• 32
  • 1 minute read

परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील अनेक विभागात पावसाने कहर केला आहे. विशेषतः मराठवाड्यात. पेपरमधील बातम्या आणि टीव्हीवरील दृष्ये बघवत नाहीत.

परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील अनेक विभागात पावसाने कहर केला आहे. विशेषतः मराठवाड्यात. पेपरमधील बातम्या आणि टीव्हीवरील दृष्ये बघवत नाहीत.

           निसर्ग क्रमानुसार पावसाळा तर दरवर्षी याच महिन्यांमध्ये येत असतो. गेली शेकडो, हजारो वर्षे. त्यात काही बदल नाही. पण प्रत्येक वर्षी त्याचे स्वरूप बदलत चालले आहे. हिमालयापासून केरळ पर्यंत आणि पश्चिमे पासून नॉर्थईस्ट पर्यंत धुमाकूळ घालत असतो. ग्रामीण, शहरी, अर्ध शहरी पाऊस काहीही फरक करत नाहीये.

आपण बातम्या ऐकतो, वाचतो. मदत कार्य करणाऱ्या एजन्सीज, लष्कर धावून जातात. किती दगावले, किती बेपत्ता, किती कायमचे जायबंदी, किती घरांचे नुकसान, किती पिकांचे नुकसान, किती मालमत्तांचे नुकसान याची आकडेवारी जाहीर होते. सरकारकडून तुटपुंजी नुकसान भरपाई जाहीर होते. न मेलेल्या, जिवंत राहिलेल्या माणसांना भोगाव्या लागणाऱ्या यातनांचे रुपयातील मूल्य काढताच येत नाही. पाळीव जनावरे तर गरिबांची उपजीविकेची साधने असतात. पाळीव नसणारे पशु, पक्षी, जलचर हे तर खिजगणतीत देखील नाहीत.

निसर्गचक्राचे संतुलन बिघडले आहे किंवा नाही, क्लायमेट चेंज असे काही आहे का, असेल तर किती गंभीर याच्या चर्चा शास्त्रज्ञ, धोरणकर्ते यांच्या सेमिनार हॉलमध्ये वर्षानुवर्षे सुरूच आहेत. पण जगल्या वाचलेल्या म्हाताऱ्या माणसांना विचारा. ते सांगतील, कळत्या वयापासून आजपर्यंत त्यांनी पाहिलेले उन्हाळे, पावसाळे, हिवाळे आणि आजचे निसर्गचक्र यात बदल झाला आहे की नाही ते.

सरासरी पाऊस वगैरे आकडेवारी, पावसाची विध्वंस क्षमता पकडत नाही.
_______

कोणत्याही निसर्ग अरिष्टनंतर , राजकीय नेत्यांची, विविध प्रवक्त्यांची आणि कॉर्पोरेट मीडियाची भाषा कशी असते बघा

यावर्षी पाऊस जास्त झाला, ढगफुटी झाली; म्हणून शहरांचे, शेतीचे नुकसान झाले. पाण्याचा निचरा होणाऱ्या नैसर्गिक वाटा आम्ही बुजवत नेल्या, उंच रस्ते बांधून शेती खड्डयात आम्ही नाही घातली
नदीचा, नाल्याचा पूर शहरात घुसला ; आम्ही नदीला काही नाही केले
डोंगर आमच्या हायवेवर कोसळला ; आम्ही डोंगराला काही नाही केले
हिमालयात भूस्खलन झाले, आम्ही बांधलेल्या पायाभूत सुविधा , आम्ही बांधलेली पर्यटन स्थळे उद्धस्त झाली: आम्ही हिमालयाला काही नाही केले
समुद्र आत आला ; आम्ही समुद्राला काही नाही केले
वन्यप्राण्यांनी आमच्या वस्त्यांवर आक्रमण केले : आम्ही वन्य प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण नाही केले

सगळा दोष जणू काही पाऊस, निसर्ग, समुद्र / डोंगर / नद्या / वन्य प्राण्यांचा ; आम्ही काही नाही केले
_____________

निसर्ग माणसात फरक करत नाही हे खरे. पण एकतर, देशातील २० टक्के सुखवस्तू लोक राहतातच अशा ठिकाणी जी सेफ असतात. त्यांच्या मालमत्ता अशा असतात की ज्याला निसर्ग कोपाची आच लागत नाही उदा. शेअर्स. समजा काही कमी जास्त झालेच तर या वर्गाची जोखीम क्षमता मोठी असते.

निसर्गचक्र बिघडण्याची किंमत देशातील ८० टक्के ग्रामीण , शहरी भागातील कष्टकरी, जमिनीवर उपजीविका करणारे, हातावर पोट असणारे, घरे सखोल भागात असणारे, फारशा बचती नसणारे, आधीच डोक्यावर कर्ज त्यात नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी अजून कर्ज काढावे लागणारे आहेत.

पर्यावरण बदलाच्या चर्चा आणि आर्थिक विषमतेच्या चर्चा एकाचवेळी करण्याची गरज आहे. पर्यावरण बदलाची फक्त धार बोथट करण्यासाठी अजून काही दशके जातील. मधल्या काळात अशा अरिष्टांमुळे कमीत कमी नुकसान होईल, जे होईल त्याची लवकरात लवकर भरपाई होईल अशा यंत्रणा, योजना आणि त्यासाठी सार्वजनिक स्त्रोतांची तजवीज तातडीने उभे करण्याची गरज आहे.

संजीव चांदोरकर (२४ सप्टेंबर २०२५)

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *