• 17
  • 3 minutes read

धगधगत्या क्रांतिची माय सावित्री

धगधगत्या क्रांतिची माय सावित्री

धगधगत्या क्रांतिची माय सावित्री

त्यांचा धर्म जेव्हा सांगत होता;
बालपणी तिने बापाच्या आज्ञेत रहावे.
तारुण्यात भावांच्या नजरेच्या गुलामीत
करावं नखाकडे पाहुन
जीवन व्यतित.
विवाहानंतर कुंकवाच्या धन्याच्या
मालकी हक्काचा
मारुन घ्यावा शिक्का भाळी.
अन् म्हातारपणात……
आपल्याच उदरात
नऊ महिने ओझं वागवलेल्या
मरणाशी झुंजत
जग दाखवलेल्या
लेकरांनी दिलेला
दयेचा कुटका गिळत
मरण येईपर्यंत
जगावं लाचार जीणं
येखाद्या कोनाड्यात.
त्यावेळी लाभला तुला धनी
बाईचे साखळदंड तोडणारा.
तिला ज्ञानपथावर आणून
शहाणं करुन सोडणारा.
त्या क्रांतिबाच्या क्रांतिपथाची
तु केवळ वाटसरुच झाली नाहीस.
तु त्याच्या संगतीनं
क्रांतिच्या-ज्ञानाच्या निखार्‍यावरुन
चालु लागलीस.
अवघ्या आयाबायांना
शहाणंसुरतं करत.
गुलामीच्या
पुरुषी धर्म-अधर्माच्या
साखळदंडातुन
मोकळं ढाकळं करीत.
तुझा क्रांतिचा ज्ञानदीप विझला
म्हणून काय झालं?
त्यानं तुला दाखवुन ठेवला होता
मार्ग मुक्तिचा.
जाती-धर्मांच्या गुलामीतुन
मुक्त व्हायचा.
तु चालत राहिलीस वाट
अखंडाची.
तु पेरीत गेलीस सुरुंग
सार्वजनिक सत्य धर्माचे.
तु जखडबंद बाईला
दाखवलास मार्ग मुक्तीचा
जसा मुक्ता साळवेला
तस्साच फातिमा शेखलाही.
वाणी-बामणीला.
मराठी-मायवतणीला.
साळी-माळणीला.
कुणबी-कुंभारणीला.
तेव्हाही आली होती
अशीच महामारी प्लेगची.
भेजात अंध:काराचा
काळोख भरुन
कुणा अधर्माचे
दिवे शीलगावत अन्
टाळ्या वाजवत
आज जस्सी अज्ञानाची
धर्मवेडी मगरमिठी घातली जाते.
अगदी तस्सीच
त्याही वेळी
प्लेगची महामारी हटवायसाठी
केले जात होते महायज्ञ.
मरणार्‍यांना भूकेनेही
तडफडत मारत
यज्ञांमध्ये दूध-तुपाची-अन्नाची
दिली जात होती आहुती
अधर्माच्या रक्षणासाठी.
जस्सी घातली होती
गोळी गांधीबाबाला.
अगदी तस्सीच
घातली होती गोळी धर्मांधांनी
प्लेगच्या मरणातुन वाचवायसाठी
औषधोपचाराचा
अधर्म माजवणार्‍या
रँड साहेबाला
गांधीबाबाच्याही पन्नास वर्षे अगुदर
माणसं महामारीच्या
नरड्यात ढकलत
धर्म वाचवायसाठी.
त्यावेळी….
तु महामारीच्या नरड्यातलं
मरणाचं तांडव रोखायसाठी
उतरलीस मैदानात.
सैन्यात डाॅक्टरी करणार्‍या
लेकराला घातलीस हाळी
प्लेगने मरणाय्रा
माणसांचं मरण रोखायसाठी.
तुलाही प्लेगनं केलं शिकार
माणसं वाचवायची
तुझी झुंज रोखायसाठी.
पण…..
तु कर्मकांडांचे
साखळदंड तोडणारी
कुमारी बामणीनीचं
बाळंतपण करुन
तिच्या लेकाचीही
माय होणारी,
माय होतीस सिद्धार्थाची.
मरण तुला
आडवु कसं शकेल बरं?
तु भीमाचीही माय
तु माता रमाईची माय.
तु माक्झीम गार्कीची माय
तु हजार चौरासीर माय.
तु जातीयतेच्या आगित होरपळणाऱ्या
दीन-दुबळयांची माय.
तु धर्मयुद्धात झुंड बळी घेतलेल्या
तडफडत मरणार्‍या
प्रत्येक निरपराध
लेकराची माय.
तु समतेसाठी लढणाय्रा
समता सैनिकांची माय.
तु प्रत्येक
क्रांतियोद्ध्याची माय.
सावित्री माय;
तुला तुझ्या स्मृतिदिनी
प्रत्येक लेकराचे
विनम्र अभिवादन!

– जयवंत हिरे.
“क्रांतिकारी जनता”

0Shares

Related post

एका असाह्य महिलेचा खून व तिच्या नवजात बाळांना अनाथ केल्या प्रकरणी मंगेशकर कुटुंबावर गुन्हे दाखल करावेत…!

एका असाह्य महिलेचा खून व तिच्या नवजात बाळांना अनाथ केल्या प्रकरणी मंगेशकर कुटुंबावर गुन्हे दाखल करावेत…!

मुंबई : लता मंगेशकर असो अथवा तिचे बंधू अथवा भगिनी हे सारे कुटुंब असंवेदशील आहे, हे…
१६ व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना…

१६ व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना…

हुजरेगिरी करणाऱ्यांना प्रतिभावंत म्हणता येणार नाही ! – डॉ. प्रकाश मोगले भाषणातील महत्त्वाचे मु‌द्दे : *…
गद्दार को गद्दार कहना कानूनन अपराध नही है…!

गद्दार को गद्दार कहना कानूनन अपराध नही है…!

यह सच है की….गद्दार को गद्दार कहना कानूनन अपराध नही है…..!        ये सच…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *