही लाल निशाण पक्ष व काही समाजवादी व्यक्तीन्चा अपवाद वगळता  कम्युनिस्ट व समाजवाद्यांचे या लढ्यांबद्दल नकारात्मक मत होते. १९५६ मध्ये कॉ. शरद पाटलांनी नंदुरबार जवळच्या ऊकाई धरणाच्या विरोधात धरणग्रस्तांना संघटित केले. स्वातंत्र्योत्तर काळातील हा पहिला प्रयत्न होता. त्याची एकत्रित कम्युनिस्ट पक्षाने रिकामे उद्योग म्हणून संभावना केल्याचे कॉ. शरद पाटलांनी सांगितले. त्यावेळी त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकृत नेतृत्वापैकी कोणीही आले नाही. आचार्य अत्रेंनी येऊन ते उपोषण सोडवले. बाबांना ते कार्यरत असलेल्या समाजवादी पक्षाकडून अशाच प्रकारचा अनुभव आला, तरीही बाबांनी धरणग्रस्तांना एकत्रित करण्याचे प्रयत्न सोडले नाहीत.
 
ग्रामीण विभागातील सक्रियत  १९६२ते २०१७
 
          जनतेच्या हितासाठी संघर्ष आणि संघर्ष हेच बाबा आढाव यांचे आयुष्य राहिलेले आहे. *संघर्षासाठी अहिंसक सत्याग्रह व उपोषण या साधनांचा स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातच काय संपूर्ण भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात बाबां इतका उपयोग करणारा दुसरा कोणीही नेता नाही हे मी ठामपणे म्हणू शकतो. जनतेशी असलेल्या जिवंत संबंधांमुळे नवनवीन मागण्या व त्यासाठी कल्पकतेने उभे केलेले जनआंदोलन हे बाबांचे वैशिष्ट्य आहे.* पुण्याला कृषी उत्पन्न बाजार समिती मिळण्याच्या मागणीसाठी  त्यांनी हमालांना घेऊन सत्याग्रह केला, हे फार कमी शेतकऱ्यांना माहीत असेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती ६० ते ७० च्या दशकात सुरू झालेली त्यांची सक्रियता अद्यापही चालू आहे.
 
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागील पानांवरुन पुढे चालू होत्या. २०१५ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने तर या आत्महत्यांची मोजदादच बंद केली. त्यातच नोटाबंदी सारखे निर्णय घेऊन हे सरकार शेतकरी कष्टकऱ्यांच्या जीवावर उठले असल्याची भावना महाराष्ट्रभर झाली. बाबांनी २ ऑक्टोबर २०१६ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी सलग सात दिवस पुण्यामध्ये उपोषण केले. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, शेतकऱ्यास कर्जमुक्त करा व माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा या मागण्यांसाठी बाबा पुण्यातील मार्केटयार्ड मधील शिवाजी पुतळ्यापाशी उपोषणाला बसले. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी जनता एकवटत असतानाच सरकारने एक लाखापर्यंतची फसवी कर्जमाफी योजना जाहीर केली. यासंदर्भात संपूर्ण आणि सरसकट कर्जमुक्तीसाठी महाराष्ट्रात विविध शेतकरी संघटनांची सुकाणू समिती स्थापन झाली. या समितीतही बाबा आढाव सुरुवातीपासून सक्रिय राहिले. त्यासाठी सोलापूर असो की जळगाव या परिषदांमध्ये ते कार्यरत राहिले. जळगावच्या २६ सप्टेंबरच्या परिषदेमध्ये शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची कायदेशीर जबाबदारी मार्केट कमिटीची आहे,तशा प्रकारचा कायदा अस्तित्वात आहे परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणूनच हमीभाव व कर्जमुक्तीसाठी सत्याग्रह नोंदणी करण्यात यावी,असे बाबांनी आपल्या भाषणात सांगितले. यानंतर झालेल्या बैठकीत मी (किशोर ढमाले) लवकरच बलिप्रतिपदा येत आहे त्या दिवशी सर्व शेतकरी संघटनांनी आपापल्या प्रभावाच्या गावांमध्ये कृषीसम्राट बळीराजाची गौरव मिरवणूक काढावी व शेतकऱ्यांमधील आत्मविश्वास जागवावा अशी सूचना मांडली. या सूचनेला बाबांनी जोरदार समर्थन दिले त्यावर शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी मिरवणुकीचा शेवट पोलीस स्टेशनवर करावा व तेथे शेतकऱ्याना आत्महत्येला भाग पाडल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशी सूचना केली. (कारण देवेंद्र फडणवीस यांनीच तत्पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेता असताना केली होती) माझा प्रस्ताव बाबांच्या व किसान सभेचे नेते डॉ अशोक ढवळेंच्या समर्थनामुळे या उपसूचनेसह मान्य झाला आणि राज्यभरात २०१७ च्या बलिप्रतिपदेला जवळजवळ ५०० हुन अधिक गावांमध्ये अशा प्रकारची बळीराजा गौरव मिरवणूक निघाली. १९७२ पासून २०११ पर्यंत अनेक दुष्काळांबद्दल बाबांनी सरकारला धारेवर घरले आहे.शेतकरी विभागातील बाबांची ही सक्रियता महात्मा फुलेंच्या शेतकऱ्यांच्या आसूडची आठवण करून देणारी ठरली आहे.
 
आदिवासी प्रश्र्नांबद्दल संवेदनशीलता
 
धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासींच्या जमिनी एका मागोमाग एक कब्जात घेण्याचे कारस्थान बहुराष्ट्रीय पवनऊर्जा कंपन्यांनी चालवले होते. त्याला सरकारचे समर्थन होते. या विरोधात २००७ मध्ये सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने एक जनआंदोलन उभे केले. या आंदोलनाला चिरडण्यासाठी शासनाने प्रमुख कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षड्यंत्र रचले. माझ्यावर चार महिन्यातच १३ गुन्हे दाखल करण्यात आले. पाच जिल्ह्यातून हदद्पार  करण्याची नोटीस देण्यात आली. यासंदर्भात कॉ रामसिंग गावित यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन उभे राहिले. या आंदोलनाला डॉ. बाबा आढाव यांनी पाठिंबा दिला. एक दिवस वीज कामगारांचे नेते एम.जी. धिवरे यांचा मला फोन आला. फोनवर त्यांनी मला कॉ. दत्ता देशमुख युवा पुरस्कार तुम्हाला देण्यात येत आहे असे सांगितले.  मी काही पुरस्कार वगैरे स्वीकारत नसल्याचे त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी त्याच बैठकीत उपस्थित असलेल्या बाबांकडे फोन दिला. फोनवर  बाबांनी मला सांगितले की तुला महाराष्ट्र सरकारने पाच जिल्ह्यातून हद्दपारीची नोटीस दिली आहे ; म्हणूनच आम्ही महाराष्ट्रातील सर्व परिवर्तनवादी नेते धुळ्यात येऊन तुला हा पुरस्कार देणार आहोत आणि सरकारला आम्ही तुझ्या पाठीशी असल्याचे दाखवून आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाबद्दल आणि तुझ्या हद्दपारीबद्दल जाब विचारणार आहोत. म्हणून तू पुरस्काराला हो म्हण, बाबांच्या या आदेशामुळे मी तो पुरस्कार स्वीकारला. माझ्याबरोबरच आमदार भाई गणपतराव देशमुख यांना कॉ. दत्ता देशमुख गौरव पुरस्कार देण्यात आला. डॉ बाबा आढावांच्या अध्यक्षतेखाली जागतिकीकरण विरोधी मंचाचे लढाऊ नेते आणि जनआंदोलनाचे मार्गदर्शक भाई डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते आणि भाई गणपतराव देशमुख, वयोवृद्ध नेते कॉ. यशवंत चव्हाण, कॉ. सुभाष काकुस्ते, कॉ. जोगळेकर, कॉ. एम. जी. धिवरे यांच्या उपस्थितीत आणि हजारो आदिवासी शेतकरी शेतमजुरांच्या साक्षीने धुळ्यामध्ये प्रचंड मिरवणूक, पुरस्कार वितरण सभा २४ फेब्रुवारी २००९ रोजी झाली. बाबांचे म्हणणे बरोबरच होते या जाहीर कार्यक्रमामुळे त्यातील भाई एन.डी. पाटील, साथी बाबा आढाव यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सरकारला तात्पुरती का होईना दडपशाही आवरती घ्यावी लागली. आदिवासींचे पवनऊर्जा प्रकल्पांसाठी विस्थापन करण्याच्या योजनेत काही काळ खंड पडला. धरणग्रस्त शेतकरी असोत की भूमिहीन शेतमजूर, शहरातील झोपडपट्टीवासीय असोत की जंगल पट्ट्यातील आदिवासी सर्वस्तरीय विस्थापनाबद्दल बाबा सजग असतात. उच्चजातवर्गीयांच्या  स्वार्थी विकासनीतीमुळे सर्वसामान्य विशेषतः शेतकरी व आदिवासी यांचा बळी जाणार आहे हे बाबांना त्यांच्या समाजवादी दृष्टिकोनामुळे निश्चितपणे माहित आहे.त्यामुळेच बाबांनी १९५३ पासून म्हणजे कल्याणकारी भांडवलशाहीच्या प्रारंभापासून ते आजच्या ब्राम्हणी कॉर्पोरेट भांडवलाच्या  मनुवादी विकास नीतीला विरोध करत, विस्थापितांच्या बाजूने उभे राहत, लढे सत्याग्रह आंदोलने केली आहेत.
 
