मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा असा दावा केला आहे की, त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील “युद्ध थांबवले” तसेच “पाच विमाने पाडली गेली” असेही सांगितले आहे. ट्रम्प यांच्या या दाव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत दाव्यांना थेट आव्हान निर्माण झाले आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना देशात शांतता राखण्याची जबाबदारी सरकारवर आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांनी देशाला स्पष्टपणे सांगावे की ट्रम्प हे असे दावे का करत आहेत? त्यांनी कोणाचे, कोणत्या पाच विमानांबद्दल उल्लेख केला आहे, याचा खुलासा करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
“ही वेळ काही लपवाछपवी करण्याची नाही. ट्रम्प यांच्या या दाव्यांवर मोदींचे मौन हे भारताच्या जागतिक प्रतिष्ठेला धक्का पोहचवत आहे, तसेच सशस्त्र दलांचे आणि जनतेचे मनोधैर्य खचवत आहे,” असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.