- 276
- 1 minute read
दोन ठाकरे व दोन पवारांनी एकत्र यावे ही वांझोटी चर्चा ….!
महाराष्ट्राचे हित, अस्मितेसाठी एकत्रीकरणाची काहीच उपयुक्तता नाही...!
दोन ठाकरे व दोन पवार एकत्र येण्याबाबतची चर्चा अलिकडे राज्यभर खूप चवीने केली जात आहे. पण या एकत्र येण्याने महाराष्ट्राचा नेमका काय फायदा होणार आहे ? यांच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कुठली सामाजिक परिवर्तने व आर्थिक क्रांती होणार आहे ? याचे उत्तर अशी चर्चा करणारांकडे ही नाहीत. समजा उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आले तर काय होईल ? तसेच शरद पवार व अजित पवार एकत्र आले तर काय होईल ? यासंदर्भात किती ही गोळाबेरीज करीत राहिलो तरी हाती ढेकळच येतात. शिवसेनेत हे दोन ठाकरे एकत्र होतेच ना, हाती राज्याचे मुख्यमंत्रिपद ही होते. तेव्हा राज्यात असा काय सोन्याचा धूर निघत होता, जो आता निघत नसल्याने राज्याच्या हितासाठी या दोन ठाकरेंनी एकत्र आले पाहिजे ? तसेच शरद पवार व अजित पवारांचे आहे. काल परवापर्यंत दोघे एकत्र होते व मनसोक्तपणे महाराष्ट्राला लुटत ही होते. या एकत्रीकरणामुळे फायदा नाही झाला तर तोटा जरूर होऊ शकतो आजवर झाला तसा.त्यामुळे या दोन ठाकरेंनी व दोन पवारांनी एकत्र येण्याबाबतची चर्चा खरे तर वांझोटी आहे. पण इथल्या गोदी मिडियाला, राजकीय विश्लेषकांना, विचारवंतांना अशीच वांझोटी चर्चा करण्यात अधिक रस नेहमीच राहिलेला आहे, हे वेळोवेळी सिद्ध झाले असून तशी चर्चा आज ही राज्यभर चवीने सुरू आहे.
दोन ठाकरे व दोन पवारांच्या एकत्र येण्याची चर्चा वांझोटीच आहे. पण समजा या एकत्रित येण्यामुळे महाराष्ट्राचे हित होणार आहे, असे राज्यातील जनतेला, काही शासकीय लाभार्थी विचारवंत, बुद्धिमान, कलाकार आदी क्षेत्रातील महान मराठी माणसांना वाटत आहे, तर हे या दोन ठाकरे व दोन पवारांना का वाटत नाही ? मग ते एकत्र का येत नाहीत ? अन् महत्त्वाचे म्हणजे आपल्या एकजुटीत महाराष्ट्राचे हित आहे, हे यांना कळत होते , तर ते एकमेकांपासून दूर का गेले ? या दूर जाण्याच्या कारणांवर या लाभार्थी हितचिंतकांनी राज्यात चर्चा सुरू केली तर राजकीय पटलावरील ही चार ही पात्र उघडी नागडी होतील. महाराष्ट्राचे हित, कल्याण, विकास हा यांच्या व्यक्तिगत फायदापेक्षा मोठा नाही. बाळासाहेब ठाकरे नंतर शिवसेनेची कमान राज ठाकरेंना स्वतःच्या हाती हवी होती, म्हणून ते बाहेर पडले व सेना तोडली. मराठी माणसाच्या न्याय, हक्क व अधिकार, अस्मितेसाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आल्याचा दावा खरा असेल, तर शिवसेना तोडणाऱ्या, फोडणाऱ्या राज ठाकरेना महाराष्ट्र द्रोही व गद्दारच म्हटले पाहिजे ना. या उलट राज ठाकरे हा महाराष्ट्र द्रोही नसेल तर, मराठी माणूस व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवसेनेची स्थापना झाली हा दावा खोटा आहे. पण या अंगाने चर्चा होत नाही. ज्यांना वाटते दोन ठाकरेंनी एकत्र आले पाहिजे, त्यातील एक ही दोन्ही ठाकरेंच्या चुकीच्या भूमिकांवर बोलायला तयार नाही.
फुले, शाहू ,आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात महापुरुषांचा खुलेआम अवमान व अपमान होत आहे. खरे तर राज्यव्यापी चर्चेचा विषय हा असला पाहिजे. महाराष्ट्रात मराठी भाषा बोलली पाहिजे म्हणून परप्रांतीयांना मारझोड करण्यापेक्षा मराठी भाषेची अ ब क ड शिकविणाऱ्या मराठी शाळा वाचल्या पाहिजेत. पण त्या डझनाच्या संख्येने रोज बंद होत आहेत. यावर चर्चा व्हायला हवी. पण ती होत नाही. अन ती करण्यास कुणाकडे वेळ ही नाही. मराठी भाषा व मराठी अस्मितेच्या गोष्टी करणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून ती होत नाही. आपल्या मुलांना फाडफाड इंग्लिश बोलणाऱ्या शाळेत घालून राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस मराठी भाषे विषयी बोलत असतील तर याच्या इतकी दुर्दैवाची बाब दुसरी कुठलीच नाही. यावर महाराष्ट्र व मराठी अस्मिता यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे म्हणणारे बोलत नाहीत. मग यांना एकत्र आणण्याचा अजेंडा ते का राबवितात, हेच कळत नाही. काय साध्य करायचे आहे या दोन बंधूंना एकत्र आणून ते तर राज्यातील जनतेला कळायला हवे.
राज्यातील उद्योग व त्यामुळे निर्माण होणारे रोजगार गुजरातकडे वळविले जात आहेत, पण महाराष्ट्रात यावर चर्चा होत नाही. राज्याचे आर्थिक स्रोत असलेली सरकारी कार्यालये मुंबई, महाराष्ट्रातून गुजरातला हलविली जात आहेत, पण महाराष्ट्रात चर्चा नाही. राज्यातीलकारखानदारी ,उद्योग व्यवसाय सरकारी धोरणापायी बंद होत असून कामगार देशोधडीला लागले आहेत. नवे रोजगार निर्माण होत नाहीत, तशा काही योजना ही नसल्यामुळे बेकारांची फौज तयार होत आहे, यावर साधी चर्चा ही होत नाही.शेतीमालाला हमी भाव नाही, सहकारी क्षेत्र बर्बाद करीत राज्याची लुटमार सुरू आहे. पण राज्यात चर्चा होत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ७६ लाख मतांची भाजपने चोरी करून घटनाबाह्य पुरोगामी महाराष्ट्रात पेशवाई सरकार स्थापन केले, यावर चर्चा होत नाही. पण ठाकरे बंधू व पवार चाचा_ भतिजा एकत्रीकरणाची चर्चा मात्र खूप चवीने केली जात आहे.
… तर दोन्ही पवारांचे बॉस महाराष्ट्र द्रोही फडणवीस
अजित पवार राष्ट्रवादी फोडून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा हिस्सा झाले नसते तर ते जेलमध्ये असते. मग सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याचे बाळकडू तर त्यांना शरद पवारांच्या कडूनच मिळाले आहे. मग राज्याचे उपमुख्यमंत्रिपद खुणावत असताना ते जेलमध्ये का जातील ? अन गेलेत तर परत का येतील ? हे दोन पवार आता तेव्हाच एकत्र येतील जेव्हा शरद पवार भाजपशी जुळवून घेतील. दुसरा कुठलाच मार्ग या एकत्र येण्यासाठी उपलब्ध नाही. बर शरद पवारांनी जुळवून घेतले तरी एकत्रित राष्ट्रवादी ही शरद पवार अथवा सुप्रिया सुळेंची राहणार नाही, तर ती अजित पवारांची राहिल. हे वास्तव मान्य करूनच शरद पवारांना एकत्र येण्याचा निर्णय घ्यावा लागेल. अन् ते शक्य आहे, असे वाटत नाही. आज पायाखालची सर्व राजकीय जमीन सरकून गेली असली, तरी शरद पवारांना सुप्रिया सुळेंची चिंता आहेच. अन् समजा यावर ही काही मार्ग काढून दोन पवार एकत्र आले तरी त्यांचा राजकीय बॉस महाराष्ट्र द्रोही फडणवीसच असणार आहे. हे अजित पवारांनी तर मान्य केलेच आहे. पण शरद पवारांना ही हे कळत आहे. मग दोन पवारांच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राचे हित काय होणार आहे ? दोन ठाकरे व दोन पवारांनी एकत्र आले पाहिजे, यासाठी प्रयत्न करणारे यासंदर्भातील चर्चा का करीत नाहीत ?
गेल्या ५ वर्षांचा अपवाद सोडला तर शरद पवार गेली दशके राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. अन याच काळात महाराष्ट्र द्रोही भाजपची भरभराट झाली. या भरभराटीस महाराष्ट्राच्या अस्मितेचा टेंबा मिरवणारे बाळासाहेब ठाकरे व त्यांची शिवसेना जबाबदार आहे. भाजपसारख्या धर्मांध व महाराष्ट्र द्रोही शक्तींना सेनेने साथ दिली नसती, तर छत्रपती शिवाजी महाराज व फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात पेशवाईचे समर्थन करणारी भाजप उभीच राहिली नसती. पण काळाची पावले ओळखण्याची कुवत ना बाळासाहेब ठाकरे यांच्यात होती ना शरद पवार यांच्यात आहे. त्यामुळेच भाजपचे फावले व त्यांनी महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर हातोडा चालविला आहे. महापुरुषांच्या अवमान व अपमान करण्याचा अजेंडा खुलेआम चालविला आहे. हे करताना त्यांनी पातळी ही सोडली आहे. राजमाता जिजाऊबद्दल अतिशय हिन दर्जाची चर्चा त्यामुळे राज्यात सुरू आहे. पण महाराष्ट्राचे अस्मिता वीर गप्प आहेत. राज्याच्या राजकारणाला एक परंपरा होती. राज्यात एक सांस्कृतिक परंपरा होती. त्यावर ही भाजपने हल्ला चढविला आहे. यावर न बोलता, चर्चा न करता दोन ठाकरे व दोन पवारांनी एकत्र यावे, ही चर्चा त्यासाठीच वांझोटी आहे.
शरद पवार, अजित पवार व ठाकरे बंधूंच्या राजकारणाचे जे कोणी लाभार्थी असतील त्यांना काय चर्चा घडवून आणायची ती आणू द्या. पण महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकारणाला, परंपरेला, राज्यातील उद्योग, व्यवसायाला हानी पोहचविणाऱ्या, मतांची अगदी दिवसा ढवळ्या चोरी करून घटनाबाह्य सरकार स्थापन करणाऱ्या, महापुरुषांचा अवमान व अपमान करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपसारख्या महाराष्ट्र द्रोही व धर्मांध शक्तींच्या विरोधातील अजेंडा घेवून उभे राहणे आजची गरज आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी व अस्मितेसाठी हाच अजेंडा घेवून उभे राहिले पाहिजे. अन यासाठी दोन्ही ठाकरे व दोन्ही पवारांची काहीच उपयुक्तता व गरज नाही.
……………..
राहुल गायकवाड,
महासचिव समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश