- 616
- 1 minute read
धम्म ध्वज यात्रेतून कवाडेंना बेइज्जत करून झालेल्या हकालपट्टी नंतर बाकी इतरांनी त्याचा बोध घ्यावा…..!
नागपुरातील घटनेने दाखवून दिले की, नेते गद्दार झालेत आंबेडकरी जनतेमधील स्वाभिमान कायम….!
महाबोधी विहार मुक्तीसाठी निघालेल्या धम्म ध्वज यात्रेचे दीक्षा भूमी नागपुरातील जनतेने उस्फूर्तपणे स्वागत केले. हजारो बौद्ध बांधव व महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाचे समर्थक या धम्म ध्वज यात्रेत सहभागी झाले. या यात्रेच्या स्वागतासाठी नागपुरात भव्य आयोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात्रा विदर्भात असल्याने सारा विदर्भ बौद्धमय झाला असून आंबेडकरी जनतेत एक नवा उत्साह संचारला आहे. यात्रेच्या स्वागतासाठी नागपुरात उभारलेल्या मंचावर जोंगेद्र कवाडे जाताच साऱ्या आंबेडकरी जनतेने त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या व त्यांना या मंचावरून नुसते जावे लागले नाहीतर हाकलून दिले. आंबेडकरी जनता डोक्यावर ही घेते व पायाखाली ही रगडते याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. आज हजारो लोकांच्या उपस्थितीत जोगेंद्र कवाडे यांनी ही घेतला. कवाडे यांच्यासारखे आंबेडकरी विचार व चळवळीशी गद्दारी करणारे इतर अनेकजण आहेत, त्यांनी ही या घटनेपासून बोध घ्यावा.
यात्रेच्या स्वागतासाठी उभारलेल्या मंचावर आमंत्रण नसताना जोगेंद्र कवाडे मंचावर आले, अन उपस्थित हजारो लोकांनी त्यांचा विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. मंच सोडून जायला सांगितले. तोवर कवाडेंनी माईक हातात घेतला होता. ते बोलण्याच्या तयारीत होते. पण आयोजकांनी त्यांना आदरयुक्त पणे मंच सोडून जाण्याची विनंती केली. यानंतर बेइज्जत होऊन कवाडेनी मंच सोडला. आपल्याच समाजाने हाकलून द्यावे, असे आपण काय केले आहे, याचा गंभीरपणे विचार कवाडेंनी करायला हवा. त्याशिवाय आंबेडकरी विचारांशी गद्दारी करून ज्या धर्मांध शक्तीशी हात मिळवणी केली आहे, त्या धर्म शक्ती तरी या बेइज्जत प्रसंगानंतर इज्जत देतील का ? याचा ही विचार त्यांनी तितक्याच गंभीरपणे करायला हवा.
सामाजिक विषमतेच्या विरोधात लढण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला. महाड चवदार तळे सत्याग्रह, त्या ठिकाणी विषमतेची गंगोत्री असलेल्या मनुस्मृतीचे दहन येथून संघर्षाला सुरुवात करणाऱ्या डॉ. आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या ऐतिहासिक नागभूमीत आणखी एक इतिहास घडवत बौद्ध धम्म स्वीकारला. हा धम्म दीक्षा सोहळा भारत वर्षाच्या इतिहासातीलच नव्हेतर जगभरातील इतिहासातील सर्वात मोठा धम्म दीक्षा सोहळा ठरलेला आहे. इतका मोठा धर्मांतर सोहळा आजपर्यंत ना कुठे झाला, ना यापुढे कुठे होईल. धर्मांध शक्तींच्या पतनाची ही सुरुवात डॉ. आंबेडकर यांनी नागपुरातूनच करण्याची दोन कारण आहेत. एक म्हणजे नागपूर ही नागवंशाची म्हणजे बौद्ध भूमी आहे. अन् दुसरे म्हणजे ज्या मनुस्मृतीला महाडमध्ये जाळले, त्या मनुस्मृतीला विधान मानणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य कार्यालय ही याच नागपुरात आहे. वैदिक धर्मांचे अवडंबर करणाऱ्या शक्तींच्या नाकावर टिचून हा धर्मांतराचा सोहळा डॉ. आंबेडकर यांनी नागपुरात केला.

नागपुरातील घटनेने दाखवून दिले की, नेते गद्दार झालेत आंबेडकरी जनतेमधील स्वाभिमान कायम….!