सत्यशोधक सत्याग्रही समाजवादी विचार व व्यवहार
 
१९३० म्हणजे सत्यशोधक चळवळीने ब्राह्मणेतर पक्षाचे रूप घेणाऱ्या पहिल्या वाकड्या वळणानंतर काँग्रेसमध्ये विलीन  होण्याचे दुसरे वाकडेतिकडे वळण घेतले,त्याचवर्षी बाबांचा जन्म झाला आहे. या योगायोगाकडे मी फक्त लक्ष वेधतो
 स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात समतेचा विचार फुलेवाद, मार्क्सवाद, गांधीवाद व आंबेडकरवाद या चार अंगानी आला. बाबांनी पहिल्यांदा राष्ट्रसेवा दलात साने गुरुजींच्या मार्फत आलेला गांधीवाद  स्वीकारला.या गांधीवादातील अहिंसक सत्याग्रहाचा एक जीवनमूल्य म्हणून त्यांनी स्वीकार केलेला आहे. पुढे महात्मा फुले ते दिनकरराव जवळकर व्हाया राजर्षी शाहू व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अशा विकसित झालेल्या सत्यशोधक विचारांची डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या जातीव्यवस्थाविरोधी लोकशाही समाजवादाशी व बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीस्त्रीदास्यांतक लोकशाही क्रांतीच्या विचारांशी सांगड घालत, *गोळाबेरजेतून एक नव्या पद्धतीचा सत्यशोधक सत्याग्रही समाजवादी विचारव्यवहार बाबांनी विकसित केला आहे. त्यांनी स्वतःच स्वतःला घडवले आणि आपल्या सोबत कष्टकरी जातीवर्गातील स्त्रीपुरुषांना व एकूणच महाराष्ट्रातला या नव्या मुशीत घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत केली.
 
घराजवळच्या राष्ट्रसेवा दलाच्या शाखेमध्ये तसेच सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीच्या काळात शाहू महाराज व अप्पासाहेब जेधे, बाबुराव जगताप यांच्या प्रयत्नाने स्थापन झालेल्या श्री. शिवाजी मराठा सोसायटीच्या शाळेमध्ये दिनकरराव जवळकराचे सुपुत्र शिवाजीराव, साथी भाई वैद्य, निळू‌भाऊ फुले अशा सहाध्यायांबरोबर तसेच सत्यशोधक आजोबांच्या संस्कारात पुण्याच्या पूर्व भागातील बहुजनवादी वातावरणात बाबा वाढत होते. १९५२-५३ पासून आजपर्यंत कार्यरत बाबांच्या ७५ वर्षाच्या सार्वजनिक जीवनाचे ढोबळमानाने दोन भाग पडतात बाबा १९७० पर्यंत संसदीय राजकारणात कार्यरत होते पुण्यातील नानापेठेतून दोन वेळा नगरसेवक, एकदा महापौरपदाची उमेदवारी तर दोनवेळा खेडमधून लोकसभेची उमेदवारी बाबांनी केली या काळातही संसदीय राजकारणासोबतच रस्त्यावरच्या संघर्षाच्या राजकारणात बाबा सक्रिय होते.
 
हमाल आणि असंघटित कामगारांसाठीं लढा
 
१९५४च्या सुमारास बाबांनी पुण्यात हमाल पंचायतीची स्थापना केली कामाची शाश्वती नाही, कामाचे तास व कामाचा मोबदला ठरलेला नाही, कामाच्या ठिकाणी सुरक्षेची हमी नाही, ठरलेला मोबदला मिळेलच याचीही खात्री नाही. कष्टाला तर पारावार नाही अशा असुरक्षित व भविष्याची हमी नसलेल्या या असंघटित क्षेत्रातल्या हमालांचे संघटन करण्याचा बाबांनी निर्णय घेतला. त्यावेळच्या समाजवादी व कम्युनिस्ट पक्षांना असंघटित क्षेत्रात रस नव्हता त्यांना गिरणी कामगार, महापालिका कामगार, बँका-एलआयसी कर्मचारी,शासकीय कर्मचारी यांना म्हणजेच त्यांच्यासाठी काही कायदे होते अशा संघटित क्षेत्रातल्या लोकांना संघटित करण्यातच विशेष रस होता. संघटित क्षेत्र त्या काळात आणि आजही दोन-चार टक्क्यांच्या पलीकडे नव्हते, तरीही लाल निशाण पक्षाचा सन्माननीय अपवाद वगळता कम्युनिस्ट पक्ष व एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्ष असंघटितांना संघटित करण्यात स्वारस्य दाखवत नव्हते. कामगार वर्ग हा क्रांतीचा नायक आहे. या सिद्धांतावर कम्युनिस्ट पक्ष उभे होते व तो कामगार वर्ग म्हणजे संघटित क्षेत्रातलाच कामगार वर्ग यावर त्यांचा ठाम विश्वास होता. स्वतःच्या पोटापाण्यासाठी हतबल असलेला हा असंघटित कामगार – या असंघटित विभागाला क्रांतीच्या प्रक्रियेत काही भूमिका नसल्याचेही काही डाव्यांचे मत होते. म्हणूनच असंघटित क्षेत्रातल्या कष्टकऱ्यांना एकत्र करण्याच्या बाबा आढावांच्या चळवळीबद्दल त्यांना त्यावेळी ममत्व नव्हते. बाबांनी मात्र हमाल, त्यानंतर कागद काचपत्रा गोळा करणारे कष्टकरी स्त्री-पुरुष, घरकाम करणाऱ्या मोलकरीण स्त्रिया, यांना संघटीत करत आपल्या कामामध्ये सातत्य ठेवले. या असंघटितांना आर्थिक प्रश्नांवर संघटीत करीत असतानाच एक व्यापक प्रबोधनाची पेरणी करून त्यांच्या सामाजिक जाणीव विकसीत करण्याचा अविरत प्रयत्न त्यांनी केला. म्हणूनच  नंतरच्या काळातील बाबांच्या पुढाकारातील जातीव्यवस्थाविरोधी अनेक मोहीमांसाठी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरील अगदी जयपूर, दिल्ली, पर्यंतच्या मोहिमांमध्ये या कष्टकऱ्यांनी साथ दिली आर्थिक भारही उचलला आणि बाबांचा त्यांच्यावरील विश्वास सार्थ केला.
 
