पुणे : राज्यांमध्ये होत असलेल्या पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमातीच्या उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये याबाबतची खबरदारी पोलीस महासंचालक व राज्य सरकारने घ्यावी अशी विनंती रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने राहुल डंबाळे यांनी आज मुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यभरामध्ये सुमारे 17000 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अनुसूचित जाती , जमाती प्रवर्गातील अनेक उमेदवारांनी तयारी केलेली असून केवळ ते अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गातील असल्यामुळे त्यांची खुल्या प्रवर्गातून संधी नाकारून अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गातूनच निवड केली जात आहे . ही बाब गंभीर असून जे उमेदवार सर्वसाधारण गटासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना जरी ते अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असले तरी त्यांची निवड ही सर्वसाधारण गटातूनच केली जाणे कायदेशीर बंधनकारक आहे.
खुल्या प्रवर्गासाठीचे निकष पुर्ण करुणही भरती प्रक्रियेत अशा उमेदवारांना राखीव गटातुन नियुक्ती दिल्याच्या काही तक्रारी मागील भरतीवेळी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या वेळी अशी कोणतीही चुकीची बाब घडू नये यासाठी राज्य सरकार व पोलीस महासंचालकांनी विशेष खबरदारी घ्यावी अशी मागणी राहुल डंबाळे यांनी केली.