आपल्या अविरत संघर्षात त्यांनी संविधानाची निर्मिती करून त्यांनी मनुस्मृतीला मूठमाती देण्याचे ऐतिहासिक काम केलेले आहे. युगायुगाच्या गुलामगिरीतून हजारो लोकांनी मुक्तीचा श्वास पहिल्यांदाच नागपुरातील धम्मदीक्षा सोहळ्यानंतर घेतला. बुद्ध व त्यांचा धम्म हा महान वारसा आहे., त्या धम्माचे आपल्याला वारसदार बनविण्याचे महान व्युग प्रवर्तक कार्य डॉ. आंबेडकर यांनी केल्याने ते युगपुरुष ठरले आहेत. आता याच युग पुरुषाचा वारसा सांगत कुणी मनुस्मृतीला विधान मानणाऱ्या, वैदिक धर्माचे राज्य पुन्हा प्रस्थापित करण्याच्या घोषणा करणाऱ्यांच्या वळचणीला जावून डॉ. आंबेडकरांशी गद्दारी करीत असेल तर स्वाभिमानी आंबेडकरी व बौद्ध जनता त्यांना माफ कशी करेल ? या मंचावर जात असताना कवाडेंनी विचार करायला हवा होता. गद्दारी करून मिळालेल्या सत्तेच्या तुकड्यांच्या माजामुळे कदाचित त्याची मती भ्रष्ट झाली असेल पण आंबेडकरी व बौद्ध जनतेमधील स्वाभिमान कायम आहे. हे कवाडेंना हाकलून देऊन आंबेडकरी जनतेने दाखवून दिले.
आंबेडकरी विचार व समाजाशी गद्दारी करून धर्मांध शक्तींशी सत्तेच्या तुकड्यासाठी गद्दारी करणारे गद्दार फक्त कवाडे एकटेच नाहीत तर अनेकजण आहेत. कवाडेंच्या हकालपट्टीनंतर त्या सर्वांनी याचा बोध घ्यावा. कवाडे एकटेच नाहीत अनेकजण आहेत. छोटेमोठे तर अनेकजण आहेत. यातील काहीजण सत्तेच्या तुकड्यासाठी विकले गेले आहेत. आपल्या ही वाट्याला सत्तेचा एखादा तुकडा येऊ शकतो म्हणून विकले गेले आहेत. काहीजण तर तेल, मिठ, पिठासाठी विकले गेले आहेत, जात ही आहेत.
धर्मांध शक्तींच्या विरोधात सेक्युलर भूमिका घेवून लढणारे, संघर्ष करणारे अनेक नेते होऊन गेले आहेत. मात्र त्यांच्या लढ्याला मर्यादा होत्या. डॉ. आंबेडकर यांनी त्या सर्व मर्यादा तोडत विषमतावादी धर्म व्यवस्थेला धुळीस मिळविले. वैदिकची व्यवस्था संविधानाच्या माध्यमातून उध्वस्त केली. बुद्धाचा धम्म स्वीकारून या देशातील धार्मिक दृष्ट्या शोषित जाती समूहांना मुक्तीची वाट दाखविली. यामुळे या धर्मांध शक्ती डॉ. आंबेडकर यांचा तिरस्कार करताना दिसतात. अन् याच तिरस्कारामुळे त्या आंबेडकरी समाज व चळवळीत फूट पाडण्याचा प्रयत्न ही करीत आहेत. आठवले, कवाडेसारख्या डझनभर तथाकथित आंबेडकरवादी नेत्यांना त्यांनी भिकेचे तुकडे टाकून आपल्या दावणीला बांधले आहे. मात्र या नेत्यांचे समाजात काय स्थान आहे, हे संघ, भाजपने कवाडेंच्या हकालपट्टीनंतर पाहिले असेलच.
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या धर्मांध शक्तींच्या विरोधात संघर्ष करून धार्मिक शोषणातून बहुजन समाजाची मुक्तता केली, त्याच धर्मांध शक्तींबरोबर स्वतःच्या फायद्यासाठी आंबेडकरीवादी बनुनच कोण जात असेल, तर त्या साऱ्यांची अवस्था यापुढे कवाडे यांच्यासारखीच होईल. यात काही शंका नाही. नागपुरातील घटनेने हे दाखवून ही दिले आहे. याच घटनेची दुसरी एक बाजू आहे व ती फारच सकारात्मक आहे. आंबेडकरी समाज म्हणून आंबेडकरी विचाराची जनता जागृत असून या धर्मांध शक्तींच्या विरोधातील ती आज ही संघर्ष करायच्या तयारीत आहे.
………………
राहुल गायकवाड,
महासचिव समाजवादी,
पार्टी महाराष्ट्र प्रदेश