प्रचंड भांडवल घालून मेनस्ट्रीमध्ये चित्रपट प्रदर्शित करताना आपल्याला घातलेले पैसे परत मिळून नफा झाला पाहिजे हा ऍप्रोच “दशावतार”च्या निर्मात्यांनी ठेवला असला तर त्यात काही गैर नाही. त्यामुळे चित्रपटातील काही खटकलेल्या भागाकडे मी दुर्लक्ष करू इच्छितो.
दशावताराच्या टीमने जे यशस्वीपणे पोचवले आहे, त्यांनी जो राजकीय मेसेज दिला आहे ते अधिक महत्वाचे आहे. हल्ली सेफ खेळण्याच्या जमान्यात, फारसे कोणी राजकीय भूमिका घेत नसताना , या तरुणांनी जो प्रयत्न केला आहे तो खूप आश्वासक आहे. लगे रहो तरुण लोग!
_____
पर्यावरण आणि आर्थिक विकास यामध्ये जणू काही न मिटवता येणारे द्वंद्व आहे, पर्यावरणाला प्राधान्य दिले पाहिजे अशी मांडणी करणारे अर्बन नक्षल देशाला अविकसित ठेवू पाहतात अशी बुद्धिभेदी मांडणी अनेक वर्ष केली गेली आहे.
अशा काळात “औद्योगिक प्रकल्प” की “पर्यावरणाचा कायमचा नाश” असे द्वंद्व जेथे असेल तेथे आम्ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी उभे राहू हे हा चित्रपट निसंदिग्धपणे सांगू इच्छितो.
पर्यावरणाच्या जोडीला चित्रपटाने अजून एक आयाम पुढे आणला आहे. महाकाय औद्योगिक प्रकल्पामुळे स्थानिक रीती रिवाज, परंपरा, सामुदायिक सांस्कृतिक अस्मिता उद्ध्वस्त होण्याचा. औद्योगिक भांडवल याबद्दल उत्सवेदनाशीलच नाही तर तुच्छताभाव बाळगते.
_______
हे सांगायला चित्रपटात सर्वसामान्य जनता सहभागी होते हे खूप महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी जनतेच्या सहभागाशिवाय दुसरा मार्गच नाही. पर्यावरणाच्या प्रश्नावर कितीही सेमिनार्स घेतली तरी सिस्टीमवर ओरखडा देखील उठत नाही हे आता स्पष्ट झाले आहे.
औद्योगिक प्रकल्पाच्या मालकाबरोबर प्रस्थापित व्यवस्थेतील सारे सामील होतात. विकले जातात. वन अधिकारी, सरकारी भूवैज्ञानिक अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील सर्वच. प्रचलित सिस्टीम आहे तशी दाखवणे महत्त्वाचे.
_______
कोकणातील तरुणांना उच्च शिक्षण घेऊन देखील रोजगार मिळत नाहीत. चित्रपटातील माधव मुंबईला जायला नकार देतो खरा पण त्याच वेळी त्याला मनाविरुद्ध मिळेल ती नोकरी करावी लागते. आपण जॉईन झालेल्या कंपनीत काहीतरी अनैतिक सुरू आहे याचा वास आल्यावर त्याला विरोध करतो. जीव गमावून बसतो.
नोकऱ्या मिळणे हा एक भाग. पण कॉर्पोरेटमधील अमानवी / अनैतिक धोरणांमध्ये नोकरी गमावण्याच्या भीतीने सहभागी व्हायला लागणे हा डीलेमा वैश्विक आहे.
__________
सुबोध खानोलकर आणि टीमचे अभिनंदन आणि धन्यवाद देखील
त्याचवेळी कोकणच्या पर्यावरण रक्षणासाठी गेली अनेक वर्षे आमचे तरुण मित्र सत्यजित चव्हाण आणि अनेक जण रक्त आटवत आहेत. दशावतार सारख्या थीम उगवण्यासाठी , त्यांनी गेली अनेक वर्षे पेरलेल्या बिया देखील कारणीभूत होत असतात. याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो
माझे स्वतःचे गाव कोकणातील आहे. लहानपणाच्या अनेक आठवणी हार्ड डिस्क मध्ये कायमच्या स्थिरावल्या आहेत. चित्रपटातील कॅमेऱ्याने अनेकवेळा खूप नॉस्टॅल्जिक देखील केले. त्यासाठी टीमला वेगळे धन्यवाद.
संजीव चांदोरकर (२२ सप्टेंबर २०२५)
दुसरा भाग नंतर