• 5
  • 1 minute read

दादा सर्वांसाठी ….

दादा सर्वांसाठी ….

दादा सर्वांसाठी ….

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. राज्यातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ते संपूर्ण देशाला परिचित होते. पहाटे सहा वाजल्यापासून कामाला सुरुवात करून जास्तीत जास्त कामे कसे करता येतील यावर त्यांचा भर होता तसेच त्यांचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा विक्रम म्हणजे ते जास्तीत जास्त नागरिकांना भेटत व त्यांच्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करत.  मी अनेकदा पाहिलेला आहे की ती सकाळी साडेसहा ते साडेआठ या दोन तासाच्या कालावधीमध्ये 200 ते 300 नागरिकांना भेटून त्यांच्या तक्रारी चे निवारण करत होते.
 
फुले शाहू आंबेडकर विचारांच्या मुशीत तयार झालेला हा नेता सत्तेच्या कायम केंद्रस्थानी राहिलेला आहे. सत्तेतून जास्तीत जास्त काम करता येतात त्यामुळे सत्ता कायम सोबत असावी हा त्यांचा विचार राहिलेला आहे. विरोधी पक्षात असताना कामाला येणाऱ्या मर्यादा त्यांनी ओळखल्या होत्या त्यामुळे एन केन प्रकारे आपण सत्तेत राहिलो पाहीजे हा त्यांचा विचार. सत्ता सर्वसामान्य लोकांसाठी वापरता यावी हा त्यांचा सातत्याने कटाक्ष राहिलेला आहे. 
 
मी स्वतः अजित पवार यांना तब्बल 23 वर्षांपासून पाहत आलेलो आहे. सामाजिक व राजकीय आंदोलनातून शासनाला द्यावयाची निवेदन 23 वर्षापासून मी सर्वाधिक वेळा अजित पवार यांना दिलेली आहेत. अगदी सुरुवातीचे निवेदन हे अजित पवार यांची पालकमंत्रीपदावरुन हाकालपट्टी व्हावी म्हणून ते अजित पवार यांनाच दिले गेले होते, त्यावेळेला त्यांनी माझे निवेदन स्वीकारले वाचले व माझी हकालपट्टी करण्यासाठी तुम्हाला हे निवेदन शरद पवार साहेबांना किंवा आर आर पाटलांना द्यावा् लागेल. मीच माझी हकालपट्टी करू शकत नाही आणि राजीनामा तर मी देणारच नाही असे त्यांनी म्हटले होते. आणि हे म्हणत असताना त्यांनी माझे निवेदन शांतपणे वाचले आणि इतकेच म्हंटले की माझी हाकालपट्टी होईल तेव्हा होईल परंतु ज्या कारणावरून तुम्ही माझ्या हकालपट्टीचू मागणी करत आहेत तो प्रश्न आपण मार्गी लावू , असे म्हणत त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी यांना फोन लावत जिल्ह्यातील ॲट्रॉसिटीच्या घटनांचा आढावा लावत योग्य त्या कारवाईच्या सूचना दिल्या तसेच अनुसूचित जातींच्या योजनांची अंमलबजावणी विषयी देखील श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून जिथे कमी असेल ते पूर्ण करा असे त्यांनी सांगितले . हा फोन झाल्यानंतर मिश्किल स्वरात त्यांनी म्हटले की आता माझी हाकालपट्टी झाली तर हे कोण करणार ? असा हा अत्यंत दिलदार स्वरूपाचा व कार्यक्षम माणूस.
 
गेल्या 23 वर्षात अजित पवारांना महत्त्वपूर्ण विषयावर निवेदन सादर केल्यामुळे अनेक आठवणी सोबत आहेत. अजित पवार यांना कायम निवेदन देणारा कार्यकर्ता म्हणून माझा प्रवास राहिलेला आहे. हा माणूस आपलं म्हणणं ऐकून घेतो, भेट टाळत नाही शक्य होईल तेवढं तात्काळ निपटण्याचा प्रयत्न करतो हे बाब निश्चितच भावण्यासारखी होती , कारण अजित पवार यांना भेटण्यासाठी कोणत्याही वशिल्याची व लॉबीची गरज पडत नाही. तुम्ही सकाळी लवकर उठलात तर अजित पवारांना नक्की भेटता, त्यामुळे अजित पवारांचे कार्य जवळून पाहता आले. 
 
