• 31
  • 1 minute read

“प्लास्टिक प्रदूषण”

“प्लास्टिक प्रदूषण”

         पर्यावरण वि आर्थिक विकास, कार्बन एमिशन्स वि ऊर्जेची आवश्यकता, प्लास्टिक वि अर्थव्यवस्था…अशा खऱ्या खोट्या त्रिशंकू अवस्थेत, निर्णय, कृती न करता आपल्या साऱ्या पिढ्या खपणार

आणि न जन्मलेल्या पिढ्यांच्या गळ्यात त्यांना गाळात घेऊ जाणारा मोठा धोंडा बांधणार आहोत!
_________

आपल्या देशातच नाही तर जगाच्या पाठीवर एक नागरिक नसेल ज्याच्या दैनंदिन जीवनात त्याचा संबंध प्लास्टिकशी येत नाही. एवढे ते सर्वव्यापी झाले आहे.

प्लास्टिकच्या या सर्वव्यापीपणाला दुसरी चिंताजनक बाजू देखील आहे. पृथ्वीवरील प्रत्येक समुद्रापासून ते प्रत्येक जलस्त्रोतापर्यंत आणि जनावरांच्या पोटात गेलेल्या प्लास्टिक पिशव्यांपासून ते मानवी शरीरात जाणाऱ्या सूक्ष्म प्लास्टिक पार्टिकल्स पर्यंत प्लॅटिक पोचले आहे.

जगात जेवढे प्लास्टिकचे उत्पादन होते त्यातील दोन तृतीयांश प्लास्टिक, कोणतेही संस्कार न करता, रिसायकलिंग न होता जमीन, पाण्यामध्ये जात असते. त्याचा शेवटचा मुक्काम अर्थातच समुद्रात. २३ दशलक्ष टन प्लास्टिक पृथ्वीवरील समुद्राच्या पोटात आपण जबरदस्तीने घातले आहे.

“प्लास्टिक प्रदूषण” कमी केले पाहिजे रोखले पाहिजे यावर सर्व देशातील धोरणकर्त्यांचे तत्वतः एकमत आहे. कारण असे एकमत पॉलिटिकली करेक्ट असते. पण कृती ? प्रतीकात्मक ! नक्की कसे रोखायचे याबद्दल टोकाचे मतभेद आहेत.
________

युनोने पुढाकार घेऊन ग्लोबल प्लास्टिक प्रदूषणासंदर्भात काय करता येईल का या संदर्भात प्रयत्न चालवले आहेत. दोन महिन्यापूर्वी जगातील १८३ देशांच्या प्रतिनिधींची जिनीवाला दहा दिवस बैठक झाली. ही गेल्या तीन वर्षातली सहावी बैठक.

या फोरम मध्ये राष्ट्रांचे दोन गट पडले.

पहिल्या गटात युरोप, जपान, कॅनडा हे विकसित देश आणि त्यांच्या जोडीला पृथ्वीवरील समुद्रकिनारी असणारे छोटे देश आहेत.
या गटाचे म्हणणे आहे प्लास्टिक उत्पादन मोठ्या प्रमाणावर बंधने घातली गेली पाहिजेत.

दुसऱ्या गटाचे नेतृत्व पेट्रोलियम उत्पादक देश करत आहेत. त्यांची भूमिका आहे कोणत्याही प्रकारे प्लास्टिक उत्पादनावर बंधने आणता कामा नयेत. बंधने न आणता प्लास्टिकचे रिसायकलिंग, वेस्ट मॅनेजमेंट यावर भर देण्यात यावा.

अमेरिका आणि भारत दुसऱ्या गटाला पाठिंबा देणाऱ्यांपैकी आहेत. प्लास्टिकच्या वापरकर्त्या देशांमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
_________

भारतासारख्या देशाची भूमिका गरीब / विकसनशील देशांची प्रतिनिधिक भूमिका म्हणावी लागेल. भारतात प्लास्टिक उद्योगात छोटे-मोठे ३०,००० उत्पादक आहेत. ज्यात ४० लाख रोजगार आहेत. देशात १५ लाख कचरावेचक इतर कचऱ्याबरोबर प्लास्टिक वेचून आपला उदरनिर्वाह करतात. प्लास्टिक गोळा करून विकणे हा त्यांचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे.

प्लास्टिकच्या वापरावर मोठ्या प्रमाणावर बंधने आणली तर आमच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसेल, रोजगार कमी होतील हे या देशांचे म्हणणे.

भारतात प्लास्टिकचा खप दरडोई १५ किलो आहे, जो जागतिक सरासरीच्या फक्त अर्धा आहे. युरोप, अमेरिकेमध्ये दरडोई १५० किलो प्लास्टिक वापरले जाते. विकसित राष्ट्रांनी आधी आपला प्लास्टिकचा खप वेगाने कमी करावा मग आमच्यावर दडपण आणावे अशी एकंदर भूमिका आहे.
___________

पर्यावरण विरुद्ध आर्थिक विकास , कार्बन एमिशन्स विरुद्ध सर्व प्रकारची वाहतूक, प्लास्टिक विरुद्ध आर्थिक विकास / रोजगार या वरकरणी त्रिशंकू अवस्थांमध्ये सारे जग सापडले आहे असे भासेल. त्या दोन शिंगावर फाकले जाऊन कोणीच निर्णय घेत नाही. ब्लेम गेम मध्ये मात्र सर्वाना रस आहे.

कारण या प्रश्नांना क्विक फिक्स उत्तरे नाहीत. आता एकमत होऊन कृती केली तरी ठोस पण अंशतः रिझल्ट्स मिळण्यास दोन तीन दशके लागू शकतात. तोपर्यंत आताचे धोरणकर्ते / राजकीय नेते / कॉर्पोरेट नेते मरून जाणार …….

जगासमोरील , पृथ्वीसमोरील सर्व गंभीर प्रश्न आज तुमची आमची नातवंडे / पतवंडे किंवा त्यांना होणाऱ्या मुलांच्या कपाळावर अदृश्य शाईने आपण सामुदायिकपणे लिहीत आहोत. त्यांना याची भयानक किंमत मोजावी लागणार आहे.

आपण म्हणतो माझी नातवंडे / पतवंडे माझ्या हृदयाचा तुकडा आहे. तो हृदयाचा तुकडा मोठा झाल्यावर त्यातून सतत रक्त वाहत राहणार आहे. आपण सगळे कलेक्टीव्ह सेल्फ डिसेप्शन मध्ये आहोत!

संजीव चांदोरकर (५ नोव्हेंबर २०२५)

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *