- 9
- 1 minute read
तीच खरी बाबासाहेबांना आदरांजली !
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 32
तीच खरी बाबासाहेबांना आदरांजली !
आज सहा डिसेंबर ! भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याच दिवशी आपल्याला सोडून गेले. या दिवसाला महापरिनिर्वाण दिन असे म्हटले जाते.जी व्यक्ती सामान्य माणूस म्हणून जन्माला आली आणि आपल्या अलौकिक आणि असामान्य कार्याने महामानव म्हणून जगप्रसिद्ध झाली; त्या बाबासाहेबांचे या देशावर अनंत उपकार आहे.बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये विविध विषयांवर कार्य केलेले आहे.त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा सामान्य लोकांच्या कल्याणासाठी खर्ची पडलेला आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनात केलेल्या अनेक कार्यांपैकी भारतीय संविधानाची निर्मिती हे अनमोल असे कार्य आहे.भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदले गेलेले हे कार्य आणि इतिहास आहे.मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांवर संविधान निर्मितीची जबाबदारी सोपविल्यानंतर त्यांच्यासोबत आणखी सहा व्यक्ती सदस्य म्हणून या समितीमध्ये होते.परंतु प्रत्येक जण आपल्या वेगवेगळ्या वैयक्तिक कारणामुळे संविधान निर्मितीमध्ये आपला वेळ,बुद्धी,कौशल्य देऊ शकले नाही. परिणामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपला पूर्णवेळ संविधानाकरीता द्यावा लागला. त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेमधून या देशाच्या संविधानाची निर्मिती झाली आणि त्याच संविधानातून भारतामध्ये लोकशाहीची मूल्ये प्रस्थापित झाली.
त्यामुळे या लेखात आपण फक्त संविधान या एकाच विषयावर चर्चा करू या ! संविधानाच्या कायदेविषयक बाबींमध्ये न जाता फक्त देशातील सध्याची संविधानाची परिस्थिती,संविधानाविषयी जागृती, संविधानाविषयी प्रेम,संविधानाविषयी विरोध,संविधानाची गरज या विषयावर आपण लक्ष देण्याची गरज आहे.संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला अनेक हक्क आणि अधिकार दिलेले आहेत.स्वातंत्र्यापूर्वी आपल्याला संवैधानिक कायद्याऐवजी धर्माच्या कायद्यानुसार चालावे लागत होते.परंतु संविधानाच्या निर्मितीनंतर सर्वांसाठी समान कायदे आले.आठ हजार कोटींच्या २८ मजली घरात राहणारा अंबानी असो की गाव खेड्यात झोपडीत राहणारा आमचा शेतकरी,शेतमजूर असो,सर्वांना पाच वर्षातून एकदा तरी मतदानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी एका समान पातळीवर आणले.संविधानाने दिलेला हा सर्वात अनमोल अधिकार आहे.यामुळे आपण आपल्या आवडीच्या व्यक्तीला निवडून देऊन सरकार सुद्धा बनवू शकतो. त्यामुळे मताचे आणि मतदानाचे महत्त्व प्रत्येकाने गांभीर्याने घेतले पाहिजे.
तसेच संविधानातून अनेक गोष्टी देशाला मिळालेल्या आहेत. संविधानामुळे बऱ्याच प्रमाणात धर्माच्या नियमांच्या जाचातून माणूस मुक्त झालेला आहे आणि संविधानाच्या कायद्यानुसार त्याला मुक्त,स्वतंत्र वागणूक मिळत आहे. त्यामुळे संविधानाविषयी जागृती, संविधानाची गरज,संविधानाविषयी प्रेम जनमानसात निर्माण करण्याची गरज आहे.कारण सध्या संविधानाविषयी देशात विरोधाभासी वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.काही लोक जाहीरपणे संविधान बदलण्याची भाषा करीत आहे तर काही ठिकाणी खुलेआम संविधानाचा अपमान सुरू आहे. अशावेळी भारतीय संविधान हे आम्हा प्रत्येक भारतीयांकरिता किती अमूल्य आहे याचे महत्त्व लोकांना समजून सांगण्यासाठी जनतेचे प्रबोधन करणे ही सध्याची देशासमोरची मोठी जबाबदारी आहे.
डॉ.आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणलेला आहे.त्यामुळे संविधानाचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे.संविधान हा देशाचा सर्वोच्च असा पवित्र ग्रंथ आहे. हा ग्रंथ कोणत्याही एका धर्माला झुकते माप देत नाही.सर्व धर्माच्या लोकांसाठी या संविधानामध्ये समान कायदे आहेत.त्यामुळे भारतात पाकिस्तान सारखी धर्माच्या आधारावर सरकारे स्थापन न होता ती लोकशाहीच्या आधारावर स्थापन होतात.हीच खरी बाबासाहेबांच्या संविधानाची ताकद आहे.परंतु ही ताकद खिळखिळी करून त्या ठिकाणी धर्माचे प्राबल्य असलेली सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे काही लोकांनी आखलेले आहेत.त्यासाठी संविधानावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाने जागृत राहून संविधानाच्या बाबतीत चुकीची विधाने करणाऱ्या लोकांपासून सावध असले पाहिजे. कोणत्याही धर्मांध वृत्तीच्या जाळ्यात न अडकता संविधानच या देशाला एकसंघ ठेवू शकते ही गोष्ट लक्षात घेऊन प्रत्येकाने संविधानाचा जागर केला पाहिजे.व्यक्तीपूजक न बनता विचारपूजक झाले पाहिजे.तीच खरी महापरिनिर्वाण दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरेल.
प्रेमकुमार बोके
0Shares