अविद्येच्या अनर्थावर सावित्री-जोतिबांनी कटाक्ष ठेवून बहुजनांचे विद्यार्जनाकडे लक्ष वेधले. त्यातून औपचारिक व सार्वत्रिक शिक्षणाची गंगा खेडोपाडी गेली. विझलेल्या डोळ्यांमध्ये चमक आली. यांत मुलींचा तर घराबाहेरचे विशाल जग पाहण्याचा शेकडो पिढ्यांचा अनुशेष भरून निघाला. पण विषमताग्रस्त पुरुषसत्ताक जगात, शालेय शिक्षण व त्याही पुढे जाऊन पदवीधर होण्याचा, करिअर करण्याचा, पारंपरिक चौकटी झुगारण्याचा या कष्टकरी कुटुंबातील मुलींचा संघर्ष साधासुधा असूच शकत नव्हता. लातूर परिसरातील एकूण ३० मुलींची ही आत्मकथने. तळातील सामाजिक वास्तवाचा धगधगता दस्तऐवजच. ही ‘स्वत:ची गोष्ट’ मुलींनी सहज साध्या निवेदन शैलीने खूप संयत भाषेत सांगितली आहे. वाचताना आपल्या अंगावर काटा येईल. पण कमालीच्या हलाखीत या मुली बालपणीच प्रौढ पोक्त झालेल्या. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे यातील बहुतांश मुलींना मिळालेले समंजस जोडीदार ! तेही हलाखीतून, संघर्षातून आलेले.
व्यसनी, जुगारी व सदा कर्दावलेल्या बापाचा, संसार रेटणारी हतबल आई. घरी जायची ओढ निर्माण करणारं घरपणच यातील घरांना नव्हते. या पार्श्वभूमीवर समंजस जोडीदार मिळाला. त्यातून या मुलींना आत्मविश्वास व लढण्याचे बळ मिळाले.
स्वत:ला सिद्ध करण्यापर्यंतचा खडतर प्रवास या मुलींना बोलते करून, लिहवून घेण्याचे चिवट काम मुख्य संपादक अनिल जायभाये यांनी केले आहे. त्यांना पंचशील डावकर यांची तेवढीच मोलाची साथ लाभली. प्राध्यापकी पेशात असलेल्या संवेदनशील अनिल जायभाये यांना या मुलींचे सर्वंकष कुपोषण जाणवले. या मुलींशी संवाद करताना एक अधोमुख अंधाऱ्या जगाच्या या मुली व त्यांचे जगणे म्हणजे एक प्रातिनिधिक सामाजिक दस्ताऐवजच आहे, ही जाणीव त्यांना झाली. त्याचे फलित म्हणजे २०१८ ते २०२३ या काळातील या मुलींनी लिहून दिलेली ही आत्मकथने. ३०० पानांचे हे स्त्री शिक्षणाची महत्ता विशद करणारे पुस्तक ‘हरिती पब्लिकेशन्स’ ने प्रकाशित केले आहे. संपादक द्वय व ‘हरिती’ला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.