सत्यशोधक चळवळ आणि एक गाव एक पाणवठा लढ्याचे पुनर्जीवन
 
डॉ. बाबा आढाव यांनी गोवा मुक्ती सत्याग्रहात वैद्यकीय पथक नेऊन सहभाग घेतला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते सक्रिय होते. या चळवळीत क्रांतिसिंह नाना पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असलेल्या दादासाहेब गायकवाड यांनी द्विभाषिक राज्याला विरोध करत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या मागणीच्या प्रबोधनाबरोबरच सामाजिक समतेचे एक गाव एक पाणवठ्याचे प्रबोधनही केले. बाबांनी या स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर प्रयोगाचे अत्यंत कल्पकतेने व निष्ठेने राज्यव्यापी पुनरुज्जीवन केले.
 
१९७१ मध्ये बाबांनी समाजवादी पक्षाच्या राज्यशिबिरात एक प्रबंध मांडला,त्यात लवकरच १९७३ मध्ये सत्यशोधक समाजाचे शताब्दी वर्ष येणार आहे तसेच १९७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३०० वर्षे पूर्ण होत आहेत, तसेच राजर्षी शाहू छत्रपतींच्या जन्मशताब्दीचेही ते वर्ष आहे; त्यानिमित्ताने सत्यशोधक चळवळीचा सुटलेला धागा पुन्हा जोडण्याची संधी आपण गमावता कामा नये. यानिमित्ताने महाराष्ट्रभर प्रबोधनाचे वादळ उभे करावे अशी सूचना बाबांनी केली. परंतु सत्यशोधक चळवळीची आता काही गरज नाही, जुनी मढी उकरून काढू नका असे सांगत बाबांच्या प्रबंधाच्या प्रयोजनावरच समाजवादी पक्षात सुंदोपसुंदी होऊन बाबांना नकारात्मक प्रतिसाद मिळाला. परतु थांबतील ते बाबा कसले? २७ नोव्हेंबर १९७१ रोजी त्यांनी रावसाहेब पवार, दत्ता काळेबेरे आदी सहकाऱ्यांना घेऊन  
महात्मा जोतिराव फुले समता प्रतिष्ठानची स्थापना केली. २८ नोव्हेंबर १९७२ पासून त्यांनी भ्रमंतीला सुरुवात केली. ‘एक गाव एक पाणवठा’ या मोहिमेचा आरंभ केला, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या विभागात शक्यतो एखाद्या तालुक्यात सलगपणे हिंडायचे, तालुक्याच्या अगर जिल्ह्याच्या ठिकाणी या मोहिमे संदर्भातील प्रकरणाचे निराकरण करायचे, राजकीय व सामाजिक पुढाऱ्यांना भेटून त्यांच्या कानावर ही प्रकरणे चालायची, तारुणांची साथ मिळवायची, हिंडताना सोबत डायरी बाळगायची आणि आपले आलेले अनुभव जनतेसमोर , कार्यकर्त्यांसमोर नमूद करत नंतर डायरी लिहायची अशा प्रकारचा बाबांचा दिनक्रम होता. दीड दोन वर्षात जवळपास ७०-७५ मोठ्या गावातील तरुणांपुढे त्यांनी व्याख्याने दिली. ३० तालुक्यांमधील ४०० च्या वर खेड़ी पाहिली, मुक्काम केला, सभा घेतल्या, तरुणांची शिबिरे घेतली. दुष्काळ होता तरीही हमालपंचायतीने प्रवास व टपाल खर्चासाठी मदत सुरू केली व इतर मित्रांनीही सहकार्य दिले. एक गाव एक पाणवठ्यासाठीचे  प्रबोधन चालू असतानाच बाबा स्वतःही शिकत होते.सत्यशोधक  चळवळ केवळ पुरोहित वर्गाविरुद्धच नव्हे तर काही ठिकाणी सावकार व जमीनदारांविरुद्ध आणि काही ठिकाणी शेटजी मंडळींच्या विरुद्ध असल्याचेही त्यांना लक्षात आले. ग्रामीण साहित्याशी, लोककलेशी त्यांचा परिचय झाला.सामाजिक चळवळीच्या इतिहासाचा अभ्यास झाला.
 
“तुका म्हणे झरा आहे मूळचाची खरा” जातीव्यवस्था विरोधी लढणाऱ्यांमध्ये पाण्याच्या प्रश्नाला मध्यवर्ती स्थान असल्याचे दिसते. महात्मा फुले यांनी अस्पृश्यतेविरुद्ध लढ्यात स्वतःचा पाण्याचा हौदच खुला केला .डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडला चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. या बरोबरच स्वातंत्र्योत्तर काळातील क्रांतीसिंह नाना पाटील, दादासाहेब गायकवाड यांच्यापासून प्रेरणा घेत बाबांनी एक गाव एक पाणवठा लढा तर केलाच,परंतु पुणे महापालिकेने पाणी वाटपात बहुजन दलित भटक्यांचे वस्तीस्थान असणाऱ्या पूर्व भागावर अन्याय करत सदाशिव – नारायण पेठेच्या उच्चजातीय पश्चिम भागाला झुकते माप दिल्याचा निषेध करत डॉ  बाबा आढाव यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला.        
 
 बाबांच्या “एक गाव एक पाणवठा” या पुस्तकाची दखल मराठीतील विचारवंत व समीक्षकांनी घेतली नाही,अशी खंत श्री.पु. भागवतांनी प्रा ग.प्र.प्रधानांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. त्यावर बाबांनी संत तुकाराम महाराजांचा 
 लिहिली अक्षरे नव्हती केवळ बुद्धीची उत्तरे
 नाही केली अटी काही मानदंभासाठी,
कोणी भाग्यवंत तया कळेल उचित
तुका म्हणे झरा आहे मूळचाची खरा
हा अभंग उद्रृत केला आहे. तो बाबांना खरेच लागू होतो हे इतिहासच नक्की सिद्ध करेल.
 
संसद बाह्य भूमिकेची पायाभरणी
 
१९७० ते ८० चे दशक महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण दशक आहे.१९७१ ला बाबांनी समाजवादी पक्षालाच नव्हे तर एकूण संसदीय राजकारणाला विधायक नकार देत संसदबाह्य राजकारणाचा पुकारा केला. महात्मा फुले समता प्रतिष्ठान सुरू केले १९७२ ला मुंबईमध्ये प्रस्थापित रिपब्लिकन नेतृत्वविरुद्ध बंड पुकारत अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज. वि. पवार इत्यादींनी दलित पँथरची स्थापना केली. प्रस्थापित समाजवाद्यांविरुद्ध जातिव्यवस्था विरोधी संसदबाह्य दबावगटाची भूमिका घेऊन युवक क्रांती दल मैदानात उतरले. संसदीय कम्युनिस्ट नेतृत्वाला आव्हान देत याच काळात बंगालमध्ये नक्षलवादी चळवळीला सुरुवात झाली. तर प्रस्थापित कम्युनिस्ट नेतृत्वाने लोकशाही पद्धतीने चर्चा केली नाही तसेच जातीव्यवस्थाविरोधी विचार व लढ्याला नकार दिला म्हणून कॉ शरद पाटलांनी मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद या नव्या तत्वज्ञानावर सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. मागोवा गट त्यातून श्रमिक संघटना, श्रमिक मुक्तिदल यांची निर्मितीही याच काळातली आहे. याच कालखंडात महाराष्ट्रात नव्हे तर देशात आर्थिक अरिष्टाबरोबर जातीय अरिष्टही तीव्र होत गेले. या अरिष्टांच्या विरोधात देशभर संघर्षही तीव्र होत गेला आणि हा संघर्ष दडपण्यासाठी १९७५ ला इंदिरा गाधींनी आणीबाणी जाहीर केली. असे संपूर्ण धामधुमीचे दशक होते. याच कालखडात बाबांनी आणीबाणीला विरोध करत अहिल्याश्रमामध्ये झोपडपट्टीवासीय व सर्व कष्टकऱ्यांची सभा घेतली. त्यानंतर त्यांना १८ महिने तुरुंगवास भोगावा लागला. 
 
