Nifty ५० मधील ५० कंपन्यांतील मुख्याधिकाऱ्यांना २०२४-२०२५ मध्ये किती पैसे मिळाले, ज्यात वेतन, भत्ते, बोनस, स्टॉक ऑप्शन सारे काही धरले जाते याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. पहिल्या पाच सी इ ओ चे आकडे खालीलप्रमाणे
राजीव जैन, बजाज फायनान्स १०३ कोटी ;
सी विजयकुमार, एच सी एल टेक्नॉलॉजी ९३ कोटी
सलिल पारेख, इन्फोसिस ८१ कोटी
सुब्रमण्यम, एल अँड टी, ७६ कोटी
राजीव बजाज, बजाज ऑटो ५९ कोटी
अजून एक.
रिलायन्सचे मुकेश अंबानी २०२१ पासून कंपनीकडून कोणताही मोबदला घेत नाहीत!!!!!! ते हे सांगत नाहीत की त्यांचे भांडवल त्यांना एवढा परतावा मिळवून देते की कंपनीकडून मिळू शकणारा वार्षिक मोबदला क्षुल्लक झाला आहे.
____
कंपन्यांमध्ये जे उत्पादन होते त्यामध्ये साफसफाईची कामे करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापासून ते मुख्याधिकाऱ्यापर्यंत सर्वांचे योगदान असते. तत्वतः हे मान्य व्हायला हरकत नाही.
हे देखील मान्य व्हायला हरकत नाही की प्रत्येक स्तरावर जो कामगार कर्मचारी काम करतो त्यांच्या कामाचा एकूण मूल्यवृद्धीमधील/ Value Addition मधील वाटा कमी जास्त असतो. आणि त्या वाट्याच्या प्रमाणात त्या व्यक्तीला वेतन किंवा इतर compensation मिळाले पाहिजे.
माझ्यापेक्षा मुख्याधिकाऱ्याला जास्त पैसे मिळणार हे अगदी सफाई कर्मचारी देखील मनापासून मान्य करतात.
मुद्दा आहे किती प्रमाणात जास्त. त्यावर कॉर्पोरेट आणि त्याचे नवउदारमतवादी तत्त्वज्ञान सोईस्करपणे गप्प बसते. कारण हा त्यांच्या अवळणारा प्रश्न आहे.
खालील आकडेवारी बघा.
कंपनीत काम करणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांना मिळणारा मोबदला उतरत्या भाजणी मध्ये मांडला, तर त्यातील मध्यावर असणाऱ्या संख्येला मध्यक किंवा मेडीयन Median म्हणतात. तर त्या मेडियन मोबदल्याचे त्याच कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्याला मिळालेल्या मोबदल्याचे गुणोत्तर/ मल्टिपल काढतात. पहिल्या तीन सर्वात जास्त मल्टिपल असणारे खालील प्रमाणे
टेक महिंद्रा, मोहित जोशी:८४० पट
इन्फोसिस, सलील पारेख: ७५२ पट
एल अँड टी, सुब्रमण्यन, ७१४ पट
(हो तेच सुब्रमण्यन जे म्हणाले होते की कामगारांनी दिवसाला १४ तास काम केले पाहिजे वगैरे. सुब्रमण्यम बोलले. अनेक सी इ ओ बोलत नाहीत तेवढाच फरक)
सर्व आकडेवारी: बिझीनेस लाइन ऑगस्ट १२, पान क्रमांक १)
मेडियन गुणोत्तर तर खूप जेंटलमन आहे.
त्या कंपनीत काम करणाऱ्या सर्वात तळातील सफाई कर्मचाऱ्याला मिळणारा मोबदला घेतला तर हे गुणोत्तर १०,००० पट होऊ शकते…..मेन्स्ट्रीम मिडिया हे गुणोत्तर काढून सांगणार नाहीत. त्यांना काढू दिले जाणार नाही.
______
कोणत्या मानवी श्रमाला किती मोबदला मिळाला पाहिजे हा निर्णय ना सी इ ओ वर सोपवला पाहिजे ना तथाकथित अर्थतज्ज्ञांवर. तो २०० टक्के राजकीय निर्णय असला पाहिजे.
कंपनीच्या सीइओ चे पॅकेज कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर ठरवते. पाहिजे तेवढे पॅकेज द्या म्हणावं. पण सीइओ आणि न्यूनतम मोबदला यांचे गुणोत्तर अमुक पेक्षा जास्त असेल गुन्हा नोंदवला जाईल. हा राजकीय अजेंडा लावून धरला पाहिजे.
कधी येतील असे विषय सामान्य नागरिकांच्या डोक्यात? की आपल्या श्रमाचे मूल्य कोण ठरवते ? ते तेवढेच का असते ? त्यासाठी काय आधार ? यात आपण निवडून दिलेले सरकार, नेते कोठे असतात ?
संजीव चांदोरकर (१६ ऑगस्ट २०२५)