जो स्वतःला जाळून
आपल्या लेकरांसाठी उजेड करतो,
त्याला वेडा नाही,
बाप म्हणतात.
जो ठेचकाळूनही
हसत पुढं चालत राहतो,
त्याला कमकुवत नाही,
बाप म्हणतात.
जो उपाशी राहून
बाळांच्या ताटात भाकरी वाढतो,
त्याला गरिब नाही,
बाप म्हणतात.
जो वेळ आली तर
सगळं काही गमावून देतो,
त्याला नादान नाही,
बाप म्हणतात.
जो दिवसभर घाम गाळतो
आणि रात्री शांत रडतो,
त्याला हतबल नाही,
बाप म्हणतात.
जो स्वतःच्या इच्छा
मनात पुरतो,
त्याला साधू नाही,
बाप म्हणतात.
जो जगाच्या गर्दीत
हरवूनही स्वतःला सावरतो,
त्याला फकीर नाही,
बाप म्हणतात.
जो जगाच्या ओझ्याखाली
हसत उभा राहतो,
त्याला देव नाही,
बाप म्हणतात.
मानवाच्या मुक्तीसाठी,
सर्व जाती-धर्माच्या समाजाच्या कल्याणासाठी
दिवस-रात्र झिजतो,
जो “आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया” असतो,
जो “सिंबॉल ऑफ नॉलेज” असतो,
त्या बाबासाहेबांना,
बापांचा बाप म्हणतात.
-कांबळेसर, बदलापूर,ठाणे.