संघाची ढोंगबाजी 
 
बाबांनी येरवडा कारागृहात एकत्र राहिल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जवळून पाहिले. बाळासाहेब देवरसांसह संघाचे अनेक पदाधिकारी येरवडा कारागृहातच होते. या अनुभवांच्या आधारे संघापासून सावध (१९७७) आणि ढोंगी संघ (१९७९) असे दोन लेख बाबांनी लिहिले. या लेखांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आजतागायत उत्तरे दिलेले नाहीत. परंतु या दोन्ही लेखांबद्दल जनसंघासह एकत्रितरीत्या जनता पक्षाची स्थापना करणाऱ्या एस. एम. जोशी व नानासाहेब गोरे हे नेते नाराज होते. एस. एम. जोशींनी तर गलबतात बसल्यानंतर काही लोकांना उलटयाच होतात, तसाच बाबा आढावांचा प्रकार असल्याचे जाहीरपणे सांगितले. रा. स्व. संघ आता बदलला आहे. असेच जनता पक्षाची लाभार्थी मंडळी सांगत होती. १९७८ च्या जनता पक्षाच्या पुण्यातील अधिवेशनात डॉ. रावसाहेब कसबे यांचे रा.स्व. संघाच्या विषमतावादी तत्त्वज्ञानाची चिकित्सा करणाऱ्या  *झोत* या पुस्तकाची जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी होळी केली, तेव्हा संघ बदललेला नाही तो विषमतावादीच आहे हे डॉ. बाबा आढावांचे म्हणणेच बरोबर असल्याचे सिद्ध झाले. बाबा व डॉ. कसबे यांच्या प्रयत्नांमुळेच समाजवादी चळवळ संघमय होण्यापासुन वाचली म्हणायच!  त्यानंतर १९८९ मध्ये बाबांच्या *सत्यशोधनाची वाटचाल* या पुस्तकाला प्रस्तावना देताना ना.ग. गोरे बदलले असे वाटले, परंतु याच काळात ना.ग. गोरे यांचा वाढदिवस रा.स्व संघाच्या पुण्यातील मोतीबागेत त्यांच्याच उपस्थितीत संघाने साजरा केला. ना.ग. गोरेंनी त्या सत्कारात संघाने आपल्या तत्वज्ञानाचा फेरविचार करावा, सर्व जगात अशा तऱ्हेच्या फेरविचारांची लाट सुरू आहे असे आवाहन केले. त्याचा खरे तर काहीच उपयोग होणार नव्हता.
 
बाबांनी ४ नोव्हेंबर ८९ ला नानासाहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना प्रत्यक्षात नेमके काय घडले,संघाबद्दलच्या आपला दृष्टिकोन बदलण्याचे प्रयोजन कोणते? वगैरे प्रश्न त्यांनी विचारले आणि बहुतेक आगामी निवडणुकीत उर्वरित जनता पक्षाने भाजपशी जुळून घ्यावे असे नानासाहेबांना वाटत असावे असे सूचक विधान बाबांनी केले. संघाची घटना, गुरुदक्षिणेचा हिशोब, एक चालुकानुवर्तित्व, संघटनेची फॅसिस्ट पद्धत, पराकोटीचा मुस्लिम द्वेष, जातीव्यवस्थेबद्दलचे विशेष प्रेम, असे कितीतरी प्रश्न बाबांनी संघाला विचारले आहेत. ते आजही कायम असल्याचे  बाबा मांडतात. रा.स्व.संघाला सत्यशोधक विचारांच्या आधारे  तीव्र विरोध करण्याचे काम डॉ. बाबा आढावांनी अखंडपणे केले आहे. रा.स्व. संघाबद्दल लेख लिहिले म्हणून समाजवादी नेते बाबांवर नाराज होते तर कॉ. शरद पाटलांनी ‘माणूस’ या साप्ताहिकात डॉ. रावसाहेब कसबे यांच्या झोत या पुस्तकाचे परीक्षण लिहिले म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तत्कालीन नेतृत्वाने कॉ. शरद पाटलांवर कारवाई केली.आजही भारतात फॅसिझम आला आहे यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विश्वास नाही! अशी चर्चा आहे.सांगण्याचा मुद्दा हा की ७० ते ८० च्या दशकात महाराष्ट्रात आणि देशात जातीव्यवस्था व स्त्रीदास्याविरोधात एक जबरदस्त लढाई चालू होती. या लढाईत डॉ. बाबा आढावांनी अनेक कार्यक्रम दिले. एक गाव एक पाणवठ्यापासून त्याची सुरुवात होते. पुढे मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची नामांतराची लढाई सुरू होते.
 
नामांतर व मंडल आयोगासाठी लढ्याचा कालखंड
 
मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव देण्याचा ठराव विधिमंडळात मंजूर झाला. त्या पाठोपाठ मराठवाडयात दंगलीना सुरुवात झाली. बाबांनी या लढ्यात उडी घेतली. या लढ्यात समता प्रतिष्ठान मार्फत डॉ. बाबा आढावांनी  व कॉ. शरद पाटील यांनी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षामार्फत दलितेतर समूह म्हणजे बाबांनी मध्यम जातींना घेउन तर कॉ. शरद पाटील, कॉ. साजुबाई गावीत यांच्या नेतृत्वात आदिवासींनी या लढ्यात सहभाग घेतला. या काळात बाबा आढावांचे पुरोगामी सत्यशोधक  हे नामांतरवाद्यांचे मुखपत्र बनले होते. उदाहरणार्थ जुलै, ऑगस्ट सप्टेंबरचा १९७८ चा ‘जाळलेली घरे, चारलेली शेते, तोडलेली माणसे’ या शीर्षकाचा विशेषांक त्यांनी प्रसिद्ध केला. बाबांनी मराठवाड्यातील दंगलीनंतर नामांतराबाबत कोणती भूमिका घ्यायची? आणि दलित मुक्तीचा लढा कोणत्या पद्धतीने पुढे न्यायचा? असे दोन प्रश्न उपस्थित केले. आणि दलित मुक्तीचा लढा सर्वंकष समतेच्या लढ्यापासून अलिप्त ठेवणं ठेवता येणार नाही. दलित नेत्यांना या चळवळीचे नेतृत्व करावेच लागेल. जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील पुरोगामी लोकशाही आघाडीमुळे विषमतावाद्यांशी राजकीय विरोध संपुष्टात आले आहेत. त्यामुळे परिवर्तनाच्या प्रश्नांची कोंडी झाली आहे. दलितांना फार नेटाने व निग्रहाने मोर्चेबांधणी करावी लागेल असे बाबांनी सांगितले. स्वतः नामांतरासाठी पुणे ते औरंगाबाद लाँग मार्च काढला नामांतर सत्याग्रहात अटक झाल्यानंतर बाबांनी आणि शरद पाटलांनी तुरुंगातच उपोषण केले. डॉ. जोगेंद्र कवाडे, गंगाधर गाडे यांसारख्या नेत्यांनी या लढ्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. नामांतर लढ्यात अनेकांनी बलिदान दिले आहे.( येथे तपशील देणे शक्य नाही.) “समतेच्या चळवळीशी केवळ शाब्दिक बांधिलकी जाहीर करून भागणार नाही. या देशातील परंपरा विषमतेची आहे लोकमानसात ती रुजलेली आहे. त्याच्याविरुद्ध कणखरपणे उभे राहण्याची गरज आहे”असे सांगत लोकशाही समाजवादी, इहवादी, विज्ञानवादी विचारांचा बाबांनी निर्धारपूर्वक पुरस्कार केला. पुरोगामी सत्यशोधकच्या या विशेषांकात अविनाश डोळस आणि प्रकाश शिरसाठ या तत्कालीन दलित युवक आघाडीच्या नेत्यांचे मराठवाड्यातील दंगलीबद्दलचे आजही अंगावर काटा येतील असे रिपोर्ट आहेत, तसेच प्रा. मे. पु. रेगे, श्रीराम गुंदेकर या दलितेतरांचेही लेख आहेत. बाबा प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रबोधनाच्या आघाडीवरही सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचे धोरण घेत होते. नामांतराचा लढा केवळ दलितांवर सोडत नव्हते.
 
नामांतर चळवळीत ते सातत्याने अग्रभागी राहिले. या चळवळीत पुढे मतभेद निर्माण झाले. नामांतर व मंडल आयोगाचा प्रश्न एकत्रितरित्या लढवावा व कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी व दलित नेत्यांना बरोबर घेऊ नये अशी भूमिका शरद पाटील यांनी घेतली. तर सध्याच्या परिस्थितीत नामांतर व मंडल आयोग हे प्रश्न स्वतंत्रपणे लढवत नंतर समूहांची एकजुट करण्याची भूमिका घेत मंडल आयोग अंमलबजावणी मागणी साठीची स्वतंत्र परिषद बाबांनी पुण्यामध्ये घेतली. शरद पाटलांनी धुळ्यामध्ये नामांतर – मंडल आयोग अंमलबजावणी मागणीसाठी संयुक्त परिषद घेतली.     
 
१९७० मध्ये बाबांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा जातीचे प्राबल्य यावर आचार्य अत्र्यांच्या दैनिक मराठा मध्ये दोन लेख लिहिलेले होते. सत्यशोधक चळवळीने बहुजन समाजात केलेल्या जागृतीचा लाभ घेत सत्तेवर आलेल्या नवश्रीमंत मराठा नेतृत्वावर त्यांनी गंभीर टीका केली. तसेच मराठा समाजाच्या सरंजामीवृ‌त्तीबद्दल चिकित्सा केली, विशेषतः मराठा स्त्रियांच्या स्थितीबद्दल त्यांनी लिहिले. त्या लेखात मध्यम शेतकरी जातीतील मराठ्यांव्यतिरिक्त जाती व कारागीर जातीही जागृत नाहीत व त्या प्रारब्धवादात अडकल्या आहेत असे म्हटले होते. १९८० नंतर त्याची प्रचिती येत होती. बाबा मंडल आयोगाकडे जातीव्यवस्था निर्मूलनाच्या लढ्यातीत एक महत्त्वाचा टप्पा व कॉ. शरद पाटील हे जातीस्त्रीदास्यांतक लोकशाही क्रांतीचा एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणून पाहत होते. उलट जनता पक्षातील समाजवादी (अपवाद भाई वैद्य) व देशभरातले कम्युनिस्ट यांना मात्र मंडल अहवाल हा वर्ग लढ्यात फूट पाडणारा वाटत होता. पश्चिम बंगालच्या कम्युनिस्ट सरकारने तर आमच्याकडे जाती शिल्लकच नाहीत असाच अहवाल मंडल आयोगाकडे सादर केला होता! स्वकीयांच्या या प्रतिकूल पार्श्वभूमीवर डॉ. बाबा आढाव यांचे द्रष्टेपण लक्षात घेतले पाहिजे.
 
फुले प्रणित सांस्कृतिक क्रांतीचे नवे रूप
 
‘नरक सफाईची गोष्ट’ या समता आंदोलनाच्या अरुण ठाकूर व महम्मद खडस यांनी लिहिलेल्या पुस्तकाला बाबा आढावांनी प्रस्तावना लिहिली आहे. बाबा त्यात म्हणतात, ” हिंदुस्थानात हजारो जातीजमातींचा बुजबुजाट आहे. भारतात शेतीत नवनव्या  बियाणांचा शोध लावता आला नाही; मात्र जातींची प्रचंड पैदास येथे झाली आणि या प्रत्येक जातीत जातपंचायतीद्वारा अनुशासन, जातीला चिटकून राहण्याची प्रवृत्ती व जातीचा अभिमान या सर्व बाबी स्पष्टपणे येतात. भारत म्हणजे जात निर्मितीचा प्रचंड कारखाना असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. भारतातील दलित, मागास जातीच दैन्य, दारिद्र्य, त्यांच्या वाटेला आलेलं दुःख पराकोटीचं आहे. कर्मविपाकाच्या सिद्धांताने इथल्या धर्माच्या तत्त्वज्ञानाशी त्याची निरगाठ बांधली गेलेली आहे. जन्माने मिळालेली जात टाकता येत नसते, वाट्याला आलेले जिणं जगायचं असतं हा कर्माचा भोग असतो. या जन्मात नकार दिला तर पुढच्या जन्मात तो भोग पिच्छा सोडत नाही. भारतीय समाज पुरुषाचे पंख असे कापून टाकले गेलेले आहेत. भारतातील भंगी-मेहतरही त्याला अपवाद नाहीत. या जातीव्यवस्थेविरुद्ध महात्मा फुले यांनी एका सांस्कृतिक क्रांतीचे बीजारोपण केले आहे. ती क्रांती पूर्णत्वास नेणे हे आपले काम असल्याचे” बाबांनी सातत्याने सांगितले आहे. या क्रांतीसाठीच त्यांनी विषमतेचा धिक्कार, अज्ञानाला नकार आणि स्वातंत्र्य-समता-बंधुतेचा स्वीकार ही भूमिका ठेवली. कर्मकाड, व्रतवैकल्य यांना विरोध केला. दुष्काळामध्ये तनपुरे महाराजांचा वारकरी संप्रदायालाही मान्य नसलेल्या सरकारी आशीर्वादाच्या यज्ञाला त्यांनी विरोध केला. कोपरगावला समाजवादी साथी किशोर पवारांच्या मार्गदर्शनाखालील कर्मकांडी सप्त्याला विरोध करणाऱ्या रणजीत परदेशी, सुरेश पगारे, मोहन गुंजाळ या सत्यशोधक समाजवादी तरुणांच्या लढ्याला त्यांनी पाठिंबा दिला. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील जातीय भेद‌भावाविरोधात सत्याग्रह  केला. जातीव्यवस्था व तिच्या मूल्यसंस्कारांवर, धार्मिक आधारावर बाबांनी चौफेर हल्ला केला. जयपुरला उच्च न्यायालय समोर मनूचा पुतळा मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्‌घाटीत केला गेला, ही बातमी पुरोगामी सत्यशोधक मध्ये केवळ छापून ते थांबले नाहीत, पुढे  नागेश चौधरी, प्रतिमा परदेशी, महेश बनकर या सत्यशोधकांना बरोबर घेऊन सत्यशोधक मंचाची स्थापना त्यांनी केली व मनुहटाव साठी जयपूरपर्यंत धडक मारली. जातिव्यवस्थाविरोधी संसदबाह्य लढा महाराष्ट्र बाहेर नेण्याचा त्यांचा हा ऐतिहासिक प्रयत्न होता.
 
भटक्या विमुक्तांच्या साथीला बाबा
 
भारतात जातीव्यवस्थेने गावात काय गावकुसाबाहेरही ज्यांना जागा नाकारलेली आहे असा एक मोठा समूह आहे. १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले पण भटके मात्र अजूनही पारतंत्र्यातच आहेत. बाबांनी सातत्याने भटक्या विमुक्तांच्या प्रश्नात लक्ष घातले, वडार, फासेपारधी, कैकाडी यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली. दौलतराव भोसले, बाळकृष्ण रेणके, यल्लप्पा वैदू, ना. वा. माने, व्यंकप्पा भोसले या कार्यकर्त्यांनी भटक्या विमुक्तांचे संघटन करण्यात पुढाकार घेतला त्यांना बाबा आढावांनी सातत्याने सहकार्य केले. भटक्या विमुक्तांचे एक नेते लक्ष्मण माने यांनी तर देशात भटक्या जमातीत न जन्मलेले परंतु भटक्यांचा प्रश्न कळालेले मोजके लोक आहेत, त्यात डॉ. बाबा आढाव, यशवंतराव चव्हाण व शरद पवार हे तीन मराठे आहेत असे म्हटले  आहे. बाबा या प्रश्नावर लिहिताना म्हणतात ” ब्रिटिश काळात गुन्हेगारी जातीचा कायदा करण्यात आला. जन्माने गुन्हेगार ठरवलेल्यांना पुन्हा शासनकर्त्यांनी गुन्हेगार ठरवले. १९५२ ला हा कायदा रद्द झाला परंतु अद्याप या जातीच्या वाटेला आलेले जिणे संपलेले नाही. पोलिसांनी हॅबिट्‌चुअल ऑफेंडर्स ऍक्ट खाली त्यांच्या मागे ससेमिरा लावला आहे. पोलीस व गावगुंड यांच्याकडून होणारी मारहाण जीवघेणी असते. या देशातील नागरी हक्क या मंडळींना अद्याप बहाल व्हायचे आहेत.” (पुरोगामी सत्यशोधक जानेवारी ते मार्च ८७) महात्मा फुले समता प्रतिष्टानचे सरचिटणीस असलेल्या लक्ष्मण माने यांनी २६ जानेवारी १९८७ पासून भटक्या विमुकतांची  शोधयात्रा लातूर पासून सुरू केली. बाबा या शोधयात्रेत लातूर पासून मुंबई पर्यंत अनेक ठिकाणी सहभागी झाले. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी या संस्थेच्या तथाकथित सेविकांनी खेड शिवापूर मध्ये जाऊन कंजारभाट वस्ती विरुद्ध गावकऱ्याऱ्यांना भडकवण्याचे काम केले. त्यांची वक्तव्ये वर्तमानपत्रात छापून आली. बाबांनी कंजारभाटांच्या बाजूने भूमिका घेतली ते लिहितात, “कंजारभाटांनी दारू गाळायला आमचा विरोध आहे,परंतु त्यांना गावात राहूच द्यायचे नाही ही ‘दादागिरी’ कशी खपून घ्यायची?”
 