मधल्या काळात मी अल्पसंख्यांक समुदायासाठी कार्यरत असल्यामुळे या समुदायाच्या विशेषतः मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर सतत निवेदन व चर्चा त्यांच्याशी कराव्या लागत होत्या. पहाटे साडेपाच वाजता पुणे येथून निघून ठीक साडेसात वाजता अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी या बंगल्यावर पोहोचून त्यांना तात्काळ निवेदन सादर करून तो प्रश्न मार्गी लावून सकाळी दहा वाजण्याच्या आत पुणे शहरांमध्ये दुसऱ्या कामांसाठी हजर राहण्याचा आवाका हा याच नेत्यामुळे मला लाभला. 
 
विरोधी पक्षात असला तरी हा माणूस आपली भेट घेतो , ती तो टाळत नाही तसेच आपल्या प्रश्नांवर तो सकारात्मक काम करत राहतो या गोष्टीला बांधील राहून पुणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये अजित पवार यांना मी पाठिंबा दिला होता. हा पाठिंबा देत असताना देखील अजित पवार माझे पत्र वाचून हसत राहिले व म्हणाले की आज पर्यंत माझ्या विरुद्ध निवेदनच देत आला ना ? आज पहिल्यांदा मला पाठिंबा देतोय पण हरकत नाही आपले नगरसेवक निवडून येऊ किंवा न येवु आपले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवू. तुम्ही पाठिंबा दिला मला आनंद वाटला असे त्यांनी सांगितले. मी शिफारस केल्यापैकी अनेकांना महानगरपालिकेच्या निवडणुकांची तिकिटे त्यांनी दिली हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होते. 
 
अजित पवार यांच्या जाण्याने केवळ पवार कुटुंबीयांचीच कधीही न भरून येणारी हानी झाली असे नव्हे तर महाराष्ट्राची फार मोठी हानी झालेली आहे. अजित पवार हे कायम महाराष्ट्राचा विचार करणारे नेते राहिलेले आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप झाले पण त्या आरोपाला भिक न घालता काम करत राहणं , कामातून आरोपाला उत्तर देणे ही अजित पवारांची खासियत राहिलेली आहे. 
अजित पवारांना अनेक लोक जातीवादी असे संबोधतात परंतु मी ठामपणे सांगतो ते जातीवादी नाहीत. त्यांच्या निष्ठावंत गटासाठी जास्त आग्रही राहतात आणि म्हणूनच ते भीमा कोरेगाव प्रकरणी ज्या वेळेला राज्यांमध्ये जातीयतेचे कलुषित असे वातावरण तयार झाले होते आणि ही बाब मी त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर 2019 ला अजित पवार हे विजयस्तंभाला अभिवादन करत आपण कोणासोबत आहोत हे सांगितले. हे सर्व  सांगण्याचा मुद्दा हाच की अजितदादांना धर्म , भाषा , प्रांत याचा कोणताही विचार न करता माणसाचा विकास – माणसाचे प्रश्न सोडवणे याला महत्त्व देणारा हा नेता , यासाठी पक्ष संघटना याचा विचार न करता सत्ता याचा उपयोग करून सत्तेतून जनहिताची कामे हा अजित पवारांचा फॉर्मुला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. 
 
दोनच दिवसापूर्वी अजितदादांची भेट झाली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसंदर्भामध्ये प्राथमिक चर्चाही झाली होती , महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या चुका त्यांनी लक्षात घेतल्या होत्या आणि जिल्हा परिषदेच्या होऊ द्यायच्या नाहीत असे ठरवून ते काम लागले होते. आज सायंकाळी सात वाजता बारामती येथे मी त्यांना भेटणार होतो निधनाची बातमी आली आहे. 
 
अजित दादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली
 
राहुल डंबाळे
0Shares

Related post

तंत्रज्ञान पुढे, पण आत्मा मागे: बॉर्डर २ विरुद्ध बॉर्डर १

तंत्रज्ञान पुढे, पण आत्मा मागे: बॉर्डर २ विरुद्ध बॉर्डर १

तंत्रज्ञान पुढे, पण आत्मा मागे: बॉर्डर २ विरुद्ध बॉर्डर १ ही जेन झी जेन अल्फा टाळ्या…
महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली

महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली

महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; प्रकाश आंबेडकरांकडून श्रद्धांजली बारामती : राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत…
रुपयाच्या अवमूल्यनाची किंमत !

रुपयाच्या अवमूल्यनाची किंमत !

रुपयाच्या अवमूल्यनाची किंमत ! जेव्हा रुपयाचे अवमूल्यन होते तेव्हा काय होते ? सगळयात पहिला परिणाम म्हणजे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *