- 42
- 1 minute read
पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या न्यायालयातील विविध समस्यां बाबत शहादा बार असोसिएशनकडून नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर…
पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या न्यायालयातील विविध समस्यां बाबत शहादा बार असोसिएशनकडून नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर…
वकील संघाच्या निवेदनाची दखल न घेतल्यास लोकशाही व कायदेशीर मार्गाने आपले हक्क मिळविण्याकरीता लढा उभारला जाईल…
शहादा वकील संघाचा इशारा
शहादा दि.१९(यूबीजी विमर्श)
बार असोशिएशन,शहादा कडून न्यायालयीन परिसर तसेच संपुर्ण शहादा शहरात दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या विविध समस्यां बाबत दि.१९ रोजी वकील संघातील पदाधिकारी व जेष्ठ विधिज्ञ तसेच ज्युनिअर वकिलांनी नंदूरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.
सदर निवेदनात नमुद मजकूर खालील प्रमाणे–
दिनांक १६/०७/२०२४ रोजी रात्री शहादे शहरात व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरगांव रोडकडुन पावसाचे पाणी शहादा शहरात अतिशय वेगाने शिरले त्यामुळे डोंगरगांव रोडला लगत असलेल्या रहीवासी कॉलनींमधुन, वर उल्लेखलेल्या पाटातुन पाणी येवुन ते शहादा-डोंगरगांव रोडवरील ओम अॅक्सीडेंन्ट हॉस्पीटल ते शहादा न्यायालय या परिसरात मोठ्या प्रमाणात जलभरावास सुरवात झाली. त्यामुळे शहादा न्यायालयाला जलाशयाचे स्वरूप प्राप्त झाले होते. न्यायालयीन ईमारती लगत न्यायीक अधिकाऱ्यांचे निवासस्थाने देखील आहेत, त्यात देखील पाणी शिरले होते मा. न्यायाधिश श्री. निवघेकर यांच्या निवास्थानात देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने त्यांचे निवास्थानातील सामान देखील पुर्णपणे पाण्यात भिजले होते. त्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान ओम अॅक्सीडेंन्ट हॉस्पीटल येथे व शहादा न्यायालयात झाले आहे. रात्रीचे वेळेसच न्यायालयीन कर्मचाऱ्यांना व न्यायीक अधिकाऱ्यांना कोर्टात येवुन कोर्ट
केसेसच्या फाईली, कॉम्प्युटर्स व इतर महत्वाचे साहीत्य उंचावर नेवुन ठेवावे लागले. तसे जर का केले नसते तर कोर्टातील सुनावणींच्या केसेसचे पर्यायाने न्याय मागणाऱ्या जनतेचे अति मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते.
दिनांक १८/०७/२०२४ रोजी नंदुरबार जिल्ह्याचे म. प्रमुख जिल्हा न्यायाधिश साहेब यांनी शहादा कोर्टाला भेट देवुन परिस्थितीची पहाणी व निरिक्षण केले व उपाय योजनांबाबत मार्गदर्शन केले आहे.
शहादा न्यायालयाचे नविन ईमारतीचा प्रस्ताव मंजुर झालेला असुन ज्या ठिकाणी सध्याची ईमारत उभी आहे ती ईमारत पाडुन त्या ठिकाणी नविन ईमारतीचे बांधकाम होणार आहे. त्याकरीता न्यायालय स्थलांतरीत करणे गरजेचे आहे. मात्र न्यायालयास दुसरीकडे ईमारत उपलब्ध होत नसल्यामुळे नविन ईमारतीच्या बांधकामास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे महोदयांना शहादा वकील संघाची विनंती आहे की, शासनाकडुन लवकरात लवकर शहादा न्यायालयास ईमारत उपलब्ध करून दिल्यास शहादा न्यायालयाचे नविन ईमारतीचे बांधकाम लवकरात लवकर होण्यास मदत होईल. पर्यायाने आम जनतेला व न्यायालयात न्याय मागणाऱ्या जनतेला याचा फायदा होईल.
सद्यस्थितीतील शहादा शहरातील न्यायालयीन ईमारत ही शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. न्यायालयीन ईमारतीच्या दक्षिणेस लागुनच जुना पाट आहे. सदर पाटाचे दक्षिणेस शहादा-डोंगरगांव पक्का रस्ता आहे. न्यायालयीन ईमारत ही जुन्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक वर्षापासुन उभारण्यात आली आहे. त्यानंतर सदर ईमारतीच्या आजु-बाजुच्या परिसरात अनेक विकासाची कामे झाल्यामुळे सदर ईमारत व जमिनीची उंची सारखी न झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होत नाही. त्यातच न्यायालयीन ईमारतीच्या दक्षिणेस असलेल्या पाटाची रूंदी व खोली गाळ साचल्याने, पाटावरील अतिकमणामुळे व इतर कारणांनी आणि पाटाचे खोलीकरण व सफाई काम वेळोवेळी केलेले नसल्याने पावसाळ्यातील पाटाचे पाणी निचरा न होता न्यायालयीन परिसरात शिरत असते.यापुर्वी देखील सन २०१९ व २०२१ मध्ये अशीच परिस्थिती शहादा न्यायालयात निर्माण झालेली होती. त्यावेळी न्यायालयीन प्रकरणांच्या फाईली तसेच महत्वपुर्ण दस्तऐवज पाण्यात भिजले होते. न्यायालयीन ईमारती लगत न्यायीक अधिकाऱ्यांचे निवासस्थान देखील आहे. त्यात देखील पाणी शिरले होते. सन २०२१ मध्ये मा. महोदयांनी स्वतः शहादा न्यायालयात येवुन त्यावेळच्या स्थितीची पहाणी व निरिक्षण केले होते, मात्र तरी देखील यावेळी तिच स्थिती नव्याने उत्पन्न झाली आहे.