स्त्रीपुरुष समतेसाठी अथक संघर्ष
 
जातीव्यवस्थेचा  प्रश्न हा स्त्रीदास्याशी निगडित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ” भारतात स्त्रिया जातीव्यवस्थेच्या प्रवेशद्वार आहेत. स्त्रियांना गुलामीत टाकून, त्यांच्यावर बंधने लादून जातीव्यवस्थेची निर्मिती झाली” असा सिद्धांत मांडला आहे. डॉ. बाबा आढावांनी जातीचा प्रश्न व स्त्री-पुरुष विषमतेचा प्रश्न यांच्यातीत आंतरसंबंध सातत्याने लक्षात ठेवले व दोन्हींवर सारख्याच तीव्रतेने प्रहार केले. या संदर्भातील निरनिराळे प्रश्न १९७५ पासून त्यांनी पुढे आणले. महात्मा फुले समता प्रतिष्ठान देवदासी प्रथा निर्मूलनासाठी कार्य करीत आहे.१९७५ मध्ये गडहिंग्लज येथे तर १९८० मध्ये निपाणी येथे देवदासी भगिनींच्या पुनर्वसनासाठी प्रतिष्ठानने परिषदा आयोजित केल्या. महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमा भागातील गावांमध्ये देवदासी,जोगतीण प्रथा अनेक वर्षापासून चालू आहे. यल्लमाच्या नावे विविध कारणांवरून तरुण मुलींना वाहण्याची ही प्रथा बहुजन व दलित समाजात आढळते.महाराष्ट्रात यल्लम्माप्रमाणेच खंडोबाच्या नावानेही मुला-मुलींना वाघ्या, मुरळी म्हणून वाहण्यात येते. यासंदर्भात जुन्या मुंबई राज्याच्या देवदासी संरक्षण विषयक कायदा १९३४ अन्वये संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. हा कायदा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रयत्नातुन झाला. परंतु महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यात धार्मिक बाबतीत शासकीय हस्तक्षेप नको या राज्यघटना विरोधी सबबीखाली या  प्रथेविरोधात कोणत्याही प्रकारची पावले उचलली जात नाहीत, अशी तक्रार बाबा आढावांनी सातत्याने केली.७ फेब्रुवारी १९८४ ला दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिले. त्यात बाबांनी देवदासी प्रथा आजही चालू राहण्याची कौटुंबिक, पारंपारिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक कारणे नमूद केली आहेत. डॉ. अनिल अवचट यांना पुणे शहरातील वेश्या व्यवसायाची पाहणी करायला सागितले. त्यात यल्ल‌माच्या नावाने वाहिलेल्या अनेक मुली या व्यवसायात खूप प्रमाणात असल्याचे आढळून आले. बाबांनी साथीदारांना बरोबर घेऊन या प्रथेविरुद्ध आवाज उठवला. देवदासी प्रथा निर्मूलनाच्या चळवळीत विडी कामगार स्त्रियांचे मोठे संघटन निपाणीत बांधणाऱ्या प्रा. सुभाष जोशी व प्रा. विठ्ठल बन्ने यांनी मोठे काम केले आहे. सुरेश व रमेश शिरपूरकर यांनी कुटुंबासह या चळवळीत उडी घेतली. गौरवाबाई सलवादे आणि सुशीलाबाई नाईक या स्वतः देवदासी असणाऱ्या स्त्रियांनी बाबांच्या मार्गदर्शनाने या चळवळीचे धारदार नेतृत्व केले. सरकारने विधवा व परित्यक्ता स्त्रियांसाठी असलेली योजना देवदासी स्त्रियांना लागू करून शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गौरवाबाई सलवादे यांनी सरकारला प्रश्न विचारला,” आमचे लग्न देवदासी म्हणून देवाशी लागलेले आहे, आता तुमच्या कायद्यासाठी देव मेल्याचे सर्टिफिकेट मी कुणाकडून आणायचे आणि देवासाठी मला सोडले आहे, देवाने मला सोडलेले नाही तेव्हा परित्यक्ता असल्याचे सर्टिफिकेट मी कोणाकडून आणायचे?” असे म्हणत देवदासी प्रथा समजून न घेता शॉर्टकट मारणाऱ्या सरकारी योजनेची जाहीर खिल्ली उडवली. त्यानंतर सरकारने देवदासी स्त्रियांसाठी आयोग नेमत वेगळी योजना आणली. देवदासी प्रथा निर्मूलनासाठी देवदासी आयोग नेमावा,त्यांना सन्मानाने जगण्यासाठी शालेय शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण द्यावे, मागासवर्गीयांच्या सवलती लागू कराव्यात, वृद्ध देवदासींना निराधार योजना लागू करावी अशा मागण्या घेऊन म.फुले समता प्रतिष्ठानने हा प्रश्न ऐरणीवर आणला. नेहमीप्रमाणे दोन्ही सरकारांनी प्रतिसाद दिला नाही. एक वर्षांनी महाराष्ट्र सरकारने त्रोटक उत्तर पाठवले परंतु बाबा लढतच राहिले.
पुण्यामध्ये बाबांनी कष्टाची भाकर  केंद्र उभारुन कष्टकऱ्यांच्या जेवणाची स्वस्तात व्यवस्था केलीच पण त्याचबरोबर शेकडो स्त्री पुरुषांना रोजगारही उपलब्ध करून देण्याचे रचनात्मक कामही केले.
 
धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मता
 
डॉ. बाबा आढावांनी धर्मचिकित्सा व धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा सातत्याने प्रसार करण्याचा वसा घेतला आहे. ब्राह्मणी मुलतत्ववादाला मुस्लिम किंवा शीख मुलतत्ववाद जसे उत्तर असू शकत नाही तसेच कोणताही जातीय  वांशिक मुलतत्ववाद हा कोणत्याही नव्या जुन्या समस्येचे कधीही उत्तर असू शकत नाही. ही बाबांची भूमिका आहे.” हिंदूंची जातीव्यवस्था हे मूलतत्त्ववादाचेच एक रूप आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातून फुटीरता पेरलेली आहे. म्हणून एकात्मतेचा विचार करणाऱ्यांनी लोकशाही समाजवादी, सेक्युलर विचारांचा पाठपुरावा करून नव्या मानवी संबंधांचा नव्या संस्कृतीच्या निर्मितीचा ध्यास घेतला पाहिजे, ” असे बाबांचे मत आहे. “दारिद्र्य, महागाई, बेकारी इत्यादी रोजच्या जीवनातील प्रश्न कितीतरी मागे रेटले गेले आहेत. गिरणी कामगारांच्या संपात शर्थीने लढलेला कामगार वर्ग मुंबईत जातीय दंगली रोखण्यात पुढे येऊ शकलेला नाही, हे चित्र फारसे स्पृहणीय नाही; तरी वास्तव आहे. याचा राजकीय पक्ष, पुरोगामी संघटना, कामगार संघटना या सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. नवा विचार व नवीन दिशा ठरवण्याची वेळ आलेली आहे.” अशी आत्मटीकाही बाबा या संदर्भात करतात.त्यांनी पुण्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता समितीची स्थापना करून सातत्याने हिंदू मुस्लिम सलोखा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कामामध्ये डॉ. बाबा आढाव सुरुवातीपासून सक्रिय होते. सय्यदभाई आणि त्यानंतरच्या नेतृत्वाशी मतभेद असूनही बाबांनी मुस्लिम सत्यशोधकांची पाठराखण केली. बोहरा समाजातील सय्यदनांच्या हुकूमशाही विरुद्ध लढणारे ताहेरभाई पुनावाता, झैनब पुनावाला हे बाबांचे समता प्रतिष्ठान मधील आजीवन सहकारी होते.
 
