- 248
- 1 minute read
दलाल पुढाऱ्यांमुळे मातंग व चर्मकार समाज पुन्हा ब्राह्मणी व्यवस्थेच्या गुलामीत….!
मातंग व चर्मकारांच्या वज्रमुठीत हिंदुत्व, पण मंदिरात प्रवेश करताच ढुंगणावर लाथा खातो ...!
हिंदूंच्या कुठल्याही मंदिरात प्रवेश नसणाऱ्या व मनुस्मृतीने अतिशूद्र ठरविलेल्या मातंग व चांभारांच्या वज्रमुठीत चक्क हिंदुत्व असल्याचा प्रचार सध्या याच समाजातील दलाल पुढारी करीत आहेत. मनुस्मृतीच्या कायद्यानुसार चालणारी ब्राह्मणी धर्म व्यवस्था ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चार वर्णावर चालते. या चार ही वर्णात मातंग अथवा चांभार या जातींचा समावेश नाही. तर या चार ही वर्णाचे दास, सेवक, नोकर, गुलाम म्हणून या जातींचा वर्ण व्यवस्थेत समावेश आहे. याचा भलताच अभिमान आज मातंग व चांभार समाजाला वाटू लागला असल्याने आपल्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे, असे ते म्हणू लागले आहेत. आजच्या आधुनिक युगात ही गुलामीच्या बेड्या स्वतःच स्वतःच्या पायात अडकवून घेणाऱ्या या समाजाची कीव करावी वाटते.
चांभार, चर्मकार समाज संत रोहिदास महाराजांना पूजनीय मानतो, त्या संत रोहिदासांची हत्या भर दरबारात व दिवसाढवळ्या ब्राह्मणांनी केलेली आहे. संत रोहिदास यांचा बळीच ब्राह्मणी धर्म व्यवस्थेने घेतला आहे. तो ब्राह्मणी म्हणजे हिंदू धर्म आज चांभार समाजाच्या चक्क वज्रमुठीत आहे, असे बोलताना जीभ जरा ही कचरत नाही याचे नवल वाटते. संत रोहिदास ब्राह्मणी धर्म व्यवस्थेवर आसूड ओढताना आपल्या अभंगात म्हणतात……
जीवन चारि दिवस का मेला रे !
बांभन झूठा, वेद भी झूठा , झूठा ब्रह्म अकेला रे !!
मंदिर भितर मुरति बैठी , पुजति बाहर चेला रे !
लड्डू भोग चढावती जनता, मुरति के ढीग केला रे !!
पत्थर मुरति कुछ ना खाती, बांभन चेला रे !
जनता लुटति बांभन सारे, प्रभु जी देति न अधेला रे !!
पुन्य, पाप या पुनर्जन्म का, बांभन दोन्ही खेला रे !
स्वर्ग, नरक बैकुंठ पथारो, गुरु शिष्य या चेला रे !!
जितना दान देवे गे जैसा, वैसा निकरे तेला रे !
बांभन जाती सभी बहकावे, जन्ह तंह मचे बबेला रे !!
छोडि के बांभन या संग मेरे, कह विद्रोही अकेला रे…..!
ब्राह्मणी धर्म म्हणजे हिंदू धर्म व्यवस्थेचे वाभाडे काढणारा हा अभंग लिहिल्यानंतर ब्राह्मणी धर्माचे तत्कालीन ठेकेदार संत रोहिदासांवर प्रचंड चिडले व त्यांनी चितोडगढ येथे राज दरबारात त्यांच्या छातीवर वार करून हत्या केली. संत तुकाराम महाराजांची ही या ब्राह्मणी धर्माच्या ठेकेदारांनी अशीच हत्या केली व त्यास सदैव वैकुठवास असे गोंडस नाव दिले. संत रोहिदास यांची ही हत्येनंतर अशीच कहानी रचली गेली आहे. संत रोहिदास यांनी स्वतःच स्वतःच्या छातीवर वार करून छातीत जानवे असल्याचे दाखवून दिले, अशी कहानी तयार करून ती प्रचलित केली आहे.