दि.१८रोजीचे पावसाचे पाणी हे सार्वजनिक बांधकाम कार्यालय, स्टेट बँक, रेस्ट हाऊस, पंचायत समिती कार्यालय यात देखील शिरले होते. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व तेथे येणाऱ्या नागरीकांना देखील विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सदरील पाणी जमा झाल्याने प्रचंड दुर्गंधी निर्माण होऊन, डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर झाली असुन आणि न्यायीक अधिकारी, कर्मचारी, वकिल व कोर्टात येणाऱ्या जनसामान्य पक्षकारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचा सरळ परिणाम कोर्टाच्या दैनंदिन कामकाजावर होत आहे.
शहादा शहराच्या बाजुने नव्याने बांधण्यात आलेले शहादा-लोणखेडा बायपास व शहादा-प्रकाशा या रस्त्यांची उंची ही जास्त आहे. तसेच या रस्त्यांना लगत पाण्याचा निचरा होण्याकरीता कुठलीही सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे लोणखेडा, मलोणी, मोहीदे त.श. या गावांकडुन येणारे पाणी हे शहरात शिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातच तहसिल कार्यालयजवळील नाल्यात ६ महीन्याचे बाळ वाहुन गेल्याची घटना या पावसात घडली आहे. तसेच शहादा शहर लगत असलेल्या जुन्या पाटचारीची साफ सफाई न झाल्यामुळे, रूंदीकरण व खोलीकरण न झाल्यामुळे तसेच अनेक व्यावसायीकांनी व नागरिकांनी अतिक्रमण करून पाटचारीवर पक्के व कच्चे बांधकाम करून घेतल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्याकरीता अनेकविविध अडचणी निर्माण होतात आणि
त्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहतींमध्ये शिरते. त्यामुळे शहरातील नागरिकांना अनेक विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
नागरी वसाहतींमध्ये पाणी साचुन रहात असल्यामुळे शाळकरी मुले, वृध्द नागरीक व महिला यांना पाण्यातुन मार्ग क्रमण करतांना विषारी सर्प, विंचु ईत्यादी चावुन प्रकृतीच्या समस्या निर्माण होतात. नविन वसाहतींमध्ये रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात अरोग्याची समस्या निर्माण झाल्यास व तातडीने उपचार करावयाचे असल्यास दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी वाहन देखील उपलब्ध होत नाही. उपचारा अभावी प्राण गमवावे लागण्याची भिती असते.
शहादा शहरात पावसाळ्यात निर्माण होणारे समस्यांबाबत वेळोवेळी वर्तमान पत्रात देखील बातम्या छापुन येत असतात. तरी देखील आम जनतेची सुनवाई होत नाही.
वर नमूद समस्या तसेच नमूद नसलेल्या अनेक समस्या वारंवार निर्माण होत असतात. शहरातील अनेक सेवाभावी संस्था, समाजकार्य करणारे समाजसेवी तसेच आम जनतेकडुन नगर परिषदेचे मुख्यधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, महसुल विभागाचे प्रांताधिकारी आणि तहसिलदार तसेच पाटबंधारे विभाग यांना वारंवार निवेदन देऊन देखील योग्य उपाययोजना आजतागायत केली गेलेली नाही.वर नमूद परिस्थिती ही वारंवार म्हणजे दरपावसाळ्यात निर्माण होत असते, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे व अपेक्षित आहे. आपण महाशय जिल्ह्याचे सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी आहात व जिल्ह्याचे पालक आहात म्हणुन आपण वेळीच या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालने व आपल्या अखत्यारितील अधिकारांचा वापर करून शहादा शहरातील विविध प्रशासकीय यंत्रणांच्या मार्फत या समस्यांचे निराकरण करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी तसेच कर्तव्याचा भाग आहे. आणि म्हणुन आपण सदर प्रकरणी शहादा शहरातील प्रांत कार्यालय, तहसिलदार कार्यालय, नगरपालिका कार्यालय व सार्वाजनिक बांधकाम विभाग कार्यालय यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या बैठका घेवुन त्यांना शहादा न्यायालयातील व शहरातील समस्यांचे निराकरण करण्या करीता उपाय योजना राबविण्याबाबत योग्य त्या सुचना कराव्यात व शहादा न्यायालयाच्या नवीन ईमारतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी शहादा न्यायालयास स्थलांतरकरीता आपल्या स्तरावर दुसन्या ठिकाणी पर्यायी ईमारत लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. आणि आमच्या सदर निवेदनाची दखल घ्यावी अन्यथा वकिल संघ शहादा लोकशाही व कायदेशीर मार्गाने आपले हक्क मिळविण्याकरीता लढा उभारतील याची आपण नोंद घ्यावी असा इशारा निवेदनातून शहादा वकील संघाने जिल्हाधिकारी प्रशासनास दिला आहे.
सदर निवेदन देतांना शहादा वकील संघाचे पदाधिकारी,जेष्ठ विधीज्ञ व वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.