आपण तसे भाग्यवान आहोत या भूमीतील समाजात अध्यात्मिक ज्ञान हे उपलब्ध तर आहेच, पण इथे या ज्ञानाचे महत्त्व देखील लोकांनी जाणले आहे परंतु या भूमी जन्मलो म्हणून तुम्हाला अध्यात्मिक ज्ञान जन्मताच प्राप्त असेल असे गृहीत धरू नका ! गौतम बुद्धांनी स्वतः सांगितले आहे. सोनार ज्याप्रमाणे सुवर्णाची पारख अगदी काळजीपूर्वक करतो आणि मगच ते स्वीकारतो त्याप्रमाणे मी आपल्याला सांगितलेला शब्दनशब्द आधी नीट तपासून पहा आणि जर हे तुमच्या बुद्धीला पटले तरच त्यांचा स्वीकार करा. गौतम बुद्धांनी अनेक जाती जमातीच्या व निरनिराळ्या बौद्धिक कुवत असणाऱ्यांना दीर्घकाळपर्यंत मार्गदर्शन केले. त्यांनी व्यक्त केलेले विचार आणि त्यांची शिकवण आपण आधी तपासून बघितली पाहिजे. त्यांचे शब्द म्हणजे कल्पनेच्या पाण्यावर निर्माण होणारे केवळ साहित्यिक बुडबुडे होते की बुद्धीच्या सागरातल्या सत्याच्या तळाचा शोध त्यातून लागतो, हे तपासायला हवे. त्यांची काही तत्त्वे एखाद्या विशिष्ट परिस्थितीला अनुसरून किंवा काही मोजक्या लोका संबंधात मांडलेली असतील तर सर्वत्र तीच तत्वे लागू पडतील असे समजून कुठलीही शहानिषा न करता त्यांचा स्वीकार करणे म्हणजे बर्फाच्या पायावर एखादा महाल उभा करण्यासारखे आहे. या महालाचा पाया पक्का नसला तर त्याच्या मजबुतीचे काय बोलायचे ?
धम्माचा सराव !
धम्माचा सराव करणे म्हणजे काय ? व्यवहारीक दृष्टीने बघितले तर धम्म याचा अर्थ अशी अध्यात्मिक शिकवण, जी आपल्याला सुखाच्या मार्गावर धरून ठेवते, दुःखाच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करते. बुद्धत्वाचा भर यावर की, जरी आपले मन सध्याच्या क्षणी विविध पूर्वग्रहांनी कलुशित झालेले आहे, गैरसमजामुळे डागाळलेले आहे तरीही मनाचा असाही पैलू अजून अस्तित्वात आहे, जो अजूनही शुद्ध, स्वच्छ आहे. या पैलूंची तुम्ही जोपासना केली तर मनाला दिगभ्रमित करणाऱ्या असंख्य गोष्टी पासून आणि मनाला कष्टी करणाऱ्या अनुभवामुळे दुःखाकडे नेणाऱ्या मार्गापासून दूर राहू शकतो. भगवान बुद्धांनी आपल्या मनाच्या शुद्धतेची क्षमता त्यांच्या सिद्धांतिक तत्वातून नेहमीच विशद केली आहे. एक हजार वर्षांपूर्वी जन्मलेल्या धम्म कीर्ती या तर्कशास्त्रज्ञाने त्यांच्या या तत्वावर तार्किक विश्लेषण करून मान्यता दिली जर आपल्या मनात ज्ञानाचे बीज रुजले आणि जोपासले गेले तर आपण संसारिक सुखदुःख किंवा विचार कलाहापासून मुक्ती मिळवू शकतो म्हणजे निर्वाणाचा अनुभव घेऊ शकतो. ज्ञानाच्या बीजाची संकल्पना तार्किक दृष्टीने पटवून दिली आणि बुद्धतत्त्वाच्या एकूणच सर्वांचे विश्लेषण केले. कर्माचे नियम, पुनर्जन्माच्या संकल्पना, मुक्तीचे निर्वाणाची व विज्ञानाच्या सार्वत्रिक अस्तित्वाची शक्यता तसेच शरणागत अवस्थेचे तीन प्रमुख महत्वपूर्ण पैलू म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ यांनाही मान्यता दिली. —————————– बौद्ध धम्म विचार प्रसारक सुरेश भवर , नाशिक