फुले बदनामीला विरोध
 
महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ हे डॉक्टर बाबा आढावांच्या विचार व व्यवहारातील मध्यवर्ती घटक आहेत. पुण्यातील प्रतिगामी मडळींमध्ये ग.वा. बेहरे हे प्रमुख नाव. त्यांच्या ‘सोबत’ या साप्ताहिकातून ते सातत्याने परिवर्तनवाद्यांवर गरळ ओकत ते १९ व्या शतकातील सुधारणा विरोधी विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा वारसा विसाव्या शतकात चालवत असत. त्या साप्ताहिकात मुंबईच्या बाळ गांगल यांनी महात्मा फुलेंची अवहेलना करणारे लिखाण केले. बाबांनी त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून तसेच लेख लिहून त्यांचा पहिल्यांदा तात्काळ प्रतिवाद केला. 
 
महात्मा फुल्यांचे राहते घर म्हणजे जुन्या गंजपेठेतील फुलेवाडा येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे यथोचित स्मारक व्हावे, यासाठी बाबांनी अत्यंत कष्ट घेतले सातत्याने  सरकारकडे पाठपुरावा केला. बाबांच्याच प्रयत्नामुळे त्या वाड्यात राहणारे जुने भाडेकरू पुनर्वसनाला तयार झाले. 
एकदा यशवंतराव चव्हाण यांच्यावर सुद्धा या ‘ सोबत ‘ साप्ताहिकाने असेच अश्लाघ्य लिखाण छापले होते. त्याही विरोधात यशवंतरावांशी टोकाचे मतभेद असूनही बाबांनी भूमिका घेतली पण काँग्रेसवाल्यांनाच आपल्या नेत्याच्या अवहेलनेबद्दल काहीच वाटत नाही हे पाहून बाबा थबकल्याचे एकदा बाबांनी सांगितले.
 
विषमता निर्मूलन शिबिर
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्यावर केलेल्या सत्याग्रहाला १९७७ मध्ये ५० वर्षे पूर्ण झाली, यानिमित्ताने इंडियन सेक्युलर सोसायटी, महात्मा फुले समता  प्रतिष्ठान, समाज प्रबोधन संस्था व आंतरभारती यांनी २९ व ३० जानेवारी रोजी पुण्यात महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. हे विषमता निर्मूलन समितीचे पहिले शिबिर म्हटले पाहिजे. शांताराम पंदरे त्यांच्या “विषमता निर्मूलनची दहा वर्षे” या वसुधा सरदारांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेत  म्हणतात ” या पहिल्या शिबिरानंतर पुढे अनेक संघटना व पक्ष विनिशिमध्ये सहभागी झाले. पण प्रत्यक्षात दरवर्षी शिबिर घेण्याचे जागा, विषय व वक्ते ठरविण्याचे सर्व कष्ट पुण्याच्या महात्मा फुले समता प्रतिष्ठान, वि.नि. समिती पुणे व जेथे शिबिर असेल तेथील शिबिर समितीने उपसले आहेत. इतर सहभागी संघटना पक्षांनी फारसे कष्ट केलेले नाहीत. विनिशिमध्ये दलित-आदिवासी-भटके विमुक्त-स्त्रिया-असंघटित कामगार, शेतकरी-पाणी इत्यादींच्या प्रश्नावर तसेच धर्मचिकित्सा, जातीय दंगली, अंधश्रद्धा या प्रश्नांवर सातत्याने चर्चा झाली.महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांचा एक मंच असे स्वरूप विनिशिला प्राप्त झाले. महाराष्ट्रातील कष्टकरी समूहांमध्ये आणि जातिव्यवस्थेने दडपलेल्या घटकांमध्ये जागृती झाली, विनिशिचा व्यापक परिणामही त्याला कारणीभूत असल्याचे नोंदवत शांताराम पंदेरे यांनी पुढे विनिशि आकुंचन पावत गेली. त्याला दिशा व वैचारिक बैठक प्राप्त झाली नाही,अशी चिकित्सा केली आहे. या विनिशिच्या उभारणीत डॉ. बाबा आढाव, प्रा. गं बा. सरदार यांचा मोठा वाटा आहे.गं. बा. सरदारांनी ‘परिवर्तनवादी शक्तींची एकजुट या शीर्षकाखाली मार्गदर्शक पुस्तिका त्याकाळात लिहिली. विनिशित झालेल्या चर्चेमधूनच वसामाजिक कृतज्ञता निधीची’ कल्पना पुढे आली महात्मा फुले समता प्रतिष्ठनच्या वतीने डॉ. बाबा आढावांनी नरेंद्र दाभोळकर विनिशि तील साथींच्या सहकार्याने या उपक्रमात पुढाकार घेतला. आचार्य अत्रे यांचे लग्नाची बेडी हे नाटक डॉ. श्रीराम लागू, निळू फुल, सदाशिव अमरापुरकर, रोहिणी  हट्टंगडी इत्यादींच्या पुढाकाराने सलग २१ दिवस महाराष्ट्रात नेण्यात आले. त्यामुळे पंचवीस लाख रुपयांच्या  उद्दिष्टाचा  आकडा ५० लाखावर गेला. बाबा लिहितात, ‘भारतीय परंपरेत विषमता जोपासली गेली आहे. धर्माच्या पातळीवर तिला मान्यता लाभल्याने हाताची पाचही बोटे सारखे नसतात, असे सांगत हाच हात प्रारब्धाला लावला जातो. अशा समाजात समताधिष्ठित परिवर्तनाचा वेध घेणे सोपे नसते. हे आव्हान स्वीकारणाऱ्या कार्यकर्त्यांना सामाजिक कृतज्ञता निधीची शिदोरी उपलब्ध झाली आहे. हे ही नसे थोडके!’
 
