अमेरिकेच्या साम्राज्यवादी धोरणांतर्गत व पाठिंब्यामुळे इस्त्रायल गेल्या दोन वर्षांपासून गाजा पट्टीतील निरापराध आणि निहत्ये पॅलेस्टाईन नागरिकांची हत्या करीत आहे. हा नरसंहार थांबविण्यात यावा, तसेच भारत सरकारने या प्रकरणी सकारात्मक भूमिका घ्यावी, यासाठी कायदेशीर व शांततामय मार्गाने निर्दशने करणाऱ्या समाजवादी व डाव्या पक्षासह अन्य सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड करून त्यांना अटक करण्यात आली. हा प्रकार अघोषित आणीबाणीचा असून संवैधानिक नागरिक अधिकारांचे उल्लंघन असल्याने समाजवादी व डावे पक्ष याचा जाहीर निषेध करीत आहे.
गाजा पट्टीतील नरसंहार व भारत सरकारने या प्रकरणी सकारात्मक भूमिका घ्यावी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी समाजवादी व डाव्या पक्षांनी 17 जून रोजी राष्ट्रव्यापी निदर्शने व आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आझाद मैदानात 18 जून रोजी निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रितसर परवानगी मागून ही ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बजरंग दल व अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावाला बळी पडून नाकारली. तरी ही निर्दशने करण्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या समाजवादी व डाव्या पक्षांच्या पदाधिकऱ्यांना मध्यरात्रीपासूनच अटक करण्यास सुरुवात केली. निर्दशनेच्या एक दिवस अगोदरच समाजवादी पार्टीचे प्रमुख महासचिव मेराज सिद्दीकी यांना कुर्ला येथून तर महासचिव राहुल गायकवाड यांना बेलार्ड पियर येथून अटक करण्यात आली. तसेच सीपीआयचे कॉ. प्रकाश रेड्डी यांना गावदेवी, तर कॉ. चारुल जोशी यांना मालाड येथून अटक करण्यात आली. सीपीआय (एम)चे कॉ. शैलेंद्र कांबळे, कॉ. विवेक मौन्टेरो, डॉ. रेगे यांच्यासह अनेकांना आझाद मैदानातून अटक करण्यात आली.
शेतकरी कामगार पक्षाचे भाई राजेंद्र कोरडे यांना वडाळा येथून तर साम्या कोरडे, समाजवादी पक्षाचे अशफाक खान, सीपीआयचे शँकर कुंचीकोरवे, बसपाचे श्यामलाल जैस्वार आदींना धारावीत अटक करण्यात आली. सर्वाधिक अटक सीपीआय (एम ) च्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.कॉ. हरी गाडगे,कॉ. शैलेंद्र चौहान,कॉ.तबरेज अली सय्यद यांना अटक करण्यात आली. सीपीआय (माले ) चे कॉ. श्याम गोहिल आणि ऐपसो चे फिरोज मिठीबोरवाला यांना अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. संपूर्ण मुंबई शहरात सुरु असलेले अटकसत्र म्हणजे अघोषित आणीबाणीच आहे, असा थेट आरोप आज समाजवादी व डाव्या पक्षांनी केला आहे.
या प्रकरणी देशभर निर्दशने व आंदोलन करण्याचा कार्यक्रम शांततेत पार पडला असताना महाराष्ट्रात मात्र मुख्यमंत्री व गृहमंत्री फडणवीस यांनी या आंदोलनाला हिंदुत्ववादी व विशेष करून बजरंग दलाच्या दबावाला बळी पडून परवानगी नाकारल्यामुळे या जनविरोधी सरकारचा जाहीर निषेध समाजवादी व डाव्या पक्ष करीत आहेत. तसेच फडणवीस सरकार संविधानानुसार चालत नसून हिंदुत्ववादी पक्षांच्या ईशाऱ्यावर चालत असल्याचा आरोप ही हे पक्ष करीत आहेत.
………
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी,
महाराष्ट्र प्रदेश