पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळास महात्मा फुले यांचे नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने राहुल डंबाळे यांनी आज लेखी पत्राद्वारे नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळास महात्मा फुले यांचे नाव देण्यात यावी ही मागणी 2004 सालापासून प्रलंबित असून त्याचवेळी पुणे शहरातील सर्व राजकीय पक्ष संघटनांनी एकत्रित येऊन भाई वैद्य यांच्या नेतृत्वाखाली लेखी निवेदनाद्वारे प्रथमता केली होती. रिपब्लिकन युवा मोर्चा ने याच मुद्द्यावर 2006 , 2008 व 2019 रोजी देखील आंदोलने केली होती.
” महात्मा फुले यांचे देशातील सामाजिक सुधारणेतील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी त्यांची कर्मभूमी व जन्मभूमी असलेल्या पुणे येथील विमानतळास त्यांचे नाव देणे अत्यंत योग्य असणार असल्याने त्याबाबतचा निर्णय होणे आवश्यक आहे अशी अपेक्षा या निवेदनात करण्यात आलेली आहे. “
दरम्यान सुमारे वीस वर्षापासून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. याकडे देखील सर्व सरकारांनी दुर्लक्ष केले असल्याने आता किमान पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ महात्मा फुले यांचे नाव देऊन फुले आंबेडकरी विचारधारेच्या लोकांमध्ये असलेली नाराजगी संपवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी विनंती या निवेदनात राहुल डंबाळे यांनी केली आहे.