- 91
- 1 minute read
प्रकाश डबरासे यांच्या काही निवडक कविता
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 94
1) मुलांनो..
शिकून सवरून मोठे व्हा रे,
स्व-बळावर हुकमी व्हा रे…
शास्वत सत्य एकच केवळ,
येणार नाही कधी गेली वेळ,
मोल वेळेचे जाणून घ्या रे,
शिकून सवरून मोठे व्हा रे….
नादी लागून दोस्तं मित्रांच्या,
नका रे जाऊ मागे गर्दीच्या,
भाग नाही, गर्दीचे कारण व्हा रे,
शिकून सवरून मोठे व्हा रे….
तारूंण्याची बातच न्यारी,
प्रेम मैत्रीत भुरळ घालणारी,
चंचल मन काबूत ठेवा रे,
शिकून सवरून मोठे व्हा रे….
कुचकामी पर महाल माडी,
आजची संधी, उद्याची नांदी,
ठेवून ध्यानी, जीवन घडवा रे,
शिकून सवरून मोठे व्हा रे….
मुलांनो, आतुर माय बाप,
बघती साहेबपण तुम्हांत,
सेवक नाही, साहेब व्हा रे,
शिकून सवरून मोठे व्हा रे….
कवीः प्रकाश डबरासे (१.६.२०२५)
2)नको गं आई लग्नाची घाई
नको गं आई लग्नाची घाई,
कलेक्टर मला व्हायचं गं आई…
कॅालेजात मोठ मोठ्या जाईल,
दिवस रात अभ्यास मी करील,
शिकून स्वावलंबी होईल आई,
नको गं आई लग्नाची घाई,
कलेक्टर मला व्हायचं गं आई…
नाते गोते वा सगे सोयरे,
बोलती बोलू दे जग सारे,
नाही घाबरायचे त्यांना आई,
नको गं आई लग्नाची घाई,
कलेक्टर मला व्हायचं गं आई…
नाही उणी मी कोणाहुनी,
नको चिंता गं तुझ्या मनी,
नाव कुळाचं कमवीन आई,
नको गं आई लग्नाची घाई,
कलेक्टर मला व्हायचं गं आई…
मोठे स्वप्न गं माझ्या हृदयी,
नाही हटणार मागे मी आई,
घेईल आकाशी भरारी आई,
नको गं आई लग्नाची घाई,
कलेक्टर मला व्हायचं गं आई…
तुझी साथ गं मोलाची मला,
मोठी होऊन दाखविल तुला,
माझा आदर्श सावित्री रमाई,
नको गं आई लग्नाची घाई,
कलेक्टर मला व्हायचं गं आई…
कवीः प्रकाश डबरासे (१.६.२०२५)
3)माणसात येत का नाही…
बारा जुनला विमान दुर्घटनेत,
भेदभाव नियतीने केला नाही…
अमानवीय जात धर्म बघून,
कोणालाच सोडले नाही…
जीवनात, मरण सोडले, तर,
निश्चित असे काहीच नाही…
मरणाची वेळ, काळ, निमित्त,
भविष्यवेत्ताही सांगू शकत नाही…
तरी माणसात इतका उन्माद,
तो इतरां माणूस मानतच नाही…
स्ववर्चस्वासाठी कट रचून,
रक्तपाताशिवाय राहत नाही…
अरे माणसा क्षणभंगुर जीवनात,
वाईटाचा मार्ग धरायचा नाही…
अनमोल जन्म हा एकदाचा,
गड्या, माणसात येत का नाही…
कवीः प्रकाश डबरासे (१५.६.२०२५)
4)जगी बुद्ध आहे…
जगी ज्याला कोणी नाही,
त्याला बुद्ध आहे,
मार्ग सुखाचा दाखवणारा,
जगी बुद्ध आहे….
गुलामी, हक्क हिरावून घेई,
माणूस माणसा शोषून घेई,
स्वातंत्र्य अबाधित ठेवणारा,
जगी बुद्ध आहे,
जगी ज्याला कोणी नाही,
त्याला बुद्ध आहे…
वसे जिथे अन्याय विषमता,
गाडली जाई तिथे मानवता,
न्याय, समता रूजवणारा,
जगी बुद्ध आहे,
जगी ज्याला कोणी नाही,
त्याला बुद्ध आहे…
कोणी कोणाचा होत नसतो,
स्वार्थापोटी आपसात लढतो,
युद्धावरी मैत्री संदेश देणारा,
जगी बुद्ध आहे,
जगी ज्याला कोणी नाही,
त्याला बुद्ध आहे…
जेथे राग, लोभ, ईर्ष्या भारी,
नित्य दुःख तेथे वास करी,
तृष्णेपायी हे सारे सांगणारा,
जगी बुद्ध आहे,
जगी ज्याला कोणी नाही,
त्याला बुद्ध आहे…
जे पेराल तेच उगवे,
भक्ती ना परिणाम बदले,
एैसे विज्ञान शिकवणारा,
जगी बुद्ध आहे,
जगी ज्याला कोणी नाही,
त्याला बुद्ध आहे…
कवीः प्रकाश डबरासे (१२.६.२०२५)
5)सत्तेसाठी साधने उभारूया
सत्तेची चावी, समाजाच्या हाती,
समाज पहिले घडवूया,
मतभेद त्यागून, विचार जूळवून,
सत्तेसाठी साधने उभारूया…
आजचे हे वैभव भीमापायी,
नव्हते सोपे, ना सोपे पुढेही,
ठेवा गड्यांनो कोरून हृदयी,
मिळेना हक्क भिकेत कधीही,
संघटीत होवूया, जोमाने लढूया,
हक्क आपले अबाधित ठेवूया,
मतभेद त्यागून, विचार जूळवून,
सत्तेसाठी साधने उभारूया…
बोल बाभीमाचे आठवा रे,
जागृतीचा विस्तव पेटवा रे,
दिवसही आले दुष्ट वैऱ्यांचे,
भक्ती विलास सोडून द्या रे,
भक्तीपोटी, अधोगती मोठी,
डोळस समाज घडवूया,
मतभेद त्यागून, विचार जूळवून,
सत्तेसाठी साधने उभारूया…
समस्यांचे मुळ अर्थकारण,
उद्योग धंद्यांकडे वळूया,
शिक्षण क्षेत्र, सहकारही,
काबीज आपण करूया,
लाचारी सोडून, सक्षम होवून,
स्वावलंबी सारे होवूया,
मतभेद त्यागून, विचार जूळवून,
सत्तेसाठी साधने उभारूया…
घालून आळा भावनांना,
राजनैतिक विचार करूया,
वादाने नुसते वाढती वाद,
अकारण टिका टिप्पणी टाळूया,
संयम ठेवून, तोल सांभाळून,
मित्रत्वाचे जाळे विणूया,
मतभेद त्यागून, विचार जूळवून,
सत्तेसाठी साधने उभारूया…
कवीः प्रकाश डबरासे (१०.६.२०२५)
0Shares