धर्मांध शक्तींच्या सर्व आव्हानांचा सामना करण्याची प्रेरणा महाड, चवदार तळे सत्याग्रहाकडून मिळते…..अबू असीम आजमी
महाड, दि.– नागरिक हक्क, अधिकार, तसेच सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गेल्या 98 वर्षांपूर्वी महाडला सत्याग्रह केला. धर्मांध व जातीयवादी शक्तींच्या फासातून चवदार तळे मुक्त केले, त्याच महाड या शहरात मानवता विरोधी असलेल्या मनुस्मृतीचे दहन केले. आज हा सत्याग्रह या देशातील पिछडा, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी समाज घटकांना प्रेरणा देत आहे. हे खरे असले तरी गेल्या दशकभरापासून सत्तेवर आलेल्या फॅसिस्ट शक्तींनी या देशातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम सुरु केलेले आहे. नफरतीचे वातावरण तयार केलेले आहे. संविधानिक परंपरा अन संस्थांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या मुळे संविधान, लोकशाही अन देशासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत, त्या आव्हानांचा सामना करण्याची वेळ आली असून हा महाडचा सत्याग्रह त्यासाठी आपल्याला ऊर्जा अन प्रेरणा देत आहे, असे उदगार समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आजमी यांनी काढले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ मार्च १९२७ रोजी ज्या मैदानावर मनुस्मृती दहन केले होते; ते मैदान त्याकाळी गुजर ब्राह्मणांचा विरोध पत्करून फतेह खान यांनी उपलब्ध करून दिले होते. त्याच दिवंगत फतेह खान यांचे नातू तथा महाड नगरपालिकेचे माजी अध्यक्ष मुहम्मद अली पालवकर यांना २० मार्च २०२५ रोजी महाड चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त एक पोट्रेट प्रदान करताना आमदार अबू आझमी (समाजवादी प्रदेशाध्यक्ष), राहुल गायकवाड (प्रदेश महासचिव, सपा.)
———————————————————————————–
20 मार्च 1927 साली झालेल्या ऐतिहासिक महाड सत्याग्रह दिनाच्या निमित्ताने येथील सत्याग्रहाचे स्मृतीस्थळ व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे परिसरातील पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर आजमी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्यात अन देशात जे नफरतीचे वातावरण तयार केले जात आहे, त्या माध्यमातून विशिष्ट जाती व धर्माच्या लोकांना टार्गेट केले जात आहे, त्या बाबत चिंता ही व्यक्त केली. महाड, चवदार तळे सत्यग्रहाच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, हा सत्याग्रह केवळ पिण्याच्या पाण्यासाठी नव्हता, तर सामाजिक न्याय व समतावादी समाज निर्माण करणे हा त्या मागचा प्रमुख उद्देश होता. अन विशेष म्हणजे सर्व जाती, धर्माच्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी महाड येथे हा संघर्ष उभा करून मनुवादी व्यवस्थेसमोर आव्हान उभे केले होते. त्याच आव्हानाचा एक भाग म्हणून त्यांनी याच ठिकाणी मनुस्मृतीचे दहन केले. सामाजिक न्याय व समतावादी समाज स्थापनेच्या या लढ्यात सर्व जातींच्या नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली, तशीच साथ त्यावेळी फत्तेखान यांनी ही दिली. देशाच्या स्वातंत्र्याचे आंदोलन असो की, देशातील सामाजिक न्यायाचे आंदोलन असो, मुस्लिम समाजाने आपले योगदान देवून आपले पुरोगामीत्व सिद्ध केले आहे, अन त्याची साक्ष इतिहास देत आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या आंदोलनात ब्रिटिशांना मदत करणाऱ्या फॅसिस्ट शक्तीच्या कुठल्याच प्रमाणपत्राची या देशातील मुस्लिम समाजाला गरज नाही. आम्ही देशभक्त आहोत, याची ग्वाही आमचा इतिहास देत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राष्ट्र भावनेने प्रेरित असलेल्या स्वराजाच्या स्थापनेत व ते राज्य वाढविण्यात मुस्लिम समाजाचा ही हातभार लागला आहे. याची अनेक उदाहरणे शिवशाहीत आहेत. त्यानंतर महात्मा फुले यांनी सुरु केलेल्या शैक्षणिक व समाज परिवर्तनच्या कार्यात ही उस्मान शेख, फातिमा शेख यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या ही सामाजिक न्यायाच्या व परिवर्तनाच्या लढ्यात आम्ही आहोत. अन महाडच्या चवदार तळे सत्याग्रहात ही फत्तेखान यांनी आपले योगदान दिलेले आहे, असेही आजमी यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी समाजवादी पार्टीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या सोबत अभिवादन करण्यास आले होते.