- 41
- 1 minute read
दुर्बोधतेवर ‘ग्रेस’चे भाष्य
* जी ए कुलकर्णी यांनी ‘इन्ग्रिड बर्गमन्’च्या सेक्रेटरीला पत्र लिहिले आणि तिच्या नावाचे स्पेलिंग आय ने सुरू होते की ई ने याची शहानिशा करून घेतली. मी आय ऐवजी ई ने सुरुवात केली होती. माझे चुकलेच. दुर्बोधतेचा प्रारंभ इथून होत नाही. तो पुढेच आहे. जीए इथेच थांबले नाहीत. मी इन्ग्रिडवर लिहिलेल्या कवितेत तिच्या डोळ्यांना संपूर्ण ऐहिक असे विशेषण जोडले आहे. जीए म्हणतात, हे बरोबर नाही. We love her for her devine eyes. म्हणजे माझ्या अनुभव विश्वातील प्रतिमा त्यांना अशी दुर्बोध वाटली. पण मला वाटते, माझ्याप्रमाणे जीएंचीही फसगत झाली आहे. मी ऐहिक डोळे म्हणतो म्हणून आणि ते दिव्य डोळे म्हणतात म्हणून !
* कलाकृतीत सत्याचा शोध घ्यावयाचा असतो या विधानाला माझी अंशतः मान्यता आहे. पण सत्याचा शोध ही वाट आहे. तो वाटा नाही. तुम्ही अभिनव गुप्ताला ओळखतच असाल मिस्टर कुलकर्णी. त्याने तर लौकिक आणि अलौकिकाच्या अर्थशून्य संगीताने दुर्बोधता आणखीच रम्य करून टाकली आहे !
* आपल्या मराठी समीक्षेच्या विश्वात्मकतेला तर तोडच नाही. आणि हा विश्वपसारा अस्ताव्यस्त करूनही ही बापडी लक्ष्मीबाई, बालकवी आणि मर्ढेकर यांच्यापुढे एक इंचही सरकायला तयार नाही !
* दुर्बोधता ही मोठी मोहमयी शक्ती आहे. थेट रामायण काळातही परिटाच्या दृष्टीला मर्यादा पुरुषोत्तम केवढा दुर्बोध वाटला ! यादवकाळातील ज्ञानदेवांचे शुद्धिपत्रक प्रकरण म्हणजे तर सामूहिक दुर्बोधतेचा इरसाल नमुना होय.
* दुर्बोधतेला सदोदित सुबोधतेची तहान लागलेली असते म्हणून तिचा सदभाव् मोठा आकर्षक वाटून जातो; नाही ? ग दि माडगूळकरांची भावगीते मला आवडतात. परंतु भाबड्या श्रद्धेचे हत्यार घेऊन तिचा पाठराखेपणा करणारी पु ल देशपांडे यांची ऊरबडवी वृत्ती मात्र मला विलक्षण दुर्बोध वाटते. देशपांडे यांनी माडगूळकरांच्या कवितेतला प्रसन्नपणा असा नासवून टाकला आहे.
* मध्ययुगात या दुर्बोधतेने कितीतरी चमत्कार घडविले आहेत. चांगदेव – मुक्ताईची कुटे, नाथांची भारुडे, संतांच्या विराण्या, शाहिरांच्या लावण्या आपण याच अर्थाने दुर्बोध करून टाकल्या आहेत.
* कुठलीही जीवनवृत्ति, कुठलाही अविष्कार, अध्यात्माच्या चिरंजीव उगमाजवळ आणून सोडणे हीच जीवनाला अर्थ देण्याची आपली प्रक्रिया होती. आपला जीवनवाद आणि आदर्शवाद अशा पराभूतपणाच्या जाणिवेतून जन्माला आलेला आहे. सांस्कृतिक अस्तित्वाचा छेद घेऊन पाहणे ही केवळ अशक्य बाब तर नाही ना ? मला वाटते नसावी. दोन उदाहरणे आठवतात. एक द्वैतवाल्या माहींभटाचे आणि दुसरे सार्त्रचे. माहींभट घरचा म्हणून बाजूला ठेवला तरी सार्त्र ? त्याने चक्क नोबेल पारितोषिक नाकारले आणि तो सुबोध होऊन गेला ! आपण आणीबाणीच्या काळात उत्साहाने पारितोषके स्वीकारली आणि जन्मत:च सुबोधपणाचा दावा करणारे अस्से दुर्बोध होऊन गेलो !
* मिस मंगेशकरांनी निवडक ज्ञानदेव मोठ्या भक्तीभावाने आळवला आहे. पण त्यांनी ज्ञानदेवांना पुन्हा दुर्बोध करून टाकले ! एखादा रोशन, शंकरशंभू, बरकत अली, रविशंकर, नाहीतर आंतरराष्ट्रीय मेनुहीन यांच्यासमोर जरी मिस मंगेशकरांनी ज्ञानदेव सांगून सवरून घेतला असता किंवा थेट आयुष्याच्या संध्याकाळी, स्वरांचा वसंतोत्सव मावळल्यावर पैलतीराहून ओरडणाऱ्या कावळ्याचे ज्ञानदेवीय विश्व त्यांना सापडले असते ! मग सांस्कृतिक ऋण फेडण्याच्या घाईचे काय ?
* गॉर्कीने आपल्या व्यक्तित्वाचा छेद घेतला त्याचवेळी टॉलस्टॉयचे दिव्यत्व त्याला सुबोध झाले. व्यक्तित्वाची पुनर्घटना करण्याची एक शक्ती थोर कलावंतांच्या ठायी असते. गॉर्कीच्याच शब्दात – And who do not believe in God, cast a stealthy, almost timid glance at him and said to myself – ” This man is like God.”
– संकलन : किशोर मांदळे
संदर्भ : त्वचा आणि तंतू, चर्चबेल (१९७४)