भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तसेच वेस्ट खान्देश दलित शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय, देवपूर, धुळे यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी “समता, न्याय आणि बंधुता : आंबेडकरी विचार संगम” या विषयावर सनदी लेखापाल व प्रख्यात विचारवंत प्रकाश पाठक यांचे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब महेंद्रजी निळे (अध्यक्ष,वेस्ट खान्देश दलित शिक्षण प्रसारक मंडळ) होते.
प्रमुख वक्ते प्रकाश आपल्या भाषणात म्हणाले की,मी स्वतः १९७५ सालाचा पहिल्या बॅचचा विद्यार्थी आहे.यावेळी रावसाहेब अशोकजी निळे व नानासाहेब उत्तमरावजी पाटील यांच्या असामान्य प्रयत्नांमुळे व संघर्षातून खानदेशात लॉ कॉलेजची स्थापना कशी शक्य झाली याचा भावनिक आढावा घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे सखोल विश्लेषण करताना त्यांनी म्हटले की,बाबासाहेबांची ज्ञानलालसा व एकाग्रता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची सर्वात मोठी जमेची बाजू होती. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांवर त्यांनी दिलेले महत्त्व अद्वितीय असून, सर्वसामान्यांना न्याय मिळावा हा त्यांचा मूलभूत हेतू होता.
“न्याय हा गुणवत्तेवर नव्हे तर गरजेवर आधारित असावा,” हा बाबासाहेबांचा दृष्टिकोन आजही मार्गदर्शक आहे.समानता व स्वातंत्र्यासाठी बंधुभाव हे मूल्य अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रकाश पाठक पुढे म्हणाले, “बाबासाहेब वैयक्तिक अपमान विसरत; परंतु सामाजिक अपमान कधीच विसरत नसत. त्यांनी आयुष्यभर सामाजिक न्यायासाठी संघर्ष केला.”
अध्यक्षीय भाषणात सुवर्ण प्रवासाचा गौरव
अध्यक्षीय समारोपात दादासाहेब महेंद्रजी निळे यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षात सहभागी सर्वांचे आभार मानले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन संघर्षमय असूनही त्यांनी आपल्या कर्तृत्वाने जगावर ठसा उमटवल्याचे त्यांनी सांगितले. महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना स्मरणांजली अर्पण करण्यात आली.
प्राचार्य डॉ.विजय बहीरम यांनी स्वागत प्रास्ताविकात १९७५ मध्ये ॲड. रावसाहेब अशोकजी निळे यांच्या प्रयत्नातून स्थापन झालेल्या या विधी महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सवी प्रवास सांगितला. गेल्या ५० वर्षांत या महाविद्यालयातून असंख्य अधिवक्ते, न्यायाधीश, सनदी अधिकारी, प्राध्यापक घडून विविध न्यायालयांत तसेच सेवाक्षेत्रात प्रतिष्ठा मिळवित आहेत, यावर त्यांनी प्रकाश टाकला.यावेळी कार्यक्रमात ॲड. जितेंद्रजी निळे, शशिकांत पाटील (सचिव),संचालक मीतेश निळे, नालंदाताई निळे, विदिशाताई निळे, ॲड. प्रज्ञा निळे, प्रेमाताई जाधव, वैशालीताई निळे, शशिकांतजी वाघ, प्रा. डॉ. संजय ढोढरे, ॲड. उमाकांत घोडराज, किशोर शेजवळ, बागुल साहेब,
पवार सर, मंगळे साहेब, प्राचार्य डी. बी. पाटील, मुख्याध्यापक सुनील पाटील तसेच प्राध्यापक, कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वैभव सबनीस आणि प्रा. अंकुश पाटील यांनी केले.
पाहुण्यांचा परिचय प्रा. अनिल दाभाडे यांनी करून दिला, तर आभारप्रदर्शन प्रा. आकाश निळे यांनी केले.या कार्यक्रमाद्वारे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करून समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांच्या आधारे सामाजिक परिवर्तन घडवण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.