विनिशि ची वाटचाल पुरोहितशाहीस नकार ,राखीव जागा समर्थन
 
भारतीय सेक्युलर राज्यघटना बाजू‌ला ठेवून अनेक मंत्री, सरकारी अधिकारी हे सरकारी कार्यक्रमात भटजी बोलावून भूमिपूजन करीत असून पुरोहितशाहीचे वर्चस्व वाढवित आहेत.म्हणून पुण्यातील विषमता निर्मूलन समितीने ५.२.७९ रोजी ठराव करून महाराष्ट्राच्या सर्व मंत्र्यांना पाठवला. त्याला मुख्यमंत्री शरद पवार व गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांनी फक्त पत्राची पोहोचच  दिल्याची तक्रार बाबांनी केली आहे. परंतु सहकारमंत्री एन. डी. पाटील यांनी ‘समितीच्या भावनेशी मी सहमत असून माझ्या कार्यक्रमात माझ्या हस्ते कोणतेही धार्मिक विधी आत्तापर्यंत झाले नाहीत व यापुढे होणार नाहीत’ असे उत्तर दिले. विनिशिच्या माध्यमातून पुरोगामी लोकशाही दलाच्या सरकारवर परिवर्तनवादी दबाव ठेवण्याचे प्रयत्न झाले, त्यात काही प्रमाणात यश आलेले दिसते.पुढे मात्र विनिशि मधून आंबेडकरवादी व सत्यशोधक मार्क्सवाद्यांची वजाबाकी झाल्याचे सांगत शांताराम पंदेरे यांनी कोणा एकाला सर्वस्वी जबाबदार धरण्यात मात्र नकार दिला आहे. यासंदर्भात प्रख्यात परिवर्तनवादी विचारवंत गं. बा. सरदारांनी बाबा आढावांना विनिशि व्यापक करण्याबद्दल सुचवले, याचा अजित व वसुधा सरदारांबरोबर मीही एक साक्षीदार आहे. बाबांनी खरोखरच यासाठी बरेच प्रयत्न केले. १९८५ च्या विषमता निर्मूलन शिबिरात राखीव जागा  संरक्षण व समर्थनासाठी व्यापक मच निर्माण करण्याचे ठरले. त्यानुसार खासदार दि. बा. पाटील, आमदार भाई बंदरकर, आमदार रा. सु. गवई यांच्या नेतृत्वात राखीव जागा संरक्षण समिती तयार झाली. गुजरात मधील राखीव जागाविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या नव्या समितीने आतापर्यंत राखीव जागांच्या झालेल्या अंमलबजावणीचा रोखठोक अहवाल जाहीर करणे व तामिळनाडू प्रमाणे ७८% राखीव जागा कशा करता येतील याबद्दल शासनाकडे भूमिका मांडावी असे डॉ. बाबा आढावांनी सुचवले. महाराष्ट्रात खाजगी वैद्यकीय व तांत्रिक महाविद्यालय सुरू झाल्याने पैसेवाल्या मुलांचा प्रश्न मिटला आहे. मेरिटची भाषा बोलणारे याबाबतीत मूग गिळून गप्प आहेत अशी टीका बाबांनी केली. २००२ मध्ये ऐन गणपती उत्सवाच्या काळात फर्ग्यूसन महाविद्यालयामध्ये सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे उकळल्या जाणाऱ्या फी विरोधात पुण्यातील विविध महाविद्यालयात आंदोलन सुरू केले होते. गणपती उत्सवाच्या काळातच फर्ग्युसन महाविद्यालया मध्ये या आंदोलनाने उग्ररूप धारण केले. आम्हाला बोलावून घेत या आंदोलनाचे बाबांनी तोंडभरून कौतुक केले. नव्या मंडळींचे स्वागत करण्याचे, त्यांना पाठिंबा देण्याचे काम बाबांनी मनापासुन केले आहे.
 
इतिहासाच्या पूनर्लेखनासाठी मूलभूत साधनांची जपणूक
 
आपल्या पूर्वसरींनी केलेल्या आंदोलनाची आठवण ठेवणे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, त्यांची जुनी कागदपत्रे शोधून पुरोगामी सत्यशोधक मध्ये छापणे हे जुन्याचे पुनरुत्थान आणि आधुनिक समतावादी मूल्यांची रुजवात करणे हा बाबांचा ध्यास आहे. रा. ना .चव्हाण,सिताराम रायकर, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील, डॉ य. दि.फडके, शिवाजी जवळकर, मनोहर कदम अशा अनेकांचे सहकार्य घेऊन बाबांनी 19 व्या व विसाव्या शतकातील सत्यशोधक चळवळीची कागदपत्रे जमा केली आणि यथावकाश  पुरोगामी सत्यशोधक मधून प्रसिद्धही केली. 
 
७५ वर्षाच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातल्या सार्वजनिक जीवनाच्या अनेकविध क्षेत्रात बाबांनी कष्टकऱ्यांच्या बाजूने हस्तक्षेप केला. या हस्तक्षेपात जातीस्त्रीदास्यांताला प्राधान्य होते. ‘आमची पाठ आमची मालकी’, ‘एक मत समान पत,’ ‘खासदारांना पेन्शन कष्टकऱ्यांना टेन्शन, चालायचे नाय – चालायचे नाय’ अशा सर्जनशील घोषणांना बाबांनी जन्म दिला आहे. या घोषणांसह त्यांचा कष्टकरी स्त्रीपुरुषांशी चाललेला नाट्यमय संवाद पाहणे ही एक आनंददायी गोष्ट असते. बाबा भेटल्यानंतर चाफ्याचे फुल देतात व ‘सत्यमेव जयते’ म्हणतात. बाबांनी अनेक प्रश्नांना हात घातला, अनेक प्रश्न वेशीवर टांगले, त्याबद्दल आंदोलने केली, ऊन वारा पावसात अगदी वयाच्या ९४ व्या वर्षींही आझाद मैदानात बसून उपोषण केले. बाबांच्या संपूर्ण विचारकार्याचा आढावा घेणे, मूल्यमापन करणे एका लेखात तेही एकट्याने करणे शक्य नाही. ते काम सामूहिकपणे केले पाहिजे.
 
१९७१ पासून विनायकराव कुलकर्णी, न्यायमूर्ती पी बी. सावंत, डॉ. आ.ह.साळुंखे, डॉ. य. दि. फडके, दादासाहेब नाईकनवरे, विश्वासराव नाईकनवरे, पुष्पा भावे दत्ता काळेबेरे अशा मान्यवरांनी महात्मा फुले प्रतिष्ठानचे अध्यक्षपद भूषवले,कार्याध्यक्षपद मात्र बाबांकडेच होते. बाबांचे अनेक सहकारी प्रस्थापितांच्या गळाला लागले. पण बाबा मात्र दत्ता काळेबेरे, रावसाहेब पवार, कमलताई पायगुडे,गणपतराव मानकर, लक्ष्मणराव सुद्रिक, नथुबा पवार कृष्णराव लंके, काका पायगुडे, बापू विरुळे या जिवाभावाच्या सहकाऱ्यांसह शीलाताईंच्या व कष्टक-यांच्या पाठिंब्याने न थकता चालत राहिले. आज नितीन पवार, शारदा वाडेकर, महेश बनकर, सुभाष लोमटे, दिलीप मेंगडे हे कार्यकर्ते नेते आजही बाबांच्या मार्गदर्शनाने कार्यरत आहेत. 
     
बाबा एकदा कॉ. शरद पाटलांबद्दल बोलताना मला व प्रतिमाला (परदेशी) म्हणाले की शरद पाटील खरंच मोठा माणूस आहे. मानवेंद्रनाथ रॉय सारख्या प्रतिभावान मार्क्सवाद्याला जो जातीव्यवस्थेचा प्रश्न समजला नाही, तो शरद पाटलांना समजला म्हणून ते मोठे आहेत. याच धर्तीवर बाबा आढावांबद्दल म्हणता येईल. ‘लोहियांनंतरचा पण फुलेवादाच्या स्वीकारामुळे लोहियांच्याही पुढे गेलेला,जातीव्यवस्था व स्त्रीदास्याचा प्रश्न समजून येऊन त्याविरुद्ध जीवनभर असीम त्याग, धैर्य व निष्ठेने लढलेला देशातील सर्वात मोठा लोकशाही समाजवादी माणूस म्हणजे डॉ. बाबा आढाव.’  १९९२ मध्ये नाशिक येथे झालेल्या सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या  तिसऱ्या राज्य अधिवेशनाचे बाबा उद्घाटक होते आणि कॉ. शरद पाटील व प्रख्यात लेखक व विद्रोही दलित साहित्य चळवळीचे प्रणेते बाबुराव बागुल, प्रमुख पाहुणे म्हणून तर प्रख्यात कवी अरुण काळे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यावेळी बाबांचे स्वागत करताना मी म्हटले की ” जेव्हा केव्हा जातीव्यवस्था विरोधी चळवळीचा सम्यक इतिहास लिहिला जाईल त्यावेळी डॉ.  बाबा आढाव हे नाव सुवर्णाक्षराने लिहिले जाईल” सत्यशोधक सत्याग्रही समाजवादी डॉ. बाबा आढावांना  ९५ व्या वाढदिवशी क्रांतीकारी सलाम । सत्य की जय हो
 
किशोर ढमाले
 
 
0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *