- 51
- 1 minute read
तो येणार आहे. तो येतोय. अशा बातम्या ऐकत होतो.
दशकांनुदशके आपल्याला माहित असणारे संघटित क्षेत्रातील जॉब्स आता आक्रसत जाणार आहेत.
पण तो आधीच घरात घुसला देखील आहे. आपल्या अर्थव्यवस्थेच्या घरात. पाहुणा म्हणून नाही. कायमचा राहायला आलाय. नवखा असला, वयाने लहान असला तरी जुन्यांना व्हरांड्यात किंवा चक्क घराबाहेर काढू शकतो.
“तो” म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इत्यादी.
_____
दशकांनुदशके आपल्याला माहित असणारे संघटित क्षेत्रातील जॉब्स आता आक्रसत जाणार आहेत.
डिजिटायझेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे नवीन रोजगार तयार होण्याचा वेग मंदावेलच पण अस्तित्वात असलेले संघटित क्षेत्रातील रोजगार देखील कमी होतील. अनेक संघटित क्षेत्रातील उद्योगा त हाच ट्रेंड सुरू आहे. सगळी आकडेवारी एकत्रितपणे समोर ठेवली तर समग्र चित्र आणि त्याचे गांभीर्य कळेल.
संघटित क्षेत्रामुळे अर्थव्यवस्थेत पगारदार वर्ग तयार होतो. क्रयशक्ती असणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढते. प्रत्येक संघटित क्षेत्रातील एका रोजगारामुळे किमान ३ किंवा ४ असंघटित क्षेत्रात काहीबाही उत्पनांची साधने तयार होतात. त्यामुळे संघटित आणि असंघटित एकत्रच बघावयास हवे.
सर्वात महत्वाचे देशातील कुटुंबांची क्रयशक्ती वाढली की देशांतर्गत बाजारपेठ विकसित होते. त्यातून पुन्हा रोजगार वाढतात. एक व्हर्च्युअस सायकल किक होते. जागतिकिरण आक्रसत असताना हे खूप खूप महत्वाचे असणार आहे.
_____
गेली अनेक वर्षे धोरणकर्त्यांनी देशातील मूलभूत संशोधनाकाडे पुरेसे लक्ष दिलेले नाही. सार्वजनिक विरुद्व खाजगीच्या बायनरीत अडकून. चीन मध्ये हे सारे संशोधन , अगदी एआय सकट , प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे शासन पुरस्कृत असते. संशोधन ही ऍक्टिव्हिटी आत्यंतिक जोखीम युक्त असते. शासनाएवढी जोखीम क्षमता सगळ्या खाजगी क्षेत्राला एकत्र केले तरी त्याच्या काही पट जास्त भरेल.
शासनाने शिक्षण आणि कौशल्य विकास यांच्या आकडेवारीची भेंडोळी प्रस्तुत करण्यात समाधान मानले. गुणवत्तेकडे लक्ष दिले नाही. या सगळ्याची किंमत देश समाज अर्थव्यवस्था आणि कोट्यावधी तरुण मोजत आहेत, मोजणार आहेत
_______
भांडवलशाहीचा विकास आणि तंत्रज्ञान विकास हे हातात हात घालून झाले असले तरी त्या दोन भिन्न गोष्टी आहेत.
भांडवलशाही नफेखोर आहेच. भांडवलशहीच्या नफेखोरीचे आपण विरोधक आहोत म्हणून तंत्रज्ञानाला विरोध करणे अनैतिहासिक असेल, सुसायडल सिद्ध होईल. .
जे घडत आहे, घडणार आहे ते जुन्या डाव्या उजव्या , सार्वजनिक खाजगी, नफा तोटा यांच्या “बायनरी ऍनालिसिस”च्या चिमटीत येणारे नाही.
एका बाजूला थेरॉटिकल मांडणीची गरज आहे तर दुसऱ्या बाजूला भारतासारख्या जिथे कोट्यावधी हाताना काम हवे आहे तेथे तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्याय नाही तर पूरक कसा होईल हे बघण्याची गरज आहे.
रोजगार निर्मितीची क्षमता असणारी आर्थिक क्षेत्रे आयडेंटिफाय करावी लागतील उदा. शेती, रेडी टू इट उद्योग, रिटेल, आरोग्य सेवा, लहान मुलांचे संगोपन, पर्यटन, पर्यावरण संवर्धन खूप मोठी यादी काढता येईल. तरुण उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे लागेल. त्यांना इक्विटी / कर्ज भांडवल फक्त सार्वजनिक मालकीच्या बँका पुरवू शकतील करू शकतील.
सर्वात महत्वाचे देशातील प्रत्येक आर्थिक क्षेत्रात कॉर्पोरेटचा माजलेला बेधुंद बैल जाणार नाही हे पहावे लागेल. तो न जाण्यासाठी त्याच्या नाकात वेसण घालण्याची गरज आहे. अर्धा प्रश्न सुटेल.
अर्धी लोकसंख्या ३५ वर्षाखालील, ज्यांच्या भौतिक आकांक्षा आकाशाला गवसणी घालत आहेत त्यांना उत्पन्नाची साधने मिळतील हे पाहणे हे ए आय मधून वाढणाऱ्या कार्यक्षमतेक्षा अधिक महत्वाचे आहे. नाही तर वाढलेल्या कार्यक्षमतेचे फायदे सामाजिक, राजकीय किमतीच्या महापुरात बुडून जातील.
संजीव चांदोरकर (२० ऑगस्ट २०२५) जुन्या पोस्टवर आधारित