• 39
  • 1 minute read

पुण्यात झुंडशाही…

पुण्यात झुंडशाही…
        रात्री बाराच्या सुमारास ६०/७० लोकांची झुंड एका घरावर चालून येते आणि दरवाज्यावर लाथा मारून घरात प्रवेश करते.  घरात पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले असतात.  काही लोक थेट बेडरूममध्येही प्रवेश करतात आणि स्त्रियांना आणि लहान मुलांनाही झोपेतून उठवतात.  ही झुंड त्या कुटुंबावर आरोप करते की ते बांगलादेशी आहेत.  वास्तविक हे आलेले लोक काही सरकारी कर्मचारी नव्हते.  ते होते स्वयंघोषित देशभक्त लोक!   पण एवढ्या झुंडीपुढे त्या कुटुंबातील लोक काय करू शकणार?  ते आपली आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान ओळखपत्र दाखवतात.  यावर आलेले लोक म्हणतात की हे पुरावे बनावट आहेत.  ते बनावट आहेत हे आलेले लोकच तात्काळ ठरवतात.  नंतर कळते की बहुतेक या झुंडीबरोबरच काही साध्या कपड्यातील पोलिसही होते.  पण त्यांनी हा प्रकार थांबवायला काहीच केले नाही.
  
नंतर रीतसर कुटुंबातील लोकांना पोलिसात स्थानकात नेले जाते.  तिथे ते ह्या झुंडशाहीबद्दल तक्रारही नोंद करतात.   हे कुटुंब मुस्लिम असल्याने हा सगळा प्रकार झाला हे वेगळे सांगायला नकोत.  पण हे लोक बांगलादेशी असल्याच्या निव्वळ संशयावरून त्यांच्या घरात रात्री १२ वाजता घुसण्याचा अधिकार या झुंडीला कोणी दिला?  ते पोलिसात आपला संशय व्यक्त करून रीतसर तक्रार करू शकत होते.  पण आपणच आरोप करायचे आपणच न्याय करायचा हा प्रकार पुण्यात कसा काय झाला?  याला एकच उत्तर असू शकते, आणि ते म्हणजे आपले कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही याची खात्री त्यांना असली पाहिजे.  
 
पोलीस आता सांगत आहेत की हे कुटुंब बांगलादेशी असल्याबद्दल त्यांना गोपनीय माहिती मिळाली होती, म्हणून ही कारवाई केली.  पण मग ही कारवाई पोलिसांनी करायला हवी होती.  ती मध्यरात्री करायचा अधिकार गुंडगिरी करणाऱ्या लोकांना पोलिसांनी का दिला?  पोलीस स्वतः जाऊन त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्थानकात बोलावून त्यांची चौकशी करू शकले असते. 
  
खरे तर बहुधा प्रकार असा असावा की, त्या झुंडीपैकी काही लोकांनीच हे लोक बांगलादेशी असल्याबद्दलचा खोटी तक्रार पोलिसांना दिली असावी आणि पुढे स्वतःच रात्री ती कारवाई पोलिसांना सांगून केली असावी. उत्तरेकडच्या गायपट्ट्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात नाही व त्यामुळे तिथे असे झुंडशाहीचे मध्ययुगीन प्रकार होतात असे पूर्वीपासून म्हटले जायचे.  महाराष्ट्राच्या भूतकाळातील त्या सुवर्णकाळात “या राज्याचा बिहार होऊ देणार नाही” हे राजकारण्यांचे एक आवडते वाक्य असायचे.  आत त्या गायपट्ट्यातील राज्यात पूर्वी जे होत असे, ते आता महाराष्ट्रात होतंय.  आणि ते देखील कुठे एखाद्या खेडेगावात, तालुक्यात नाही, तर चक्क विद्येचे माहेरघर, संस्कृतीचे माहेरघर, वगैरे वगैरे असणाऱ्या “पुण्यनगरीत”!  आपल्या राजकारण्यांनी महाराष्ट्राचे वाटोळे करण्याचे ठरविलेलेच दिसते हे सध्या आमदार लोकांनी केलेल्या विविध कारनाम्यांवरुन दिसून येतेच आहे.  त्याला आता हा स्वयंघोषित देशभक्त कार्यकर्त्यांचा हातभार लागतोय.  
 
आता पुढे या कुटुंबाबद्दल जी माहिती त्यांनीच सांगितले आहे ती पाहिली की, या सगळ्या प्रकाराबद्दल हसावे की रडावे तेच कळत नाही.  या कुटुंबाला चार पिढ्यांपासून भारतीय लष्कराची पार्श्वभूमी आहे.  त्या घरात राहणाऱ्या माणसाचे पणजोबा, आजोबा, दोन काका हे भारतीय सैन्यात होते आणि त्यांनी १९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धात भाग घेतलेला होता.  त्याच्या भावाने कारगिलमध्ये युद्धात भाग घेतलेला होता.  त्याच्या आजोबांचे भाऊ हे मध्य प्रदेशात पोलीस महासंचालक होते.  अशी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाला ह्या गोष्टीला तोंड द्यावे लागते, आणि ते ही पुण्यासारख्या महाराष्ट्रातील शहरात ही शरमेची बाब आहे. 
 
 जेव्हापासून धर्मांधतेचा राक्षस बाटलीतून बाहेर काढला आहे, तेव्हापासून हे स्पष्ट होते की आता ह्या राक्षसाला पुन्हा बाटलीत टाकणे शक्य नाही.  मोहम्मद अली जीना यांना फाळणीनंतर ते जमले नाही आणि त्यांचा देश ज्या धर्मांधतेचा आधारावर निर्माण झाला, त्याचाच वारसा आजपर्यंत चालत राहून बरबाद झाला आहे.  तोच प्रकार आता आपल्याकडे हळूहळू सुरु झालाय.  त्याची चिन्हे अनेक आहेत. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात ते कावडीया लोक कित्येक दिवस जो हैदोस रस्त्यावर घालत आहेत, तो त्यांच्या मुख्यमंत्र्याला मनात असूनही आवरता येत नाही हे दिसतंय.  कारण झोपलेल्या वाघावर स्वार होणे एक वेळ सोपे असते, पण त्याच्यावरून उतरणे अशक्य असते.  याचाच अनुभव वंशवाद, अतिरेकी राष्ट्रवाद, जातीयवाद, धर्मांधता इत्यादी वाघांना जागे करणाऱ्या लोकांना जगभर येत असतो.  भारत किंवा महाराष्ट्र त्याला अपवाद असू शकत नाहीत.
Sunil Sangle.
 
 
 
 
 
0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *