- 21
- 1 minute read
पश्तून (पठाण) यांचे पूर्वज आणि गांधार शिल्पकला
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 29
पश्तून (पठाण) यांचे पूर्वज आणि गांधार शिल्पकला
पश्तून ही जमात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान देशात आढळून येते. सन १९६४ पर्यंत इतिहासामध्ये त्यांचा उल्लेख अफगाण असा आहे. त्यानंतर त्यांच्या लोकसंख्येवरून त्यांच्या देशाचे नाव देखील अफगाणिस्तान झाले. हे लोक पुस्तू भाषा बोलतात. पाकिस्तान मधील मात्र उर्दू बोलतात. जगातील ही सर्वात मोठी जमात असून त्यांचे वंशज जलालाबाद, कंधार, बन्नू, खोष्ट, मर्दन, मिंगोरा, पेशावर, क्वेट्टा अशा शहरात आढळतात. कराचीत देखील अनेक पश्तून लोक राहतात. भारतात पश्तून लोकांना पठाण म्हणतात. उद्योगधंदे आणि नोकरी निमित्त पश्तून जमात अनेक देशांत स्थलांतरित झाल्याचे दिसते. या पश्तून जमातीचे पूर्वज एकेकाळी बौद्ध तत्वे पाळत होते हे वाचून आश्चर्य वाटते. उत्तर भारतात रोहीलखंड प्रांतात देखील त्यांचे वास्तव्य आहे. रोहीलखंडाचे मूळ नाव मध्यदेश म्हणजेच मध्यममार्ग आणि पंचशाला म्हणजेच पंचशील असे होते. दोन हजार वर्षांपूर्वी बुद्धांचा मध्यम मार्ग स्वीकारणाऱ्या आणि गांधार शिल्पकलेची जपणूक करणाऱ्या पश्तून जमातीची माहिती खालील प्रमाणे आहे.
हिरोडॉटस, टॉलेमी आणि स्ट्रेबो यांच्या नोंदीमध्ये पश्तून लोकांचा उल्लेख आलेला आहे. त्यांचा अफगान म्हणून उल्लेख बॅक्टेरियन, बृहत संहिता, हुदाद अल आलम अशा अनेक प्राचीन ग्रंथातून दिसून येतो. अनेक इतिहासकारांनी अफगाण शब्दाच्या व्यूत्पत्ती बाबत थियरी मांडली आहे. तसेच दोन हजार वर्षांपूर्वी गांधार संस्कृती जपणारी प्राचीन जमात म्हणून काही इतिहासकारांनी त्यादृष्टीने लिहिले आहे. भगवान शब्दावरून अफगान शब्द आलेला असून अफगाणिस्तानातील बामियन सारखी अनेक प्राचीन बौद्ध शिल्पे त्याची साक्ष देतात. त्यांची पूश्तू भाषा ही साक्या (शाक्य) म्हणजे खोतानी भाषेशी निगडित आहे. पश्तून लोक उंचपुरे, गोरेगोमटे दिसून येतात. काही इतिहासकार म्हणतात अलेक्झांडर जेंव्हा भारतात आला तेव्हा त्यांचे बरोबर अनेक ग्रीक देखील इथे आले व इथेच स्थायिक झाले. तेच पश्तून लोकांचे पूर्वज असावेत. त्यांचे हिरवे आणि निळे डोळे तसेच चेहरेपट्टी याचीच साक्ष देतात.
अशा या पश्तून समुदायाची इस्लामपूर्व संस्कृती ही बौद्ध संस्कृती होती. सम्राट अशोक काळापासून ते आठव्या शतकातील इस्लामच्या उदयापर्यंत पश्तून संस्कृतीने अनेक स्तूप, विहारे यांची निर्मिती केली. गंधार शिल्पकलेची जपणूक केली. सम्राट अशोक यांच्या कारकिर्दीत पश्तून जमातीमुळे बौद्ध धर्म बहरला होता. त्यानंतर कुशाण राजवटीमध्ये सुद्धा बामियान सारखी सांस्कृतिक स्थळे तयार झाली. बौद्ध शिल्पकलांचा उदय या पठाणी जमातीमुळे झाला हे वाचून आता आश्चर्य वाटते. त्या बौद्ध संस्कृतीतील अत्तान Attan हा पुरुषांच्या नृत्याचा प्रकार चालत आलेल्या परंपरेनुसार आजही खेळला जातो. तद्नंतर हुणांच्या आक्रमणामुळे मात्र बुद्धिझम लोप पावत गेला. ९ व्या शतकात पश्तून म्हणजेच पठाणी जमातीच्या गळी बळजबरीने इस्लाम उतरवला गेला. पुन्हा १४ व्या शतकात मंगोल राजवटीमुळे उरलासुरला बुद्धीझम लोकांच्या व्यवहारातून नाहीसा झाला. राहिली फक्त बौद्ध संस्कृतीची प्राचीन स्थळे. काळाच्या ओघात ती ही ओसाड होत गेली.
अफगाणिस्तानात असलेले पश्तून आज तालिबान बरोबर आहेत तर सीमेच्या पलीकडील पाकिस्तानात असलेले पश्तून पाकिस्तानशी एकनिष्ठ आहेत. एके काळचा हा बलुचिस्तान प्रांत म्हणजेच बुद्ध प्रांत प्राचीन बौद्ध संस्कृतीच्या स्थळांकडे दुर्लक्ष करून चालला आहे. गौड ब्राह्मण जशी स्वतःची पूर्व संस्कृती विसरले त्याचप्रमाणे स्वतःच्याच पूर्वजांची प्राचीन संस्कृती पश्तून विसरले आहेत. त्यांच्यासंबंधी अनेक शोध निबंध आता लिहिले जात आहेत. भारतातील अनेक उद्योगधंद्यामध्ये पठाणी लोक दिसून येतात. हिंदी चित्रपट सृष्टीतील फिरोज खान, संजय खान आणि अकबर खान हे बंधू देखील पश्तून जमातीचे आहेत. शांततेचे पारितोषिक मिळालेली मलाला युसुफझाई ही पश्तून जमातीची आहे. असो, अजून दोन हजार वर्षांनी या पृथ्वीवर किती धार्मिक संस्कृती असतील ते सांगता येत नाही. परंतु बौद्ध तत्त्वज्ञानाचा / संस्कृतीचा झेंडा या पृथ्वीवर मानव असेपर्यंत फडकत राहील.
संजय सावंत
0Shares