केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाने १ ऑगस्ट २०२५ रोजी खोल समुद्रात ” शाश्वत पद्धतीने मासेमारी ” करण्यासाठी राष्ट्रीय धोरण तयार केले असल्यामुळे लाखो पारंपारिक मच्छीमार उध्वस्त होऊन बड्या खाजगी कंपन्यांना प्रचंड फायदा मिळवून देण्याचे नियोजित कटकारस्थान असल्याचा आरोप आगरी मच्छिमार सेनेचे अध्यक्ष जयेंद्रदादा खुणे यांनी केला आहे. तसेच पारंपारिक मच्छिमार संरक्षण समितीच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
” शास्वत मासेमारी ” या संकल्पनेस धोकादायक असलेल्या पर्ससीन मासेमारीस कोकण किनारपट्टीवरील मुंबईसह झाईपासून ते मुरुडपर्यंतच्या किनारपट्ट्यात १२ सागरी मैंलापर्यंत बंदी आहे. मुरुडच्यापुढे काही सागरी क्षेत्र हे पारंपारिक मासेमारीकरिता राखीव असुन त्या पुढील क्षेत्रात सप्टेंबर ते डिसेंबर असे ४ महिनेच पर्ससीन मासेमारीकरिता विशिष्ट अटींना अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे.याशिवाय एल.ई.डी. ( दिव्यांच्या प्रकाशझोतात ) केल्या जाणाऱ्या मासेमारीला राज्याच्या किनारपट्टीवर पूर्णतः बंदी आहे.
कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करून पालघर जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रातील पर्ससीन बंदिक्षेत्रात १० सागरी मैलापर्यंत पर्ससीन आणि एलईडी – दिव्यांच्या प्रकाशझोताने मासेमारीला अक्षरशः ऊत्त आला आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही मत्स्यव्यवसाय खात्याकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. किंबहुना मत्स्यखात्यातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार या सगळ्यास कारणीभूत असल्याचे दिसुन येते. बेकायदा मासेमारी आणि मत्स्यखात्यातील अधिकारी हे भ्रष्टाचार यामध्ये राज्याच्या किनारपट्टीवरील निसर्गाला अनुसरून ” शाश्वत मासेमारी ” या संकल्पनेस अनुकूल पद्धतीने मासेमारी करणारे ” पारंपारिक मच्छिमार ” भरडले जात आहेत. या व अश्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पालघर जिल्ह्यातील मच्छिमार संघटना तसेच महाराष्ट्रातील मच्छिमारांचे प्रतिनिधी ” पारंपारिक मच्छिमार संरक्षण समिती ” च्या झेंड्याखाली एकत्र येऊन पत्रकार परिषद बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ : ०० वाजता स्थळ : मुंबई मराठी पत्रकार संघ ( पहिला मजला ), सी.एस.टी. स्टेशन जवळ, मुंबई -४००००१ येथे घेण्यात येणार आहे. या परिषदेला श्री.संजय कोळी (मा.चेअरमन,वसई मच्छिमार सर्वोदय सोसायटी लि.), श्री.जयकुमार भाय (ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छिमार संघ ), श्री.रामकृष्ण तांडेल (कार्याध्यक्ष,महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती), श्री.जयेंद्रदादा खुणे (अध्यक्ष,आगरी मच्छिमार सेना ), श्री.मार्शल कोळी (समन्वयक अखिल भारतीय कोळी समाज) , कोळी युवशक्ती संघटना, रोजा फाऊंडेशन इत्यादी विविध मच्छिमार सहकारी संस्था आणि संघटना तसेच अनेक मच्छिमार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे पारंपारिक मच्छिमार संरक्षण समितीचे आयोजक श्री.मिल्टन सौदिया यांनी आवाहन केले आहे..