हे उघड सत्य स्वीकारायला चांभार ( चर्मकार) समाज आज ही तयार नाही. ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या धार्मिक गुलामगिरीचे सगळे साखळदंड तो आपल्या गळ्यात, पायात घालून माणसाला माणूस न मानणाऱ्या व्यवस्थेत खितपत पडायला स्वखुशीने तयार आहे.
संत रोहिदास हे तथागत बुद्धाला आपले गुरू मानत व ब्राह्मणी व्यवस्थेवर आपल्या अभंगातून प्रहार करीत. एका अभंगात ते म्हणतात….
जात जात मे जात है, जो केलन मे पात !
रविदास न मानुष्य जुड सकें, जो लो जात न जात !!
जोपर्यंत जाती पातींचा भेदभाव नष्ट होत नाही, तोपर्यंत मानव समाज एक होऊ शकत नाही. पण रोहिदासांना पूजनीय मानणारे त्यांचे विचार मात्र आत्मसात करायला तयार नाहीत, ही या आदर्श महापुरुषांची शोकांतिका आहे.
मातंगाच्या ही वज्रमुठीत हिंदुत्व असल्याने मंदिरात प्रवेश केला की तो ढुंगणावर लाथा खातो. पण भाजप व संघाच्या वळचणीला पडलेले मातंग पुढारी अतिशय अभिमानाने हिंदुत्वाचा जयजयकार करतात. हे करीत असताना ते लहुजी साळवे व अण्णाभाऊ साठे यांचे नाव घेतात. पण हे त्यांचे निर्लज्जपणाचे लक्षण आहे. लहुजी साळवे व अण्णाभाऊ साठे यांना समजून घ्यायला मातंग समाजाच्या शंभर पिढ्यांना ही शक्य नाही. हिंदू धर्म व्यवस्थेवर आसूड ओढणाऱ्या महात्मा फुले यांना वस्ताद लहुजी साळवे साथ देतात. ” जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव” असे अण्णाभाऊ म्हणतात. अन या दोन्ही महापुरुषांना आपला आदर्श मानणारा मातंग समाज ब्राह्मणी धर्माची चाकरी करायला स्वखुशीने तयार आहे.
संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षण व्यवस्थेचा, न्याय, हक्क, अधिकारांचा फायदा घ्यायचा व चाकरी मात्र मनुवाद्यांची करायची असे धोरण सध्या मातंग समाजाचे आहे. अनुसूचित जाती समूहांना मिळणाऱ्या आरक्षणाच्या प्रवर्गात ही मातंग व चर्मकार समाजाचा समावेश आहे. मात्र या ही वर्गात आरक्षण मिळविण्यासाठी असलेली स्पर्धात्मक भूमिका न स्वीकारता आरक्षण तुकड्या तुकड्यात विभागून द्या, अशी आरक्षण विरोधक असलेल्या संघ व भाजपची भूमिका हे दोन्ही समाज घेताना दिसत आहेत.
हिंदुत्व, हिंदू धर्म व्यवस्था असे काही अस्थित्वातच नाही. ज्याला हिंदू धर्म व्यवस्था म्हटले जात आहे, ती ब्राह्मणी व्यवस्था आहे. अन् ब्राह्मणी व्यवस्थेत मातंग व चर्मकार समाजाचा कुठेच काही संबंध नाही. चारी वर्ग व्यवस्थेचे गुलाम म्हणून या दोन्ही जातींचा अतिशूद्र या सदरात उल्लेख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून या गुलामगिरीतून बाहेर काढले आहे, असे असताना ही गुलामी मातंग व चर्मकार समाजाला परमप्रिय का वाटत आहे ?
स्वाभिमानाचे जगणे आणि जीवन दारात उभे असताना मातंग आणि चर्मकार हे दोन्ही समाज मनुवाद्यांची चाकरी व गुलामी करण्यातच धन्यता का मानत आहेत ? याचे साधे सोपे उत्तर आहे व ते म्हणजे या समाजात काही दलाल प्रवृत्तीचे पुढारी प्रस्थापित धर्म व्यवस्थेने उभे केले आहेत. तेच आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी धर्म व्यवस्थेची गुलामी स्वीकारताना दिसत आहेत.
…………………….
राहुल गायकवाड,
प्रवक्ता, महासचिव समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश