- 143
- 1 minute read
पंतप्रधानाच्या कन्येचा साधेपणा !
भारतीय इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात विशेषत: प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास संशोधन आणि लेखनाच्या क्षेत्रात इतिहासकार डॉ. उपिंदर सिंग यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांचे लेखन प्रचारकी नव्हे, तर अकॅडमिक पातळीवरचे अर्थात उच्च दर्जाचे आहे. “The history of ancient and early mediaeval India” हे त्यांचे अत्यंत गाजलेले पुस्तक आहे. त्यांची सर्वच पुस्तके ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना पुण्यातील नामवंत अशा सरहद्द संस्थेने संत नामदेव पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित केले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. उपिंदर सिंग या भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कन्या आहेत. परंतु पंतप्रधानाच्या कन्या असल्याचा त्यांना कोणताही अहंकार नाही, बडेजाव नाही, घमेंड नाही. उपिंदर सिंग यांचे राहणीमान अत्यंत साधे, सरळ आहे. व्यक्तिमत्व अत्यंत सौजन्यशील आणि विनयशील आहे. त्या कार्यक्रमासाठी आल्या, सर्वांशी अत्यंत नम्रतेने बोलत होत्या. कार्यक्रम संपल्यानंतरदेखील त्यांनी प्रत्येकाशी चर्चा केली. त्यांनी अनेकांच्या प्रश्नाला सविस्तर, अभ्यासपूर्ण आणि नम्रतापूर्वक अशी उत्तरे दिली. त्यांच्यासोबत त्यांचे पती डॉ. विजय तनखा हेदेखील उपस्थित होते. त्यांनी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नोकरी केलेली आहे. दोघांनीही संशोधन-लेखनाच्या क्षेत्रासाठी सर्व आयुष्य समर्पित केलेले आहे.
डॉ. उपिंदर सिंग यांनी आयुष्यभर निष्ठेने प्राध्यापक म्हणून काम केले, आज त्या अशोका विद्यापीठाच्या डीन आहे, परंतु संशोधनाचे काम त्यांनी अविरतपणे चालू ठेवलेले आहे. मी त्यांना भेटून माझ्याजवळ असणाऱ्या त्यांच्या ग्रंथावरती त्यांची सही घेतली. त्यावेळेस त्यांनी याची नवीन आवृत्ती नक्की वाचा असे आवर्जून सांगितले. मी शिवचरित्रावरती पीएच.डी. केल्याचे संयोजक संजय नहार यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भाने खूप दर्जेदार चर्चा केली.
डॉ. उपिंदर सिंग या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कन्या असल्यामुळे त्यांना कुलगुरू होणे किंवा राज्यसभेवर खासदार होणे कठीण नव्हते, आजही नाही, पण तरीदेखील कोणतीही अभिलाषा किंवा मोह न ठेवता अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने त्यांनी काम केलेले आहे. या हपापलेल्या, लुटारू आणि हावरट जगामध्ये आजही डॉ. उपिंदर सिंग यांच्यासारख्या व्रतस्थ व्यक्ती आहेत हे पाहून आनंद वाटतो. मला सर्वात त्यांचा आवडलेला गुण म्हणजे त्यांची कमालीची विद्वत्ता आणि विनयशीलता! विद्या विनयेन शोभते, हे त्यांनी दाखवून दिले. आहो; आजकाल साध्या आमदाराची अपवाद वगळता मुलेदेखील नीट बोलत नाहीत आणि जमिनीवर नीट चालत नाहीत. हवेतच असतात. इतरांना तुच्छ लेखणे, बोलणे आणि प्रचंड माज दाखवणे अशी वृत्ती असते.
डॉ. उपिंदर सिंग या पंतप्रधानाच्या कन्या, परंतु त्यांच्याकडे कोणत्याही स्वरूपाचा बडेजाव किंवा घमेंड नाही. समाजाला सुसंस्कारित करण्यासाठी नेहमी आदर्शाची गरज असते, मग ते इतिहासातील आणि वर्तमानातील आदर्श असू शकतात. डॉ. उपिंदर सिंग या वर्तमानातील आदर्श आहेत. संत तुकाराम महाराज म्हणाले होते “शुद्ध बीजापोटी l फळे रसाळ गोमटी” डॉ. मनमोहन सिंग हेच अत्यंत सुसंस्कृत राजनेते आहेत, त्यामुळे ते संस्कार त्यांच्या कन्येने ज्ञानाच्या क्षेत्रात संवर्धित केलेले आहेत.
– डॉ. श्रीमंत कोकाटे